Monday, December 23, 2024
Homeलेखपवारांची चाल शिंदेंच्या पथ्यावर....

पवारांची चाल शिंदेंच्या पथ्यावर….

आक्रमक, दाहक आंदोलनानंतर मराठ्यांना आज मिळालेल्या आरक्षणाचे राजकीय वर्णन एका वाक्यात करायचे झाल्यास, “पवारांची चाल आपल्या पथ्यावर पाडून घेत शिंदे फडणविसांच्या ही सावलीतून बाहेर पडले….” असे म्हणता येईल…

महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील अनेक वर्षे लक्षात राहील अशा राजकीय चाली चालून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण त्यांनी चाललेल्या ह्या चाली त्यांनी न चालता त्यांच्या कडून चालवण्यात आल्या, असे चित्र महाराष्ट्रासमोर आले. त्यांनी ही ते भर विधानसभेत देवेंद्र फडणविसांकडे अंगुली निर्देश करत “खरे कलाकार, सगळ्यात मोठे कलाकार हे आहेत….” म्हणत मान्य केले. जाहीर केले. पण त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वावर झाला. कसली ही परवा न करता, कसली ही भिती न बाळगता ज्या मुत्सद्देगिरीने, ज्या निडरतेने राजकीय चाली चालून ते मुख्यमंत्री झाले, त्याचा विचार करता एका चालीत भल्या-भल्यांना चितपट करून सत्ता मिळविणारा मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा उल्लेख व्हावयास हवा, त्यांची गणना व्हावयास हवी…पण असे न होता ‘कळसूत्री बाहुले’, ‘नाममात्र मुख्यमंत्री’ म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख होत गेला….पण मराठ्यांना मिळालेल्या आजच्या आरक्षणाने आणि त्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील लाखों मराठा आंदोलकांनी शिंदेंवर केलेल्या स्तुतिसुमनांच्या वर्षावातून शिंदेंचा राजकीय मुत्सद्देगिरीपणा परत एकदा महाराष्ट्राला पहावयास मिळाला आहे….!

मनोज जरांगेंना संतुष्ट केल्याशिवाय, मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही….आगामी निवडणुका सोप्या नाहीत…हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या गळी उतरवून देत, मंत्री मंडळातील जरांगे विरोधी मंत्र्यांची मनधरणी करून शिंदे यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा हा अद्यादेश काढला असल्याचे लक्षात येत आहे. या अद्यादेशास मंत्री छगन भुजबळ यांच्यासह उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचाही प्रखर विरोध होता. त्यांचा हा विरोध क्षमविण्यासाठीच मनोज जरांगे यांनी हजारों मराठ्यांसह मुंबईवर कूच करणे आवश्यक असल्याचा संदेश जरांगे पर्यंत पोहचला आणि मराठ्यांच्या आरक्षणाबाबतचा अद्यादेश काढण्याचा अडसर दूर झाला. जरांगेंची मनधरणी करण्यासाठी लोणावळ्यात, वाशीत गेलेल्या अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादातून असे लक्षात आले की, जरांगे यांच्या अंतरवली-सराटी येथील उपोषण आंदोलनाला लागलेल्या गालबोटानंतर जो आगडोंब महाराष्ट्रभर उसळला, तेंव्हापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट संपर्कात होते. आंदोलक जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मैत्रीपूर्ण संवादातूनच मराठा आरक्षण रूपी हा राजकीय तह घडून आला, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही…

“मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळला तर त्याचा राजकीय फटका आपल्याला बसेल न बसेल हा भाग वेगळा. पण हा प्रश्न जर आपण सोडवला तर त्याचा सगळ्यात जास्त राजकीय फायदा आपल्याला होणार. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल, या दृष्टीने विचार करा…व्यूहरचना आखा….” अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी आपल्या विश्वासू पक्ष पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना दिल्या होत्या. अशी माहिती एका जबाबदार सेना नेत्याकडून मिळाली. यावरून असे लक्षात येते की, मराठा आरक्षणाच्या विषयावरून सत्तेतील अजित पवार गट विरुद्ध मनोज जरांगे पाटील असे वाक्-युद्ध सुरू असतांनाच एकनाथ शिंदे-मनोज जरांगे यांच्यात हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा याबाबतचा ‘रोड[मुंबई]मॅप’ ठरविण्यात येत होता.

मराठा आरक्षणाबाबतचा अद्यादेश देत-घेत असतांना शिंदे आणि जरांगे यांच्यातील देह बोलीतून, त्यानंतर झालेल्या जरांगे यांच्या भाषणातून ही याचे प्रमाण मिळत होते. दि. २० जानेवारी, शनिवार रोजी जरांगे पाटील यांनी आंतरवली येथून हजारों मराठ्यांसह मुंबईकडे कूच केली, त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाठ यांनी केलेले, “शिंदे साहेब आरक्षण कसे देता येईल या दृष्टीने सकारात्मक विचार करत असतांना, कार्य करत असतांना असे होणे म्हणजे, कोणीतरी शिंदे साहेबांसाठी अडचणी निर्माण करत असल्याचे प्रमाण होय….” हे निव्वळ राजकीय वक्तव्य ही याकडेच ईशारा करते. एकूणच “People will throw stones in your way to make you lose, but you should realize the opportunity that comes your way and turn it into a flower. You will succeed….” असं म्हणतात त्याप्रमाणे राजकीय चाली चालून मराठ्यांना आरक्षण देत, मराठ्यांच्या गळ्यातला मनोज जरांगे रूपी ताईत आपला करून घेत एकनाथ शिंदे यांनी आपली एक हक्काची वोट बँक तयार करून घेतली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

