Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकआर्य वैश्य समाजाचा 'एक ही भूल, कमल का फूल....' चा नारा

आर्य वैश्य समाजाचा ‘एक ही भूल, कमल का फूल….’ चा नारा

'आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ' स्थापन करत नसल्याने धुमसत असलेल्या असंतोषाचा भडका !

नांदेड, दि. २१ [प्रतिनिधी] :- राज्य शासनाने ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे म्हणून मागील दहा वर्षांपासून निवेदने देवूनही, आंदोलने करूनही एवढेच नाहीतर यासाठी थेट मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न करूनही सरकार मध्ये प्रमुख राजकीय पक्ष असलेला ‘भाजप’ या मागणीची दखल घेत नसल्यामुळे आर्य वैश्य [कोमटी] समाज, महाराष्ट्र ने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘एक ही भूल, कमल का फूल….’ चा नारा देत ‘भाजप’ विरुद्ध प्रचार करण्याचा, ‘भाजप’ला धडा शिकविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ चे प्रदेशाध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार, सचिव ब्रह्मानंद चक्करवार, विभागीय अध्यक्ष दीपक भावटनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संघर्ष समिती द्वारे मागील दहा वर्षांपासून राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशन काळात विधानभनासमोर ही संघर्ष समितीच्या वतीने आंदोलने करण्यात आलीत. पण तरी शासन त्यांच्या मागणीची साधी दखल ही घेण्यास तयार नसल्यामुळे ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या पदाधिकाऱ्यांनी दि. ०५ मार्च २०२४ रोजी थेट मंत्रालया समोरच सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न ही केला.

एवढे होऊनही सरकार आणि सरकार मध्ये असलेले समाजाचे नेतेही मागणीची दखल घेवून समाजातील गोर-गरीब बांधवांना न्याय देत नसल्यामुळे ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने राज्यभरात आर्य वैश्य समाज हक्क परिषदेचे आयोजन करून समाजजागृती चे कार्य सुरू करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून दि. २१, रविवार रोजी शहरातील हॉटेल अतिथी येथे आर्य वैश्य समाज हक्क परिषद पार पडली. या परिषदेला मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, बीड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील समाजबांधवांची उपस्थिती दिसून आली. मागील दहा वर्षांपासून सातत्याने आर्थिक विकास महामंडळाची मागणी करूनही सरकार आपल्या मागणीकडे लक्ष देत नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘भाजप’ विरुद्ध प्रचार करण्याचा ठराव या परिषदेत सर्व संमतीने पारित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ज्या-ज्या विधानसभा मतदार संघात आर्य वैश्य [कोमटी] समाजाचे मताधिक्य आहे, परिणामकारक मतदार आहेत त्या-त्या विधानसभा मतदार संघात ‘एक ही भूल, कमल का फूल….’ चा नारा देत ‘भाजप’ ला धडा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघर्ष समितीचे सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांनी सांगितले. यासाठी ज्या-ज्या विधानसभा मतदार संघात समाजाचे परिणामकारक मतदार आहेत, त्या-त्या विधानसभा मतदार संघात पत्रके वाटून, घरोघरी भेटी देवून समाजजागृती मोहीम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे कळते.

आर्य वैश्य [कोमटी] समाज म्हणजे भाजप चा परंपरागत मतदार समजला जातो. नांदेड [द.], देगलूर, मुखेड, लोहा-कंधार, भोकर, नायगयाव-धर्माबाद-उमरी, लातूर, अहमदपूर, परभणी, गंगाखेड, जिंतूर, हिंगोली, हदगाव, उमरखेड-महागाव, पुसद, आर्णी, वणी, यवतमाळ, दारव्हा-दिग्रस, हिंगणघाट, चंद्रपूर, राजुरा आदी विधानसभा मतदार संघात या समाजाचे मतदान परिणामकारक आहे. तसेच आर्य वैश्य [कोमटी] समाज हा व्यापारी समाज म्हणून, सामाजिक जाणिवा असलेला संवेदनशील समाज म्हणून सामान्य मतदारांची मने, मते वळविण्याची राजकीय सक्षमता असलेला समाज म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही विधानसभा मतदार संघात ओळखल्या जातो. असा हा भाजपचा परंपरागत मतदारच जर ऐन विधानसभा निवडणुकीत ‘एक ही भूल, कमल का फूल….’ चा नारा देत भाजप विरुद्ध प्रचार करणार असेल तर याचा काय परिणाम विधानसभा निवडणुक निकालावर होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही, अशी चर्चा नांदेडसह मराठवड्यात रंगत आहे.

या पत्रकार परिषदेला नंदकूमार लाभसेटवार, ब्रह्मानंद चक्करवार, राजकुमार मुत्तेपवार, बालाजी पांपटवार, प्रवीण गादेवार, संतोष उत्तरवार, गोविंद केशवशेट्टी, नरेश ऱ्याकावार, राजेश कौलवार, श्रीपाद रायेवार, विनोद वट्टमवार, दीपक भावटनकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा

लक्षवेधी