अहमदाबाद, दि. २७ [वृत्तसंस्था] :- साधारणपणे सत्तर च्या दशकात महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील चांदिपुरा भागात लहान मुलांसाठी काळ ठरलेल्या भयावह ‘चांदिपुरा’ व्हायरस ने गुजरात मध्ये डोके वर काढले असून या व्हायरसमुळे आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘चांदिपुरा’ व्हायरस हा एक प्रकारचा ‘आरएनए’ व्हायरस असून तो सर्वप्रथम नागपूरच्या चांदिपुरा भागात सत्तरच्या दशकात आढळला होता. त्याकाळी या व्हायरसने शेकडो बालकांचा मृत्यू ओढावला होता. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात या व्हायरसला ‘चांदिपुरा’ या नावाने संबोधल्या जाते. मागील काही दिवसांपासून गुजरात मध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, उलट्या होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्या बाळकांची संख्या वाढत चालली आहे.
याबाबीने खडबडून जाग आलेल्या केंद्रीय आरोग्य यंत्रणेने गुजरात मधील बाधित भागास भेट देवून तेथील बाधित मुलांचे रक्ताचे नमुने संकलित केले. ते पुण्याला पाठविले. त्यातून हा ‘चांदिपुरा’ व्हायरस असल्याचे सिद्ध झाल्यानंतर केंद्रीय पथकातील डॉ. अर्पित ओबेरॉय यांनी या व्हायरस विषयी माहिती देतांना, “एक प्रकारचा ‘आरएनए’ असलेला हा व्हायरस सर्वप्रथम नागपूरच्या चांदिपुरा भागात सत्तर च्या दशकात आढळला होता. हा व्हायरस मुलांना लक्ष करतो. त्यामुळे मुलांची काळजी घ्या, मुलांमध्ये अधिक प्रमाणात ताप आढळून आल्यास ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्या. हा व्हायरस मुलांच्या मेंदुवर आघात करतो. ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब ही लक्षणे आढळून येणाऱ्या १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांची विशेष काळजी घ्या.” असे म्हटले आहे.
आजमितीला या व्हायरस ने गुजरात मध्ये ४८ बालकांचा मृत्यू ओढवला असून जवळपास दीडशे च्या वर बालके या व्हायरसने गंभीर असल्याचे कळते.