ज्यावेळी शरद पवारांच्या हाती सत्ता होती, त्यांना केंद्रात स्थान होतं त्यावेळी त्यांनी आपल्या समाजासाठी जे केलं नाही…ते त्यांनी का केलं नाही….? हे त्यांनी राज्यात फडणवीस सरकार असतांना आणि आता शिंदे सरकार असतांना त्यांच्या राजकीय चालीतून स्पष्ट केलं…! पण दोन्ही वेळा पवार रूपी शकुनी काकाचे हे पासे शकुनी काकावरच पलटल्याचे पहावयास मिळाले. ज्यावेळी राज्यात फडणवीस सरकार होते, त्यावेळी ही शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटवला होता आणि आता राज्यात शिंदे सरकार असतांना ही पवारांनी आपले तेच हुकमी हत्यार उपसून शिंदे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षण विषयाशी हाडवैर असलेले छगन भुजबळ शिंदे सरकार मध्ये असल्याने मराठा आरक्षण विषयावरुन आंदोलन पेटविल्यास शिंदे अडचणीत येतील, आपल्याला चांगलाच फायदा होईल, असा कयास या मागे पवारांचा होता. मराठा आंदोलनाच्या पहिल्या आणि शेवटच्या टप्यातील अगदी परवा पर्यंतच्या घडामोडी पाहता पवारांचा कयास खरा ठरत असल्याचेच दिसून येत होते.

पण स्थितप्रज्ञ एकनाथ शिंदे यांचे आकलन करण्यात पवार चुकले…शिंदेंनी त्यांच्या विरुद्ध टाकण्यात आलेले हे पासे त्यांच्या राजकीय शत्रूसोबतच राजकीय मित्रांवर ही कुरघोडी करता येईल असे पलटवले….आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर शिंदे सेनेचे अस्तित्व राहणार नाही, असे म्हणणाऱ्यांना आणि तसा प्रयत्न करणाऱ्यांना हे आत्ताच लक्षात येणार नाही कदाचित….पण मराठा आरक्षणाच्या विषयावरून मराठ्यांना पेटवणाऱ्याच्या हे लक्षात आले नसेल, तर नवलच…!

आरक्षण नव्हे, राजकीय तह….!

देशाची आर्थिक राजधानी जाम होऊन नवीनच संकट ऊभे राहूनये म्हणून शिंदे सरकारकडून मराठ्यांना देण्यात आलेले हे आरक्षण म्हणजे, आरक्षण नसून हा एक राजकीय तहच होय…! असाच उल्लेख या आरक्षणाचा करणे योग्य ठरेल.

एकीकडे “घरावर तुळशी पत्र ठेवून निघालोय…सौभाग्यवतीचं कुंकू पुसून निघालोय….आलो तर आरक्षण घेवूनच येईल…तसा परत येणारच नाही….!” अशा डरकाळ्या फोडत वाघ होऊन हजारों-लाखों मराठे घेवून मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील. मागील काही महिन्यांपासून राज्यभरातील मराठा बांधवांच्या मनात निर्माण केलेली आपली प्रतिमा कायम राहावी, ही भावना आणि हे आंदोलन मोठे करणारे मोठे हात…हे या मागचे प्रमुख कारण….

दुसरीकडे “काही ही झाले तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही…कारण कायद्याने ते श्यक्य नाही….” असा दबाव आणि आरक्षण दिले नाही तर ‘शाहीन बाग-२’ घडून देशाच्या राजधानी प्रमाणेच देशाची आर्थिक राजधानी जाम होण्याची भिती….अशा संकटात फसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

यांच्यात नसलेल्या पण यांच्यात दिसून येत असलेल्या या अराजकीय भासणाऱ्या पण राजकीयच असलेल्या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला जरांगे यांचा मोर्चा लोणावळा येथे पोहचला तेंव्हा पासून शिंदे आणि जरांगे यांच्यात सुरू असलेल्या तहाच्या बोलणीने गती घेतली. काहीही झाले तरी जरांगे यांना आल्यापावली रिकाम्या हाती परत जाता येणार नाही, हे शिंदे यांनी लक्षात घेतले आणि शिंदेंनी कितीही शुद्ध अंतकरणाने ठरविले तरी त्यांना आपल्याला पाहिजे ते देता येणार नाही, हे जरांगे यांनी जाणून घेतले….यातूनच हा मधला मार्ग निवडण्यात आला. त्यानुसार कोर्टात न टिकणारे आरक्षण देवून, तसा अद्यादेश जरांगेंच्या हाती देवून जरांगेंना माघारी परतू शकण्याचा मार्ग शिंदेंनी तयार करून दिला आणि मुंबईला वेठीस धरून शिंदेंना अडचणीत न आणण्याचा निर्णय घेवून, मिळेल त्यात समाधान मानत शिंदेंना या तानावातून बाहेर पाडण्याचा मार्ग जरांगेंनी स्वीकारला….त्यामुळेच मराठ्यांना मिळालेले आजचे हे आरक्षण म्हणजे, आरक्षण नसून राजकीय तह होय; असे म्हणावे लागेल…मुख्यमंत्री शिंदेंनी काढलेला आरक्षणाबाबतचा अद्यादेश मंत्री दीपक केसरकर घेवून आल्याची माहिती प्रसार माध्यमांना देतांना जरांगे यांनी एका पत्रकाराच्या खोचक प्रश्नावर “अरे थांबना…सगळंच काय तुमच्याच मनाने करायचं का….” अशा शब्दांत व्यक्त केलेला त्रागा याचेच प्रमाण होय…!

हेही वाचा

लक्षवेधी