Sunday, December 22, 2024
Homeलेखएक लाख धनुष्याची ताकद असलेले गांडीव धनुष्य परत धारण करा....

एक लाख धनुष्याची ताकद असलेले गांडीव धनुष्य परत धारण करा….

अनेकदा जगात काय घडते, देशात काय घडते, राज्यात काय घडते, एवढेच काय आपल्या गावात काय घडते….? हे आपल्याला, आपल्यांपैकी काहींना माहीत नसते….ते माहीत व्हावे, त्यातून चांगले ते घेवून चांगले ते करता यावे यासाठी सामाजिक प्रसार माध्यमे असतात…

त्यातल्या त्यात प्रामुख्याने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळविण्यासाठी ही सामाजिक प्रसार माध्यमे असतात….त्यामुळेच आपण पाहतो की, बुद्धी मत्तेने आपल्या पेक्षा किमान पन्नास-शंभर वर्षे पुढे असलेल्या आणि विकासाच्या दृष्टीनेही आपल्या पेक्षा किमान काही वर्षे पुढे असलेल्या ब्रिटन, अमेरिका, इटली, जर्मनी या देशात सुद्धा या सामाजिक प्रसार माध्यमांद्वारेच राजकीय आणि सामाजिक उलथापालथ घडून आल्या आहेत….

ब्रिटन आणि अमेकरिकेत तर अवघ्या एका पोस्टने तेथील सत्तांतर घडून आले आहे….याचे एक प्रमुख कारण असे आहे की, लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून गणल्या जाणारा प्रसार माध्यम/प्रेस/मीडिया हा विकावू झाला आहे, सत्ता धाऱ्यांच्या हातचे बाहुले झाला आहे, विश्वासाच पात्र राहिलेला नाही…म्हणून आपल्या पेक्षा प्रगत राष्ट्रांत असो अथवा समाजात असो आता या सामाजिक प्रसार माध्यमांद्वारेच अन्यायाला वाचा फोडण्यात येत आहे, सत्य समाजा समोर मांडण्यात येत आहे, लढे-चळवळ उभारल्या जात आहेत….

आपल्या घटनादत्त हक्काच्या स्वतंत्र आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळाच्या लढ्यात ही आपण याच सामाजिक प्रसार माध्यमांवरील चर्चेने आणि नंतर प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातील बातम्यांद्वारे समाज मनात या विषयाचे महत्व, गरज रुजवत या लढ्याची ज्योत प्रज्वलीत करून लढा उभारू शकलो, चळवळ उभारू शकलो, टिकवू शकलो, समाजातील नतभ्रष्ट राजकीय-अराजकीय लोकांना शह देवून आपल्या हक्काचे, आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे *’श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ’* मिळवू शकलो….!

जर आपण काहीच्या काही कारणे पुढे करून, काहीच्या काही बोलून, नाही-नाही त्या पद्धतीने आपली तोंडदाबी करणाऱ्यांना घाबरून, आपल्यावर दडपशाही करणाऱ्यांना घाबरून गप्प बसलो असतो तर ना आपल्या लढ्याला न्याय मिळाला असता, ना आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम ठरू शकणारे हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊ शकले असते….त्यामुळे आज परत एकदा आपणा सर्वांना विनंती आहे, कोणत्याही स्वरूपाच्या दबावाला, दडपशाहीला जुमानू नका, थारा देवू नका आपल्या समाजाच्या प्रत्येक व्हाटस-अप ग्रुपवर, फेसबुकवर, एक्सवर आपल्या या घटनादत्त अधिकारा विषयी सतत बोलत राहा, लिहीत राहा….

या विषयात काय-काय घडत आहे, का घडत आहे….? दहा वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतरही, आपल्या हक्काच्या आर्थिक विकास महामंडळाच्या घोषणेनंतरही आपल्याला आपल्या या घटनादत्त अधिकारापासून अजूनही वंचित का ठेवण्यात येत आहे…? याची कारणमीमांसा झालीच पाहीजे….या विषयी प्रत्येक समाजबांधवांपर्यंत माहिती पोहोचविण्याची, जागृती करण्याची, लढ्याची ज्योत तेवत ठेवण्याची, मशाल धगधगत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे….ती आपण पार पाडत आलो आहोत, पार पाडत राहू…!

कारण आपल्या आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही…म्हणून लढा आणखीन संपलेला नाही….कालच दसरा झाला, आपण शमी पूजन केले, शस्त्र पूजन केले….एक लाख धनुष्यांची ताकद असलेले गांडीव धनुष्य आणि अक्षय भाते [आपली लेखनी आपले शब्द] परत धारण करा…!

अग्नीने प्रसन्न होऊन अर्जुनाला गांडीव धनुष्य आणि अक्षय भाते दिले होते….माता कन्यका परमेश्वरीने प्रसन्न होऊन आपल्याला लेखनी आणि अक्षय शब्दसंचय दिला आहे…समाजकंटक रावण दहनासाठी, समाजहितासाठी हा लेखनीरूपी गांडीव धनुष्य परत धारण करूया…!!

-ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार

 

हेही वाचा

लक्षवेधी