जळकोट, दि. १० [विनोद वट्टमवार] :- तालुक्यातील मंगरूळ गाव परिसरात दि. ०९, मंगळवार रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. या अवकाळी पावसाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार नागपूर, यवतमाळ परिसराप्रमाणेच लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात अवकाळी पाऊस धो-धो बरसला. चक्रीवादळ सदृश्य जोराचा वारा आणि त्यात पावसाचा मारा यामुळे शेत मालाचे अतोनात नुकसान झाले. कुठे झाडे उन्मळून पडली तर कुठे शेतकरी माणसे…! जोराच्या वाऱ्याने ना घरावर छत ठेवले, तुफान पावसाने ना शेतात पीक ठेवले…!!
चांगल्या बहरून आलेल्या केशर आंब्याच्या बागा च्या बागा होत्याच्या नव्हत्या झाल्या. या जोराच्या अवकाळी पावसाने संपूर्ण परिसरातील केशर आंबा उत्पादकांचे अतोनात नुकसान केले.
यामुळे मंगरूळ परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. आता या अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी निवडणुक प्रचारात व्यस्त असलेल्या मंत्र्यांनी थोडासा वेळ काढून त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला द्याव्या, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.