Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिक'जनजागृती' इफेक्ट : महिलेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

‘जनजागृती’ इफेक्ट : महिलेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

लातूर, दि. ०७ [विनोद वट्टमवार] :- अतिप्रसंग ओढवलेल्या पिडीत महिलेची तक्रार घेवून आरोपी सुभाष लष्करे वर कायदेशीर कार्यवाही करावयाची सोडून पिडीत तक्रारदार महिलेलाच शिवीगाळ करत, तिच्या जिव्हारी लागेल असा तीचा अवमान करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची संतापजनक घटना दि. ०६, गुरुवार रोजी लातूर येथे घडली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या क्रूरतेचे वृत्त सर्वप्रथम ‘दै. जनजागृती’ ने प्रकाशित केले. या वृत्ताची, या संतापजनक घटनेची दखल पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी घेवून दोषी पोलीस कर्मचारी रतन शेखलाल शेख यास निलंबित केले.

या विषयी सोमय मुंडे, पोलीस अधिक्षक, लातूर यांनी अधिकृतपणे आदेश काढून हे जाहीर केले. प्राप्त माहितीनुसार येथील वैशाली नगर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर गावगुंड सुभाष लष्करे याने दि. ०६, गुरुवार रोजी मध्यरात्री तिच्या घरात बळजबरी घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा कुप्रयास केला. या घटनेने भेदरलेल्या पिडीत महिलेने आरडा-ओरड केली. परिणामी आजूबाजूच्या रहिवाशांना जाग येवून ते तिच्या मदतीसाठी धावले. त्यांनी तिचे रक्षण केले. तसेच आरोपी सुभाष लष्करे यास पकडून चांगलाच चोप दिला. पण तो घटनास्थळावरुन पळ काढून फरार झाला.

त्यामुळे या घटनेबाबत पोलीस तक्रार करून आरोपी सुभाष लष्करे यास अटक व्हावी म्हणून पिडीत महिला, तिचे नातेवाईक व शेजारील रहिवासी यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठले. त्यांनी तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपबीती सांगत या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची विनंती केली. पण कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार रतन शेखलाल शेख याने आणि त्याच्या सहकाऱ्याने पिडीत महिलेची तक्रार घेवून आरोपीवर कार्यवाही करायचे सोडून पिडीत महिलेला व तिच्या नातेवाइकाला शिवीगाळ करत अपमानजनक वागणूक दिली. तसेच त्यांच्याकडे रक्कम रुपये ५ हजारांची लाच मागितली.

या सगळ्या प्रकाराने पिडीत महिला हतबल, हताश झाली. गाव गुंडाने केलेला विनयभंग, पोलिसांनी दिलेली अवमानजनक वागणूक तिच्या जिव्हारी लागली आणि तिने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी मारून मृत्यूला कवटाळले. या संतापजनक आणि तितक्याच हृदयद्रावक घटनेने लातूर शहर हादरले. पण एरवी नको त्या विषयावर तासंतास प्रकाश टाकणाऱ्या कोणत्याही प्रकाश वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधींनी, कोणत्याही वृत्त पत्राच्या प्रतिनिधीने तत्परतेने या घटनेचे वृत्त प्रसारीत केले नाही. परिणामी या घटनेची, मयत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीची दखल वरिष्ठ पोलीस अधिकारी तत्परतेने घेण्यास तयार नव्हते. ही बाब लक्षात घेवून ‘दै. जनजागृती’ने माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचे वृत्त प्रसारीत केले.

ह्या वृत्ताने पाहता-पाहता संतापाचा स्फोट झाला. शेकडोच्या संख्येने सामान्य नागरिक पोलीस अधिक्षक कार्यालय, लातूर येथे जमा झाले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नराधम गावगुंड सुभाष लष्करे यास त्वरीत शोधून अटक करण्याची आणि संबंधित मयत पिडीत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या क्रूर पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे लावून धरली. वाढता जनक्षोभ लक्षात घेवून पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. त्यांनी सत्यता जाणून घेण्यासाठी दि. ०६, गुरुवार रोजीचे पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथील सिसिटीव्ही पुटेज स्वत: तपासून पाहिले. तसेच ईतर काही बाबी पडताळून पाहिल्या आणि दोषी पोलीस कर्मचारी रतन शेखलाल शेख याच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तसेच पिडीत महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली असल्याचे कळते.

 

हेही वाचा

लक्षवेधी