Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिक'भाऊ बोलले, विषयच संपला....विजय जयश्री ताईंचाच...!'

‘भाऊ बोलले, विषयच संपला….विजय जयश्री ताईंचाच…!’

विभाग प्रमुख रवी वांड्रसवार यांचा दावा

दारव्हा, दि. २५ [जया लाभसेटवार] :- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात उद्या दि. २६, शुक्रवार रोजी मतदान होणार असून काल सायंकाळ पासून प्रचार तोफा थंडावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता गठ्ठा मतांच्या, मतदारांच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाने गती घेतली आहे. यातही यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसेना-मित्रपक्ष ‘महायुती’च्या उमेदवार जयश्री ताई हेमंत पाटील यांच्या विजयासाठी मुत्सद्देगिरीने आधीच राजकीय चाली चालून बाजी मारली असल्याने जयश्री ताई पाटील यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.

याचीच प्रचिती प्रचार तोफा थंडावण्याच्या पूर्व संध्येला आली. जयश्री ताई पाटील यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेता गोविंदाच्या उपस्थितीत पालकमंत्री संजय राठोड यांनी नेर येथे वाहन फेरी काढून प्रचार सभा घेतली. तसेच त्यानंतर त्यांनी लगोलग दारव्हा येथे ही प्रचार फेरी काढली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने संजय राठोड यांचे जागोजागी स्वागत करत, त्यांना हस्तांदोलन करत, त्यांच्याशी संवादीत होत भरघोस मतदानाबाबत त्यांना आश्वस्त केले. जयश्री ताई पाटील यांच्या विजयासाठी संजय राठोड यांनी मागील ८-१० दिवसांपासून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघ पिंजून काढत जयश्री ताईंच्या विजयासाठी स्वत:ला वाहून घेतले. संजय राठोड यांची ही कर्तव्यदक्षता, तळमळ लक्षात घेवून या मतदार संघातील बहुसंख्य मतदार म्हणून गणल्या जाणाऱ्या बंजारा-मराठा समाजाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, सजग मतदारांनी ही दिवस-रात्र एक करत वाड्या, वस्त्या, गावं पालथे घालत मतदान जागृती केली. मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य, योगदान, मतदारांप्रतीची त्यांची बांधिलकी, तळमळ, कर्तव्य दक्षता, देशातील सामान्य माणसांसाठी त्यांनी आणलेल्या योजना याबाबत जाणीव करून दिली.

त्याचेच पडसाद संजय राठोड यांनी काढलेल्या वाहन फेरीत दिसून आले, अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे. याबाबत प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना शिवसेना विभाग प्रमुख रवी वांड्रसवार यांनी, “संजू भाऊ बोलले….बोलले…विषयच संपला….विजय जयश्री ताई हेमंत पाटील यांचाच होणार…विरोधी उमेदवाराला पैसा फेकून जे साध्य करता आले नाही, ते आमच्या उमेदवार जयश्री ताई पाटील आणि आमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रेमाने, आपल्या कार्याने साध्य केले…विरोधी उमेदवाराला संजू भाऊ राठोड यांची ताकद काय आहे, ते कळले आणि संजय भाऊ यांच्या ताकदी समोर आपला टिकाव लागणार नाही, ते ही कळले….म्हणून मागच्या दोन-तीन दिवसांपासून विरोधी उमेदवार स्वत: कॉल करून भाऊंच्या कार्यकर्त्यांना लालूच देत आहे, त्यांच्या घरी बंडलं पाठवत आहे…पण पैशाने सगळं विकत घेता येत नसते, हे त्याला डोके फोडून सांगितले तरी कळणार नाही….! पैशाने ना कार्यकर्ते विकत घेता येतात, ना मतदान विकत घेता येते….हे सगळं मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना जीव लावणारा, मतदारांना आपला कुटुंब सदस्य समजणारा संजय भाऊ राठोड व्हावे लागते….” अशा स्फोटक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकूणच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत रंगल्याचे चित्र संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यकाळात पहावयास मिळाले आणि या लढतीत जननायक संजय राठोड यांच्या दांडग्या जनसंपर्काच्या बळावर, त्यांच्याप्रती जनतेत, सामान्य मतदारात असलेल्या प्रेम भावनेच्या बळावर, त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीच्या बळावर धनशक्ती रूपी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना मात देत शिवसेना-मित्रपक्ष ‘महायुती’च्या उमेदवार जयश्री ताई हेमंत पाटील विजयी होतांना दिसून येत आहेत. 

हेही वाचा

लक्षवेधी