स्वत:ला धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसदार म्हणवणाऱ्या, नव्हे…नव्हे….स्वत:ला धर्मवीरच म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारात मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट एका सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचा संतापजनक गुन्हा केला. त्यांनीच त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मंचावरून समोर उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला जाहीरपणे आई-वाडिलांवर अश्लील भाषेत शिव्या घातल्या. आपल्याच मतदारांना जाहीरपणे नाही-नाही त्या शिव्या घालत, त्यांची आई-बहीण काढत सत्तार यांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा आदेश पोलिसांना दिला. पोलिसांना ही असा आदेश दिला की, जणूकाही पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी म्हणजे त्यांनी पाळलेले गुंडच…!
सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सिल्लोड विधानसभा मतदार संघात आयोजित लावणीच्या कार्यक्रमात घडलेल्या या संतापजनक घटनेने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहूंच्या या राज्यात माता-भगिनींचे काय स्थान हे नालायक राजकारणी शिल्लक ठेवत आहेत, हे जाहीर झाले आहे. धर्मवीर एकनाथ शिंदे यांच्या कुप्रतापी अब्दुल सत्तारांनी राज्यातील माता-भगिनींचा अनादर केल्याची ही पहिलीच घटना आहे, असे नाही. सुप्रिया सुळें सारख्या जेष्ठ लोकप्रतिनिधींवर ही त्यांनी घाणेरड्या भाषेत टीका केली होती. माता-भगिनींना देवी मानणाऱ्या या संतांच्या महाराष्ट्रात सत्तार ज्या पद्धतीने माता-भगिनींचा उल्लेख करत आहेत, तो पाहून त्यांचे तोंड आहे की गटार? असा थेट प्रश्न त्यांना करत त्यांच्या कानशीलात लगावण्याची वेळ आली आहे.
असे असतांना राज्याचे विरोधी पक्ष नेते मात्र सत्तार यांच्या या पापावर फक्त पोस्टा-पोस्टी करून विरोध दर्शवत आहेत. सत्तार यांनी काल बुधवार रोजी जाहीर कार्यक्रमातून जनताजणार्धनाला जाहीरपणे आई-वडिलांवर शिव्या देत, पाळीव गुंडांना मारहाणीचे फर्मान सोडावे तसे फर्मान पोलिसांना सोडून लोकांना पोलिसांकरवी मारहाण केल्याच्या या भयंकर घटनेवर फक्त एक पोस्ट करून विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार मोकळे झाले आहेत. हेच जर राज्यात भाजपेत्तर सरकार असतांना घडले असते तर आतापर्यंत अख्खा भाजप संबंधीतावर तुटून पडला असता…भाजपच्या राज्य नेतृत्वासह केंद्रीय नेतृत्वानेही या विषयात उडी घेत रान पेटवले असते….दुसरीकडे सामाजिक प्रसार माध्यमांवरील भाजप कार्यकर्त्यानी, भाजप विचार धारेच्या नेटकऱ्यांनी या विषयाला वाहून घेत महाराष्ट्र पेटवला असता….!
पण आज तसे काहीही होतांना दिसून येत नाही. आपल्या माता-भगिनींवर शिव्या खावून, पलिसांच्या लाठ्या खावून तो सगळा जनसमुदाय शांतपणे घरी निघून गेला…परत त्या नालायकाने एखादा कार्यक्रम आयोजित केला तर परत निर्लज्जपणे त्याच्या कार्यक्रमाला जमा होण्यासाठी….खुद्द एका मंत्र्यानेच राज्यातील माता भगिनींचे हणण असे जाहीरपणे करूनही ‘एक्स’ या सामाजिक प्रसार माध्यमावर फक्त एक पोस्ट करत, टीव-टीवाट करत त्याविषयी नाममात्र विरोध दर्शवून विरोधी पक्ष नेते मोकळे झाले…जनतेला सत्तेतील लोकं किती माजले आहेत, हे दाखविण्यासाठी आणि जनताजणार्धनाच्या माता-भगिनींना शिव्या घालनारा ही कामाला लागला…परत त्याच जनतेकडे मते मागून, निवडून येवून परत त्यांच्या उरावर बसून त्यांच्या माता-भगिनींना शिव्या घालण्यासाठी….!
खरेतर दोष राजकारण्यांचा नाहीच…आपण लोकशाहीत जगतो आहोत, असे समजणाऱ्या लोकांचा आहे…त्यातल्या त्यात जाहीरपणे अशा नालायकाकडून शिव्या खात गप्प बसणाऱ्या, परत त्याला मतदान करून उरावर घेणाऱ्या मतदारांचा आहे….! अशा भयंकर घटनेवर फक्त पोस्टा-पोस्टी करून नाममात्र विरोध व्यक्त करणाऱ्या विरोधी पक्षाचा आहे…!!
या घटनेने परत एकदा हे सिद्ध झाले आहे की, सगळ्यातलाच स्वाभिमान मेला आहे…जाणिवा मेल्या आहेत….लोकं मुर्दाड झाले आहेत….लोकशाही मुर्दाड झाली आहे…! म्हणून हे एवढे माजले आहेत, म्हणून लोकशाहीची ही गत झाली आहे….! ज्यावेळेला हा तमासगीर ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ असे गोंडस बिरुद देवून आयोजित केलेल्या त्या तमाशाच्या फडावरून हातात माईक घेऊन उपस्थित जनता जनार्धनाची माय-बहीण काढत होता, त्याचवेळी जर तो हजारोंचा जनसमुदाय पेटून उठला असता तर…त्याचवेळी त्या हजारोच्या जनसमुदायाने याच्यावर खेटराचा मारा केला असता तर….भविष्यात ना याने ना अन्य कोण्या नालायक राजकारण्याने परत कधी असा गुन्हा केला असता….!