Monday, December 23, 2024
Homeराजकीय"देशाच्या, राज्याच्या हितासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा....विधानसभेच्या तयारीला लागा..."

“देशाच्या, राज्याच्या हितासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा….विधानसभेच्या तयारीला लागा…”

राज ठाकरेंचे 'मन-सैनिकांना' आदेश

मुंबई, दि. ०९ [विनोद वट्टमवार] :- मागील जवळपास तीस वर्षांपासून या देशाने असे स्थीर सरकार पाहिले नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. देश खड्यात जाईल की, वर ऊंच जाईल हे या निवडणूक निकालातून ठरणार आहे, त्यामुळे राज्याच्या, देशाच्या हितासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बीनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मन-सैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

शिवाजी पार्क येथे गुढी पाडव्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेतून ते बोलत होते. आपल्या आटोपशीर भाषणाची सुरुवात त्यांनी मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी उठविण्यात येत असलेल्या वावड्यांचा खरपूस समाचार घेत केली. “मला मुख्यमंत्री केले नाही म्हणून किंवा मला मुख्यमंत्री पदावरून हाकलले म्हणून मी मोदींचा विरोध केला नाही. २०१९ च्या निवडणुकीत मी जो काही टोकाचा विरोध केला, तो त्यांच्या भूमिकेच्या अनुषंगाणे होता. त्यांच्या बोलण्या आणि कृतीतील तफावतीमुळे होता. मी कधीच व्यक्तिगत स्वार्थासाठी मोदींच्या पाठीमागे ऊभा राहिलो नाही किंवा मोदींना विरोध केला नाही. तर राज्याच्या, देशाच्या हिताचा विचार करूनच मी भूमिका घेत गेलो. म्हणूनच त्यांना पंतप्रधान करण्यात यावं म्हणून मत मांडणारा ही पहिला मीच होतो आणि जेंव्हा ते बोलले तसा विकास होत नाहीय हे दिसले तेंव्हा त्यांचा टोकाचा विरोध करणाराही मीच होतो. परत कलम ३७० ला जाहीरपणे पाठिंबा देत ट्वीट करणारा ही पहिला मीच होतो, त्या समर्थनार्थ मोर्चा काढणारा, जाहीर सभा घेणारा ही मीच होतो.” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांना टोला लगावत राज यांनी मोदींसंदर्भात आपल्या बदलत्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाणे राज ठाकरे काय भूमिका घेणार? दिल्लीत अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीत नेमके काय घडले? हे राज यांच्या तोंडून ऐकून घेण्याच्या दृष्टीने राज्यातील जनतेचे कान मागील काही दिवसांपासून टवकारलेले होते. यावर बोलतांना राज ठाकरे यांनी, “तू इतक्या जागा घे, मी इतक्या जागा घेतो….तू ह्या जागा ठेव, मी ह्या जागा ठेवतो…नाही-नाही मी ही जागा सोडणारच नाही, मला ती जागा नकोच, हीच हवी…! असे मला कधी जमले नाही, जमणार ही नाही. खरं सांगायचं म्हणजे मी अशा जागा वाटपाला शेवटचा १९९५ ला बसलो होतो. त्यानंतर कधीच बसलो नव्हतो आणि त्यासाठी दिल्लीला गेलो ही नव्हतो. अमुक मिळवण्यासाठी किंवा तमुक मिळाले नाही म्हणून मी कधीही मोदींना विरोध केला नाही. माझा विरोध त्यांच्या सारखा व्यक्ती द्वेष म्हणून कधीच नव्हता तर भूमिकेला होता. म्हणूनच आज देशाच्या, राज्याच्या हिताचा विचार करून फक्त मोदींसाठी मी बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे….विधानसभेच्या तयारीला लागा…जर देशाच्या, राज्याच्या दृष्टीने अपेक्षीत असे काही झालेच नाहीतर राज ठाकरेचं तोंड आहेच बोलायला….” अशा मोजक्या आणि सूचक शब्दांत महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करत मन-सैनिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी आपल्या भाषणातून राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील तरुणांच्या कल्याणाच्या दृष्टीने काहीतरी भल्याचे करा, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच मतदार म्हणून जनतेकडून ही राजकीय व्याभिचाराला राज मान्यता न देण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या.

हेही वाचा

लक्षवेधी