Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकनिवडणूक निकालाकडे डोळे लावून न बसता विकास कामांवर, जनसेवेवर मूनगंटीवारांचा 'फोकस'

निवडणूक निकालाकडे डोळे लावून न बसता विकास कामांवर, जनसेवेवर मूनगंटीवारांचा ‘फोकस’

चंद्रपूर, दि.२२ :- राजकारण म्हणजे समाजसेवेचे माध्यम असून निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव होय. त्यामुळे निवडणूक काळाचा, आचारसंहितेचा बाऊ करून विकास कामांकडे दुर्लक्ष करत निवडणूक निकालाकडे डोळे लावून बसण्यापेक्षा जनसेवेचे कार्य कर्तव्य भावनेने करत राहिले पाहिजे, असा संदेश आपल्या कृतीतून देत चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी आपल्या मतदार संघात मतदान पार पडताच विकास कामांवर लक्ष केंद्रित केल्याचे पहावयास मिळत आहे.

याचाच भाग म्हणून विसापूर येथे साकारास येत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या बांधकामाची पाहणी मूनगंटीवार यांनी दि. २२, बुधवार रोजी केली. ही पाहणी करतांना मूनगंटीवार यांनी या अद्ययावत केंद्राच्या बांधकामाची उत्कृष्ट गुणवत्ता राखण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर येथील विसापूरमध्ये ५० एकर जागेत ६२ अभ्यासक्रम असलेले ‘एसएनडीटी’ विद्यापिठाचे विदर्भातील सर्वात मोठे महिला सक्षमीकरण केंद्र साकारास येत आहे. मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या केंद्रामध्ये तरुणी व महिलांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. या केंद्राच्या बांधकामाची पाहणी मूनगंटीवार यांनी आज केली. याप्रसंगी त्यांनी नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर अध्यक्ष काशी सिंग, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपविभागीय अभियंता संजोग मेंढे आदींची उपस्थिती होती.

सदर केंद्राच्या बांधकामाला सुरुवात झालेली असून यामध्ये वाचनालय, प्रेक्षागृह इमारत, शैक्षणिक इमारत आदींचा समावेश आहे. चंद्रपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमधील तरुणी व महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण घेता यावे, यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊन महिलांचे आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य जपता यावे तसेच विकासाच्या प्रवाहात महिलांना सामावून घेता यावे, या उद्देशाने पालकमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी ‘एसएनडीटी’ विद्यापीठात महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने भव्य आणि देखण्या इमारतीच्या निर्माणासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

या प्रकल्पाचे काम गतीने सुरू असून या केंद्राच्या माध्यमाने लवकरच सर्व समाजातील तरुणी व महिलांसाठी कौशल्य विकासाचे एक नवे दालन खुले होणार आहे. याठिकाणी दरवर्षी तीनशे मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेता यावे याकरिता तीनशे मुलींचे वस्तीगृह उभारण्याच्या दृष्टीने ही मूनगंटीवार यांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे कळते. या प्रकल्पाविषयी माध्यम प्रतिनिधींना माहिती देतांना मूनगंटीवार यांनी, “चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी ५८९.९३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रातील हे एक आगळेवेगळे उत्कृष्ट असे महिला सक्षमीकरण केंद्र उभारल्या जात असून हे केंद्र लवकरात-लवकर समाजाला समर्पित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत….” असे सांगितले.

हेही वाचा

लक्षवेधी