Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकआर्य वैश्य समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ

आर्य वैश्य समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ

संघर्ष समितीच्या संघर्षाचे यश

मुंबई, दि. ०१ [प्रतिनिधी] :- आर्य वैश्य [कोमटी] समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी राज्यशासनाने श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. दि. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा अद्यादेश पारित करण्यात आला.

हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे म्हणून मागील दहा वर्षांपासून आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या वतीने सतत आंदोलने करण्यात आली. तरी शासन दखल घेत नसल्यामुळे संघर्ष समितीचे सचिव ब्रह्मानंद चक्करवार यांनी दि. ०२ ऑक्टोबर पासून प्राणांतिक उपोषण आंदोलनाचा इशारा दिला. परिणामी शासनाने दि. ३० सप्टेंबर रोजी याबाबत अद्यादेश काढून हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले.

असे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून शासनाने कोमटी समाजातील वंचित घटकाचा विकास साधावा म्हणून दि. ०५ मार्च रोजी नंदकुमार लाभसेटवार यांच्यासह ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, राजकुमार मूत्तेपवार, गोविंद केशवशेट्टी, नरेश ऱ्याकावार, बालाजी पांपटवार, संतोष उत्तरवार, अनिल डूब्बेवार, सीताराम देबडवार आदींनी थेट मंत्रालया समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न ही केला होता. तसेच दि. १५ ऑगस्ट रोजी आझाद मैदान, मुंबई येथे ईशारा आंदोलन करत ‘एक ही भूल, कमल का फूल….’ चा नारा देत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते.

याची दखल घेवून वन तथा सांस्कृतिक मंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा घेतला. कोमटी समाजातील दुर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांकरीता शेतीपुरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणूक याचबरोबर लघु उद्योग, वाहतूक, अन्य व्यावसायिक उद्योग उपलब्ध करून देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून आर्थिक स्तर उंचावणे यासाठी हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळाचे शासकीय भागभांडवल ५० कोटी असणार आहे.

बहुप्रतिक्षीत या आर्थिक विकास महामंडळाचा अद्यादेश निघताच संपूर्ण राज्यभरातील कोमटी समाजाने आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे पदाधिकारी नंदकूमार लाभसेटवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, राजकुमार मुत्तेपवार, दिपक भावटनकर, नरेश ऱ्याकावार, संतोष उत्तरवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आनंदोत्सव साजरा केला. गावोगावी माता कन्यका परमेश्वरी मंदिरात आरत्या करून, फटाके फोडत त्यांचे सत्कार करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे भव्य सत्कार
समाजनेते सुधीरभाऊंनी आर्य वैश्य समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा करताच आर्य वैश्य समाज छत्रपती संभाजीनगरच्या समाजबांधवांनी या महामंडळाचे जनक, संघर्ष योद्धा ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार केला.

या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत शिरपेवार तर भास्करराव चौधरी, रविंद्र लिंगावार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा सत्कार सोहळा यशस्वीपणे पार पडावा यादृष्टीने आशिष कोडगीरे, आशिष लाभसेटवार, बालाजी येरावार, श्रीपाद गडम, महेश चिद्रावार, श्रीकांत सराफ, गणेश मोरलवार, संजय तम्मेवार, अनिल कौलवार, ज्ञानेश्वर तगडपल्लेवार, सुशील बंडेवार, राजू चालीकवार, अनिकेत नील्लावार आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रेषित रुद्रवार यांनी केले.

हेही वाचा

लक्षवेधी