Monday, December 23, 2024
Homeलेखन्याय : मिळणे आणि मिळवणे.... 

न्याय : मिळणे आणि मिळवणे…. 

“दहा दोषी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा व्हावयास नको….” या एका प्रांजळ पण घातकी विचार केंद्रित भारतीय दंड विधानाने आपली संपूर्ण प्रशासन आणि न्याय व्यवस्थाच भ्रष्टाचार रूपी भस्मासुराच्या स्वाधीन करून टाकली…असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही….

कायद्याचा दुरुपयोग करून कोणी निर्दोषला फासावर चढवूनये, दंड विधानाचा गैरवापर होऊन जनतेचा लोकशाही वरील विश्वास उडूनये, हा या मागील हेतू. पण झाले, होत आहे नेमके उलटे….”दहा दोषी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा व्हावयास नको….” या विचार केंद्रित दंड विधानाचा सोयीनुसार वापर करून दोषीना निर्दोष सिद्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व ‘कर्तव्य’ पोलीस प्रशासन व्यवस्था ‘कर्तव्यतत्पर भावनेने’ पार पाडतांना दिसून येते…ज्या-ज्या प्रकरणात असे होते, त्या-त्या प्रकरणात संबंधित पिडीत, अन्यायग्रस्त न्याय मिळण्यासाठी मा. न्यायालयात जेवढे प्रयत्न करतांना दिसतात, तेवढेच प्रयत्न ते न्याय मिळविण्यासाठी सामाजिक व्यासपीठावर, समाजमाध्यमांवर करतांना दिसून येतात…

ज्यावेळी न्याय मिळत नाही, मिळणार नाही….हे पीडितांना लक्षात येते, तेंव्हा ते न्याय मिळण्याची वाट न पाहता न्याय मिळविण्याच्या दृष्टीने पावले टाकतात…तसा विचार करतात…अशावेळी त्यांना प्रसार माध्यमं, सामाजिक प्रसार माध्यमं हे प्रति न्यायालय वाटतात….म्हणूनच आपण पाहतो की, अनेक लोकरूची असलेल्या प्रकरणांच्या सुनावण्या मा. न्यायालयात सुरू होण्याच्या तोंडावर अनेक प्रकाश वृत्त वाहिन्यांवर समांतर न्यायालय स्वरूप चर्चासत्र रंगतात…

अशाच भावनेतून अंकुरास आलेला एक प्रकार सध्या नमिता आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाणे सामाजिक प्रसार माध्यमांवर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नमिता कैलास चौधरी नामक महिलेच्या आत्महत्या सदृश्य मृत्यूची घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली. पंधरा वर्षांचा संसार, दोन अपत्य अशी पार्श्वभूमी असलेल्या या महिलेच्या प्राणोत्क्रमणाची नोंद पोलीस प्रशासनाने आकस्मित मृत्यू म्हणून केली….”घटनेची नोंद आत्महत्या म्हणून नाही तर हत्या म्हणून करा….आरोपींना तात्काळ अटक करा…” म्हणून दुर्दैवी नमिताचे माता-पिता आक्रोश करत असतांनाच पोलिस प्रशासनाने संशयास्पद भूमिका वटवत संबंधित आरोपी फरार झाल्याचे घोषित केले…!

“दहा दोषी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा व्हावयास नको….” हीच भावना या मागे असेल कदाचित आणि याच ‘कर्तव्य’ भावनेने त्यांनी हे ‘सद् रक्षणाय, खल निग्रहणाय…’ कार्य केले असेल कदाचित…

या घटनेत पोलिसांनी वटविलेली ही साशंक भूमिका, मयत नमिताच्या आरोपी पतीची या घटनेतील संशयीत भूमिका याबाबत समाज माध्यमांवर सध्या जोरदार समांतर न्यायालय स्वरूप ‘सुनावणी’ सुरू आहे. मयत नमिताच्या कुटुंबियांकडून न्यायाच्या अपेक्षेने, अनुभूतीने हे चर्चासत्र रंगवण्यात येत आहे तर आरोपी कैलास चौधरीच्या कुटुंबियांकडून हे प्रति-न्यायालय रूपी चर्चासत्र नेमके का सुरू आहे? हे लक्षात न घेता दडपशाही पद्धतीने हे चर्चासत्र बंद पाडण्याचे कुप्रयास सुरू आहेत.

हं चर्चा सत्रात झालेला, होऊ शकणारा अपशब्दांचा वापर, बेच्छूट आरोप याला होणारा आक्षेप समजू शकतो….पण यावर बिलकुलच कोणीच बोलायचे नाही, लिहायचे नाही…ही दडपशाही का…? कशासाठी…? मयत नमिताचे दुर्दैवी माता-पिता करताहेत त्या आरोपात सत्यता असेल अथवा नसेल….परंतु या गुन्ह्यातील आरोपितांची निर्दोष मुक्तता होईल, अशी व्यवस्थित ‘कर्तव्यतत्परता’ पोलीस प्रशासन पार पाडतांना दिसून येत आहे, हे मात्र नक्की…!

नमिता प्रकरणातील आरोपितांनी कोणता गुन्हा केला असेल, नसेल माहीत नाही….पण पुरावे नष्ट करण्याचा, पुराव्यांशी खेळ करण्याचा गुन्हा त्यांनी केला…हे मात्र नक्की….! ही कदाचित पहिलीच अशी आत्महत्येची घटना असावी ज्यात फासाला लटकलेल्या व्यक्तिला दवाखान्यात दाखल करण्याची जशी काळजी घेण्यात आली तशीच त्या व्यक्तीने ज्या साडीने गळफास घेतला, ती साडी पद्धतशीर काढून, घडी करून कपाटात ठेवण्याची ही काळजी घेण्यात आली…!

एकूणच आरोपितांच्या, पोलीस प्रशासनाच्या साशंक भूमिकेने संशयाला जागा करून दिली. न्याया विषयी अविश्वास निर्माण केला. त्यामुळे या घटनेत न्याय मिळण्याची वाट न पाहता समाज माध्यमांना प्रतिरूप न्यायालय समजून त्यावर चर्चा स्वरूप ‘सुनावणी’ घेवून सामाजिक न्याय मिळवण्याचा प्रयत्न दु:खद कुटुंबियांकडून केल्याजात आहे….

ब्रह्मानंद चक्करवार….🖋️

हेही वाचा

लक्षवेधी