यवतमाळ, दि. २८ [प्रतिनिधी] :- आर्य वैश्य [कोमटी] समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने परिणामकारक ठरणाऱ्या श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापनेत प्रमुख भूमिका असणाऱ्या, या महामंडळाची संकल्पना मांडणाऱ्या, हे महामंडळ साकारास यावे म्हणून निवेदने देणाऱ्या, आंदोलने करणाऱ्या, यासाठी तब्बल दहा वर्षे संघर्ष करणाऱ्या ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार शनिवार, दि. २६ रोजी कोजागिरी निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार मदन भाऊ येरावार, आर्य वैश्य समाज यवतमाळ चे अध्यक्ष विजय भाऊ पालतेवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित समाजबांधवांना संबोधीत करतांना आमदार मदन भाऊ येरावार यांनी, “हे महामंडळ आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम ठरेल. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न साकारास आणण्याच्या दृष्टीने जे पावले उचलले आहेत, जे निर्णय घेतले आहेत, त्या दृष्टीने आपल्या समाजातील उद्यमी समाजबांधव, युवा उद्योजक विचार करून या महामंडळांतर्गत उपलब्ध होणाऱ्या अर्थ पुरवठ्याची गुंतवणूक करू शकतील. आपण रोजगार निर्मिती करणारे माणसं आहोत, या महामंडळाच्या माध्यमाने आपल्या समाजातील होतकरू बांधवांनी लघु उद्योग उभारून रोजगार निर्मितीचे कार्य करावे. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे काम आमचे. संघर्ष समितीच्या मागणीनुसार आ. सुधीर भाऊ यांनी विशेष पाठपुरावा घेवून साकारास आणलेल्या या महामंडळासाठी आत्ता अवघा ५० कोटींचा निधी असला तरी भविष्यात या अंतर्गत आपण अमर्याद निधी उपलब्ध करून देवू शकतो. फक्त हे महामंडळ ज्यांच्यासाठी स्थापन करण्यात आले, ज्यासाठी स्थापन करण्यात आले, त्यासाठीच हे राहील याची काळजी समाजाने घ्यावी. ज्यांनी यासाठी प्रयत्न केले, संघर्ष केला त्यांचा सन्मान, सत्कार करणे आपले कर्तव्य आहे. ज्याचा मान त्याला मिळालाच पाहिजे, यादृष्टीने विजय पालतेवार यांनी घडवून आणलेल्या या कार्यक्रमाबाबत त्यांचे अभिनंदन करतो.” असे उद्गार काढले.
हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे म्हणून मागील दहा वर्षांपासून ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने सतत आंदोलने करण्यात आली. तरी शासन दखल घेत नसल्यामुळे संघर्ष समितीचे सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांनी दि. ०२ ऑक्टोबर पासून प्राणांतिक उपोषण आंदोलनाचा इशारा दिला. परिणामी शासनाने दि. ३० सप्टेंबर रोजी याबाबत अद्यादेश काढून हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले.
असे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून शासनाने कोमटी समाजातील वंचित घटकाचा विकास साधावा म्हणून दि. ०५ मार्च रोजी नंदकुमार लाभसेटवार यांच्यासह ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, राजकुमार मूत्तेपवार, गोविंद केशवशेट्टी, नरेश ऱ्याकावार, बालाजी पांपटवार, संतोष उत्तरवार, अनिल डूब्बेवार, दीपक भावटनकर, सीताराम देबडवार, संतोष फुटाने यांनी थेट मंत्रालया समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न ही केला होता. तसेच दि. १५ ऑगस्ट रोजी आझाद मैदान, मुंबई येथे ईशारा आंदोलन करत ‘एक ही भूल, कमल का फूल….’ चा नारा देत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते.
याची दखल घेवून वन तथा सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार, आमदार मदनभाऊ येरावार, आमदार समीरभाऊ कुनावार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा घेतला. परिणामी राज्य शासनाने अद्यादेश काढून कोमटी समाजातील दुर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांकरीता शेतीपुरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणूक याचबरोबर लघु उद्योग, वाहतूक, अन्य व्यावसायिक उद्योग उपलब्ध करून देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून आर्थिक स्तर उंचावणे यासाठी हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. या महामंडळाचे शासकीय भागभांडवल सध्या ५० कोटी असणार आहे.
बहुप्रतिक्षीत या आर्थिक विकास महामंडळाचा अद्यादेश निघताच संपूर्ण राज्यभरातील कोमटी समाजाने आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे पदाधिकारी नंदकूमार लाभसेटवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, राजकुमार मुत्तेपवार, दिपक भावटनकर, नरेश ऱ्याकावार, संतोष उत्तरवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आनंदोत्सव साजरा केला. गावोगावी माता कन्यका परमेश्वरी मंदिरात आरत्या करून, फटाके फोडत त्यांचे सत्कार करण्यात आले.
याचा अल्पसा सारांश आपल्या भाषणातून मांडत संघर्ष समितीचे सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांनी उपस्थित समाजबांधवांना उद्देशून “आपल्या समाजाला हवं ते आपल्या राजकीय नेतृत्वाने आपल्याला दिले. आता आपल्या आ. सुधीर भाऊ, आ. मदन भाऊ, आ. समीर भाऊ यांना विक्रमी मताधिक्यांनी निवडून आणण्याची जबाबदारी, कर्तव्य आपले आहे. त्यादृष्टीने आपण या विधानसभा निवडणुकीत प्रचारक म्हणून, सोशल मीडिया वॉरीअर म्हणून सक्रिय होत आपल्या या राजकीय नेतृत्वाचा विक्रमी मताधिक्यांनी तसेच आपल्या समाजाला आपल्या समाजाचा घटनादत्त अधिकार देणाऱ्या महायुतीला बहुमताने निवडणून आणून आपले हे ५० कोटीचे महामंडळ किमान ५०० कोटीचे होण्याच्या दृष्टीने कार्य करावे….” असे भाष्य केले.
यवतमाळ येथील विवेकानंद विद्यालयाच्या पटांगणावर समाजाच्या कोजागिरी पोर्णिमा कार्यक्रमात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्यात संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार, सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, उपाध्यक्ष संतोष उत्तरवार, मार्गदर्शक गजानन बेलगमवार सर यांचा गौरव मदन भाऊ येरावार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. तसेच सोशल मीडिया प्रदेश प्रमुख वैभव कोडगीरवार यांचा गौरव शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून विजय भाऊ पालतेवार यांच्या हस्ते करण्यात आला तर महिला आघाडी प्रमुख जयाताई लाभसेटवार यांचा गौरव मिनल ताई येरावार यांच्या हस्ते करण्यात आला.
आ. मदन भाऊ येरावार, अध्यक्ष विजय पालतेवार, सौ. मिनल ताई येरावार, संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार, सचिव, ब्रह्मानंद चक्करवार यांच्या हस्ते माता कन्यका परमेश्वरीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करत या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष विजय पालतेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज चिंतावार यांनी केले.
सूत्रसंचालक सोनल गादेवार यांनी आपल्या मंत्रमुग्ध सूत्रसंचलनाने या कार्यक्रमात बहार आणली.
शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीने चांदण्यांचे रूप आलेल्या या कोजागिरी उत्सव आणि सत्कार सोहळ्याचा समारोप रुचकर भोजणाने आणि अमृतरूपी दुग्ध प्राशनाने झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रफुल झिलपिलवार, संजय येरावार, डॉ. महेश नालमवार, अनिल मुक्कावार, अनिल येरावार, अभय चिंतावार, शंतनू उत्तरवार, संजय बट्टावार, संदीप येरावार, शीतल यंबरवार, अमोल मुक्कावार, नीलेश भास्करवार आदी समाजबांधवांनी विशेष प्रयत्न केले.