नागपूर, दि. २५ [दिनेश खांडेकर] :- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून येत एक वेगळाच राजकीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री करून त्यांच्या ४०-४५ वर्षांच्या राजकारण रूपी समाजसेवेचे फळ त्यांना देण्यात यावे, असे साकडे मुनगंटीवार समर्थकांनी भाजप श्रेष्ठिंना घातले असल्याचे कळते.
याबाबत प्राप्त माहितीनुसार २०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी विदर्भातील आमदारांनी भाजप पक्ष श्रेष्ठिंकडे केली होती. परंतु त्यावेळी मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात न पडता राज्याच्या तिजोरीच्या चाब्या त्यांच्या हातात पडल्या. ते राज्याचे अर्थमंत्री झाले. राज्याच्या अर्थ व वन खात्याचा कारभार २०१४-१९ या काळात प्रभावीपणे सांभाळत त्यांनी राज्यातील जनतेच्या मनावर आपली एक वेगळीच छाप सोडली. अर्थमंत्री म्हणून त्यांनी राबविलेली धोरणे राज्याला प्रगतीपथावर नेण्यास परिणामकारक ठरली.
तसेच या काळात वन मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेली वृक्ष चळवळ दुसरी हरितक्रांती ठरली. त्यांच्या महत्वाकांशी वृक्ष लागवडीच्या धोरणामुळे राज्याच्या वनच्छादित क्षेत्रात वाढ होऊन पर्जन्यवृष्टीत वाढ झाल्याचे मत अनेक पर्यावरण तज्ञांनी, पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले. त्यानंतर २०१९-२४ या काळात राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाने राज्याची मान देश तसेच विदेश स्तरावर उंचावली. सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा लाभ भाजपला विधानसभा निवडणुकीत ही झाल्याचे पहावयास मिळाले.
भाजपच्या संकटकालीन काळात त्यांनी बजावलेली राजकीय दुव्याची भूमिका भाजपसाठी अनेकदा संकटमोचक अशी ठरली. त्यामुळे भाजपच्या या जुन्या-जाणत्या नेतृत्वाला, अभ्यासू, संवेदनशील, संयमी, निष्ठावान, प्रभावी वक्तृत्व असलेल्या, विविध खात्याचा अभ्यास असलेल्या, जनतेशी नाळ जुळून असलेल्या या लोकनेत्याला मुख्यमंत्री पदाचा मान देवून त्यांच्या मागील ४०-४५ वर्षांच्या राजकीय तपश्चर्येला न्याय द्यावा, अशी भावना विदर्भासह राज्याच्या ईतर भागातील आमदार व्यक्त करत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदाबाबत होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव भाजपसह महायुतीच्या काही आमदारांकडून मुख्यमंत्री पदासाठी सुचविण्यात येणार आहे. एवढेच नाहीतर याबाबत काही आमदारांनी भाजप पक्ष श्रेष्ठिंकडे आपले म्हणणे मांडले असल्याचे ही कळते. तसेच भाजपचा परंपरागत आणि प्रभावी मतदार असलेल्या आर्य वैश्य [कोमटी] समाजासह ओबीसी प्रवर्गातील काही समाजाकडूनही मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी जोरकसपणे करण्यात येत आहे.
राजनाथ सिंग यांच्या भेटीने चर्चेला उधाण
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची दिल्लीत भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आणि मुनगंटीवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीच्या वृत्तास दुजोरा मिळाला. इकडे राज्यात मुख्यमंत्री कोण? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतांना, याबाबत भाजप कोअर कमिटीची बैठक सुरू असतांना, मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी दबक्या आवाजात करण्यात येणारी मागणी आता जोरकसपणे करण्यात येत असतांना सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या भेटीचे वृत्त समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे.