बल्लारपूर, दि. २० [प्रतिनिधी] :- “जननायक, विकास पुरुष, भाजप प्रणित महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर भ्याड हल्ला करून गुंडागर्दी करत मतदारांची मते बळजबरीने मिळवू पाहणाऱ्या कॉँग्रेस-मविआ उमेदवार संतोष रावत याला जनता, मतदार मतदानातून उत्तर देणार असून बल्लारपूर-मूल विधानसभा मतदारसंघात सुधीर भाऊ वन-साईड चालणार….” अशी जोरदार चर्चा या विधानसभा मतदारसंघात आहे.
या विधानसभा मतदारसंघा बाबत समोर आलेल्या विविध सर्वेच्या निष्कर्षानुसार या विधानसभा मतदार संघात भाजप-महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातल्या-त्यात दक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांच्या सभेने मुनगंटीवार यांची विक्रमी मताधिक्याच्या दिशेने विजयी वाटचाल सुरू झाली. दुसरीकडे कॉँग्रेस उमेदवार संतोष रावत म्हणजे ‘गेलेली सीट….’ असे म्हणत स्वत: कॉँग्रेस नेत्यांनीच संतोष रावत यांना वाऱ्यावर सोडल्याने संतोष रावत विचलीत झाल्याचे, हवालदिल झाल्याचे पाहावयास मिळत होते आणि याच पराभूत मानसिकतेतून त्यांनी या भागातील कुख्यात गुंड विजय चिमडेलवार, राकेश रत्नावार यांच्या मार्फत सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मूल तालुक्यातील कोसंबी या गावात भ्याड हल्ला केला.
या बाबत प्राप्त माहितीनुसार सुधीर मुनगंटीवार हे सामान्य मतदारांच्या आणि गावकऱ्यांच्या आग्रहानुसार दि. १८ रोजी सायंकाळच्या सुमारास कोसंबी या गावात गेले होते. त्या गावातील सोयी-सुविधेच्या अनुषंगाणे, विकासात्मक मुद्यांच्या अनुषंगाणे त्यांची गावकऱ्यांशी चर्चा सुरू होती. त्या दरम्यान कॉँग्रेस उमेदवार संतोष रावत गुंडासह तिथे पोहोचले आणि त्यांनी थेट गुंडांकरवी मुनगंटीवार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवार यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे संतोष रावत यांचा मुनगंटीवारांना इजा पोहचविण्याचा वाईट हेतु साध्य झाला नाही. पण रावत यांच्या गुंडांनी सामान्य मतदार, महिला भगिनींना मारहाण सुरू केली. त्यामुळे खवळलेल्या गावकऱ्यांत आणि संतोष रावत यांच्या गुंडांमध्ये संघर्ष सुरू झाला.
याबाबीचे गांभीर्य लक्षात घेवून सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ पोलीस आधीक्षकांना या बाबीची माहिती देत पोलिसांना पाचारण केले. गावकऱ्यांनी संतोष रावत यांच्या गुंडांना चांगलाच चोप देत त्या गुंडासह संतोष रावत यांना ही तेथून पिटाळून लावले. या घटनेची चांगलीच दखल मतदारांनी घेतली असून संतोष रावत यास घटनास्थळा वरुन जसे पिटाळून लावले, तसेच या मतदारसंघातून कायमचेच पिटाळून लावण्याचा निर्धार या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांनी केला असल्याचे बोलल्या जात आहे.