Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकखिचडी घोटाळ्यातील खरे आरोपी संजय राऊत, गुन्हा दाखल करून अटक करा-संजय निरुपम

खिचडी घोटाळ्यातील खरे आरोपी संजय राऊत, गुन्हा दाखल करून अटक करा-संजय निरुपम

बोगस व्यक्ति, बोगस कंपनी, बोगस रेस्टॉरंट दाखवून केला आठ कोटीचा भ्रष्टाचार

मुंबई, दि. ०८ [मयूर मामीडवार] :- खिचडी घोटाळ्याचे खरे सूत्रधार संजय राऊत हेच असून अमोल किर्तीकर आणि ईतर आरोपी हे फक्त मोहरा आहेत. त्यामुळे या प्रकरणात संजय राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करत कॉँग्रेसचे बहिष्कृत नेते संजय निरुपम यांनी आज खळबळ उडवून दिली आहे.

ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या खिचडी घोटाळ्यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना [उबाठा] पक्षाने अमोल किर्तीकर यांना मुंबई [उत्तर-पश्चिम] मधून उमेदवारी घोषित केल्यानंतर “आपण खिचडी घोटाळ्यातील आरोपींचा, त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार नाही…” असे ठणकावून सांगत कॉँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नुकताच कॉँग्रेसचा राजीनामा दिला. आता आज याच प्रकरणी आक्रमक भूमिका घेत त्यांनी ‘उबाठा’ पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी करून खळबळ उडवली आहे.

याबाबत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी या प्रकरणात संजय राऊत कसे दोषी आहेत? याचे पुरावे माध्यम प्रतिनिधीसमोर सादर केले. ‘कोरोना’ काळात मुंबईतील स्थलांतरीत मजुरांची अन्नासाठी वणवण होऊ नये म्हणून स्थलांतरीत मजुरांना अन्न [खिचडी] पुरवठा करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राट काढले होते. हे कंत्राट संजय राऊत यांच्याशी अत्यंत जवळीक असलेल्या सेना कार्यकर्त्याला देण्यात आले होते. त्यासाठी राऊत यांनी अमोल किर्तीकर यांच्या माध्यमाने एक कोटीची लाच घेतली होती. अमोल किर्तीकर यांनीच सदर कंत्राटासाठी ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’ अशी कंपनी दाखवून हे कंत्राट अप्रत्यक्षपणे घेतले होते. निरूपम यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार अमोल किर्तीकर आणि संजय राऊत यांनी यासाठी सुनील उर्फ बाळा कदम नावाचा बोगस व्यक्ति ऊभा केला.

एवढेच नाहीतर सदर कंत्राट मिळविण्यासाठी कंत्राटदाराकडे स्वत:चे स्वयंपाकघर [रेस्टॉरंट] असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेवून किर्तीकर आणि राऊत यांनी गोरेगाव येथील ‘पर्शियन दरबार’ या रेस्टॉरंटशी करार झाल्याचे बोगस कागदपत्रे तयार करून ते दाखल करून हा कंत्राट मिळविला. याबाबत अमलबजावणी संचालनालयाच्या [‘ईडी’] तपासात ‘पर्शियन दरबार’च्या रेस्टॉरंट मालकाने ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’शी अशा प्रकारचा कोणताही करार झाला नसल्याचे लेखी लिहून दिले असल्याचे ही निरुपम यांनी सांगितले. म्हणजेच सदर कंत्राट मिळविण्यासाठी संजय राऊत आणि किर्तीकर यांनी कदम नामक बोगस व्यक्ति ऊभा केला, ‘पर्शियन दरबार’शी अन्न तयार करण्याचा करार झाल्याचे बोगस कागदपत्रे तयार केले. तसेच एकूण रक्कम रुपये ०८ कोटीतील रक्कम रुपये ०४ कोटी हे बेकायदेशीरपणे बोगस कंपन्यांच्या खात्यावर वळविले.

निरुपम यांनी संजय राऊतांवर केलेल्या या सर्व आरोपांचे पुरावे म्हणून काही कागदपत्रे ही या पत्रकार परिषदेत सादर केल्याने निरुपम यांच्या या आरोपांना सत्यतेची धार असल्याचे दिसून येत आहे. जे अन्न गोर-गरीब मजुरांना मिळाव्यास हवे होते, ते यांनी खावून हा जो अमानविय प्रकार केला आहे, त्याबद्दल ‘ईडी’ ने संजय राऊत यांच्याविरुद्ध एक स्वतंत्र गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे असे वारंवार अधोरेखीत करत निरुपम यांनी, “राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत एक वेगळीच ‘उबाठा’सेना जन्माला घातली आहे…ज्या मराठी माणसांच्या नावाने राजकारण करत हे आपले दुकान चालवतात, त्या मराठी माणसाने ही यांचे हे विद्रूप चेहरे ओळखून यांना निवडणुकीत धडा शिकवावा….” असे आवाहन केले.

 

 

हेही वाचा

लक्षवेधी