Sunday, December 22, 2024
Homeप्रादेशिकसंतापजनक : गुंडाने छेड काढली, पोलिसांनी शिवीगाळ केली, पीडितेने मृत्यूला कवटाळले!

संतापजनक : गुंडाने छेड काढली, पोलिसांनी शिवीगाळ केली, पीडितेने मृत्यूला कवटाळले!

लातूर, दि. ०७ [विनोद वट्टमवार] :- गुंडाने छेड काढली, विनय भंग केला म्हणून पोलीस तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडितेलाच पोलीस कर्मचाऱ्यांनी ५ हजारांची लाच मागत शिवीगाळ केल्याने हा अपमान सहन न झालेल्या पीडितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना लातूर येथील विठ्ठल नगर, वडार वस्ती येथे दि. ०६, गुरुवार रोजी घडली.

या हृदयद्रावक आणि तितक्याच संतापजनक घटनेने संपूर्ण लातूर शहर हादरले. जनतेच्या संरक्षणाची आणि त्यातल्या त्यात महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस एवढे बेजबाबदार, एवढे क्रूर कसे होऊ शकतात? हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. या संपूर्ण घडनेविषयी प्राप्त माहितीनुसार गावगुंड सुभाष गंगाराम लष्करे याने दि. ०६, गुरुवार रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास संबंधीत पीडितेच्या घरात बळजबरी घुसून तीच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण संबंधीत पीडितेने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजुचे लोकं जागे होऊन त्यांनी गावगुंड सुभाष लष्करे यास पकडले, त्यास चोप दिला. पण त्याला पकडणाऱ्या, चोप देणाऱ्या अशोक झाकणे, मच्छिंद्र, नागू इटकरे यांच्या तावडीतून पळ काढत घटनास्थळा वरुन तो पसार झाला.

या सर्व प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी आणि सुभाष लष्करे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी म्हणून संबंधीत पीडितेने आणि तिच्या नातेवाइकांनी तात्काळ विवेकानंद चौक पोलीस स्टेशन गाठले. पण पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. त्यांची तक्रार दाखल करून गावगुंड सुभाष याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी रक्कम रुपये ५ हजारांची लाच मागितली. एवढेच नाहीतर सदर पीडितेस व तिच्या नातेवाईकांना पोलीस कर्मचारी दमगूडे याने आणि त्याच्या साथीदार पोलीस कर्मचाऱ्याने शिवीगाळ ही केली. त्यामुळे या सर्व अपमानजनक, अन्यायकारक बाबीला कंटाळून संबंधित पीडितेने पोलीस स्टेशन मधून बाहेर पडून थेट विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.

एकीकडे गावगुंडाचा त्रास, गावगुंडाकडून विनयभंग आणि दुसरीकडे पोलिसांकडून मानसिक छळ यामुळे त्रस्त झालेल्या त्या अबला नारीने मृत्यूला कवटाळल्याचे स्पष्ट होत असून ही संपूर्ण घटना म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे या घटनेप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत गावगुंड सुभाष लष्करे यास अटक करावी तसेच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यांवर ही मृत्यूस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करावी, अशी मागणी मयत पीडितेच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, एका निर्दोष अबलेचा जीव घेणाऱ्या या सगळ्या अपमानजनक, संतापजनक प्रकाराबाबत मयत पीडितेच्या नातेवाइकांनी आज दि. ०७, शुक्रवार रोजी केलेल्या पोलीस तक्रारीची दखल लातूर शहरातील सामाजिक संघटनांनी घेतली आहे. जोपर्यंत मयत पीडितेची छेड काढणाऱ्या सुभाष लष्करे यास अटक करण्यात येणार नाही आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार नाही तोपर्यंत मयत महिलेचे शव ताब्यात घेणार नाही, तीचा अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या नातेवाइकांनी आणि सामाजिक संघटनांनी घेतली असल्याचे कळते.

हेही वाचा

लक्षवेधी