नांदेड, दि. १५ [प्रतिनिधी] :- आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या वतीने दि. २१ जुलै, रविवार रोजी नांदेड येथे ‘आर्य वैश्य समाज हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या हक्क परिषदेत आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ आंदोलनाच्या पुढील दिशेवर चर्चा होणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार यांनी सांगितले.
याबाबत प्रसार माध्यमांकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केल्याप्रमाणे राज्य शासनाने ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करून आर्य वैश्य [कोमटी] समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला न्याय द्यावा, गोर-गरीब समाजबांधवांचे कल्याण करावे म्हणून ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने मागील दहा-बारा वर्षांपासून निवेदने देण्यात येत आहेत, आंदोलने करण्यात येत आहेत. पण शासन त्यांच्या मागणीची दखल घेत नसल्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने दि. ०५ मार्च २०२४ रोजी मंत्रालया समोर सामूहिक आत्मदहन आंदोलन ही करण्यात आले होते. आंदोलकांकडून एवढे टोकाचे पावूल उचलण्यात येवूनही अद्याप पावेतो शासन बघ्याचीच भूमिका घेत आहे.
त्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने दि. २१ जुलै पासून जिल्ह्या-जिल्ह्यात ‘आर्य वैश्य समाज हक्क परिषद’ चे आयोजन करण्यात आले असल्याचे कळते. या हक्क परिषदेत आंदोलनाच्या पुढील दिशेवर चर्चा करण्यात येवून वारंवार मागणी करूनही, आंदोलने करूनही शासन ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करणार नसेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याबाबत विचार विनिमय करण्यात येणार असल्याचे कळते. याचाच भाग म्हणून दि. २१ जुलै, रविवार रोजी ११.३० वाजता हॉटेल विसावा, आयटीआय कॉर्नर जवळ, नांदेड येथे आर्य वैश्य समाज हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या हक्क परिषदेस सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहून आप-आपली मते मांडावीत, असे आवाहन संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार यांनी केले आहे.