अहमदपूर, दि. १४ [प्रतिनिधी] :- आर्य वैश्य [कोमटी] समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील महायुती सरकारने ‘श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करून आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या मागील दहा वर्षांच्या कडव्या झुंजेला, संघर्षाला न्याय दिला. याची जाणीव ठेवत राज्यात परत महायुतीचे सरकार यावे, यादृष्टीने आर्य वैश्य समाज, महाराष्ट्र आणि आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या वतीने महायुतीला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
याचाच भाग म्हणून आज अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांना आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या वतीने समाजाचा पाठिंबा अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार या विधानसभा मतदारसंघात आर्य वैश्य [कोमटी] समाजाचे जवळपास ०५ हजार मतदार आहेत. महत्वाचे म्हणजे, आर्य वैश्य [कोमटी] समाजाची राज्यात निष्ठावान, अतिशय संवेदनशील, सात्विक व्यापारी समाज अशी ओळख आहे. आज ही महाराष्ट्राच्या ग्रामीण-शहरी बाजारपेठेत ३० ते ४० टक्के बाजारपेठ, ‘मार्केट’ या समाजाच्या व्यापाऱ्यांच्या हातात आहे. वीस-वीस, चाळीस-चाळीस वर्षांपासून या समाजाची व्यापारी प्रतिष्ठाने अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघा प्रमाणेच महाराष्ट्राच्या विविध विधानसभा मतदारसंघात आहेत.
या बाबीचा राजकीय दृष्टीने विचार करता राज्यभरातील एकूण १६ विधानसभा मतदारसंघात या समाजाची मते निर्णायक आहेत. या समाजाची राजकीय भूमिका लक्षात घेवून अनेक विधानसभा मतदारसंघातील ईतर समाजाचे मतदार आपली राजकीय भूमिका निश्चित करतात. आपण मतदान कुणाला करायचे, ते ठरवतात. या बाबीचा विचार करता अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्रने विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना दिलेला जाहीर पाठिंबा महत्वाचा ठरणार आहे, निर्णायकी ठरणार आहे, अशी जोरदार चर्चा या विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.
यावेळी आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे विभागीय अध्यक्ष तसेच या विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठीत व्यापारी प्रवीण गादेवार, उपाध्यक्ष विनोद वट्टमवार, डॉ. गजानन दमकोंडवार, दत्तात्रय पोलावार, त्रीदानंद दमकोंडवार आदी समाजबांधवांची उपस्थिती होती.