Sunday, December 22, 2024
Homeराजकीयआदिवासींसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या मुनगंटीवारांच्या विजयासाठी आदिवासींची एकजूट !

आदिवासींसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या मुनगंटीवारांच्या विजयासाठी आदिवासींची एकजूट !

पोंभुर्णा, दि. १२ [प्रतिनिधी] :- आदिवासी समुदायासाठी अनेक महत्त्वाची कामे करणाऱ्या, आदिवासी समाजबांधवांसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील संपूर्ण आदिवासी समाज एकवटला असून येथील जाहीर कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या नेत्यांनी, आदिवासी समाजबांधवांनी मुनगंटीवार यांच्या विजयाचा प्रण व्यक्त केल्याचे पहावयास मिळाले.

सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे आदिवासी समाजबांधवांशी संवाद साधला. या कार्यक्रमात आदिवासी समाजाचे नेते, पोंभुर्णा येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुकाध्यक्ष जगन येलके यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठींबा जाहीर केला. यावर आपल्या भावना व्यक्त करतांना मुनगंटीवार यांनी, “जगन येलके यांनी दिलेला पाठिंबा म्हणजे समाजाची सेवा करण्याची दिलेली संधी होय. मागील काळात ज्याप्रमाणे आदिवासी समाजबांधवांसाठी अनेक विकास कामे केलीत, तसेक किंबहुना त्यापेक्षा अधिक विकास कामे पुढील कार्यकाळात करणार.” असे उद्गार काढले.

येणाऱ्या काळामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील गावे ‘पेसा’ गावे म्हणून घोषणा होईल तेव्हा गावातील जनतेशी संवाद साधण्यासाठी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे बोलतांना मुनगंटीवार म्हणाळे की, “आदिवासी बांधवांची सेवा करण्याचा संकल्प करून अनेक वर्ष काम करत आहे. आदिवासी बांधवांसाठी तेंदुपत्ताचा बोनस २० कोटीवरून ७२ कोटी केला. नामवंत शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिकता यावे म्हणून अर्थमंत्री असताना महत्वाचा निर्णय घेतला. ज्या गावात आदिवासी सरपंच आहे त्या गावांना ५ टक्के रक्कम देण्यासाठी २८५ कोटीचा विशेष निधी सरकारच्या तिजोरीतून देण्याचा निर्णय घेण्याचे पुण्यकर्म मला करता आले. शहरामध्येही ‘शबरी घरकूल’ देण्याचा निर्णय घेण्यासाठी स्वत: लक्ष दिले. त्यामुळे आता शबरी घरकुलासाठी अडीच लाख रुपये मिळणार आहेत.”

सामाजिक सभागृह, वीर बाबुराव शेडमाके यांचे पोस्ट तिकीट आदी कामांचा उल्लेख ही त्यांनी यावेळी केला. आता वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने १३७ कोटी रुपयांचे उत्तम स्टेडियम चंद्रपूर येथील म्हाडामध्ये उभारण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. मुल आणि पोंभुर्णा शहराच्या मध्ये ४० हजार कोटीचा उद्योग प्रकल्प येत्या काळात सुरू करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगताच टाळ्यांचा गडगडाट झाला. 

भारतीय जनता पार्टीद्वारे नुकतेच ‘संकल्पपत्र’ जारी करण्यात आले. या वचननामा समितीचा अध्यक्ष म्हणून आदिवासींसाठी अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एमआयडीसीच्या माध्यमातुन आदिवासी तरुण, तरुणींना रोजगार देण्यासंदर्भात मुद्दा वचननाम्यामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या १२ हजार रुपयांत वाढ करून ते १५ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. वन जमीन पट्टे देण्यासोबतच त्या त्या ठिकाणी आदिवासींच्या अधिकाराचे रक्षण करण्याचाही संकल्प करण्यात आला असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार आणि राज्याचा मंत्री म्हणून मागील दहा वर्षात पोंभुर्णामध्ये पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, श्री राज राजेश्वर मंदिर, तहसील कार्यालय, नगर पंचायत इमारत, उपकोषागार कार्यालय, व्यायामशाळा, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क, कार्पेट निर्मिती केंद्र, अगरबत्ती केंद्र, बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट यूनिट म्हणजे ‘भाऊ’, कृषी कार्यालय, नगरपंचायत इमारत, स्टेडियम, भगवान वीर बिरसा मुंडा आयटीआय, पाणी पुरवठा योजना, तलावांचे सौंदर्यीकरण, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आठवडी बाजार, स्मशानभूमी, भूमापन कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, वीर बाबुराव शेडमाके सभागृह, संत जगनाडे महाराज सभागृह, पत्रकार भवन, आदिवासी मुले आणि मुलींसाठी वसतीगृह, गावागावांत सिंचन योजना अशी अनेक कामे पूर्णत्वास नेल्याचे त्यांनी सांगितले. “मागील पाच वर्षात २ वर्ष ८ महिने सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसने आपली पाच कामे तरी सांगावी.” म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना विकासाच्या मुद्यावर बोलण्याचे, विकासाच्या मुद्यावर राजकारण करण्याचे आव्हान केले. यावेळी आदिवासी समाजबांधवांची असलेली उल्लेखनीय उपस्थिती विरोधकांच्या काळजाचा थरकाप उडविणारी होती.

हेही वाचा

लक्षवेधी