मुंबई, दि. २६ [प्रतिनिधी] :- मराठा आरक्षण प्रश्नी “आता विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघार नाही….” म्हणत हजारों मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने आक्रमक पणे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या सीमेवर शासनाशी ‘तहाची’ बोलणी सुरू केली असल्याचे पहावयास मिळत आहे.
मागील काही तासांपासून नवी मुंबईचा प्रमुख भाग असलेल्या वाशी मध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य शासन यांच्यात आंदोलन स्थगीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिनिधी मंडळाला मनोज जरांगे यांच्याकडून खूपच सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत असून आतापर्यंत प्रचंड आक्रमक, दाहक भाषा वापरणाऱ्या जरांगे यांच्या भाषेत चांगलीच नम्रता आलेली दिसून येत आहे.
मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघण्यापूर्वी शासनाकडून जे आश्वासन जरांगे यांना देण्यात आले होते, त्याबाबत जरांगे पाटील आत्तापर्यंत असमाधान व्यक्त करत आले आहेत. आज मात्र शासनाकडून देण्यात आलेल्या त्याच आश्वासनांवर अटीशर्तीच्या स्वरूपात समाधान व्यक्त करत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दाहकता कमी करण्यात येत असल्याचे संकेत दिले. शासनाच्या वतीने महसूल अधिकारी संतोष यादव यांनी जरांगे यांची भेट घेत त्यांना शासनाने काढलेल्या काही अद्यादेशांच्या प्रति दिल्यात. तसेच मराठा आरक्षण प्रश्नी शासनाची भूमिका स्पष्ट करणारे काही दस्त दिलेत.
त्यावर तमाम मराठा आंदोलकांना आज दुपारी ०३.०० वाजेच्या सुमारास संबोधीत करतांना जरांगे पाटील यांनी “शासन जर आपल्या सगळ्या मागण्या मान्य करणार असल्याचे आपल्याला लेखी स्वरूपात कळवत असेल तर आपण थोडं संयमान घ्यायला काय हरकत आहे? शासनाने आपल्याला ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्याचे कळविले आहे. त्यापैकी जवळपास ३८ लाख मराठ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आले असल्याचे ही शासनाने आपल्याला लेखी कळविले आहे. वंशावळीच्या विषयात शासनाकडून शिबीरे घेण्यात येत आहेत. त्यानुषंगाणे शासनाकडे अर्ज करण्याची जबाबदारी आपली आहे. तसे अर्ज आपण करावेत. पण शासनाने सगेसोयऱ्यांच्या विषयात आजच्या रात्रीच अद्यादेश काढावा, आम्ही इथेच थांबतो. जर शासनाने आजच्या रात्रीतून किंवा उद्या दुपारपर्यंत अद्यादेश काढला नाही तर आम्ही परत मुंबईच्या दिशेने कूच करू….” असे भाष्य केले.
एकूणच मराठा आरक्षणासाठी टोकाची भूमिका घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य शासन यांच्यात मराठा आंदोलनाबाबत मुंबईच्या सीमेवर सुरू झालेली तहाची बोलणी मराठ्यांचा मोर्चा मुंबईत जाणार नसल्याचे संकेत देणारी आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे आणि राज्य शासनात सुरू असलेल्या शितयुद्धात तोडगा निघात असल्याचे संकेत देणारी आहे.