केंद्रीय राजकारणात नुकताच भाजपचा उदय होत होता. पण “अंधेरा छटा नही था, सुरज निकला नही था, भाजप का कमल खीला नही था….” वाजपेयी-आडवाणींच्या ‘त्या’ युगात आमच्या सोबत गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या आमच्या या नितीन भुतडा नामक मित्राच्या मनात त्या किशोर वयात राजकारणाचे खरेतर समाजकारणाचे, धर्मकारणाचे बीज अंकुरले…! पोटे सरांचे, गांधे सरांचे बोट धरून रथायात्रेत सहभागी झाला….नुसता सहभागी झाला, असे नाही तर आक्रमक शैलीचा कारसेवक म्हणून पुढे आला…अंधुक-अंधुकस आठवत, कर्फ्यू लागला होता….पोटे सर, गांधे सर यांच्या सोबत नितीनला ही अटक झाली होती….
ज्या किशोर वयात आम्ही पुस्तक सोडून ‘त्या’ किशोर वयीन गोष्टींच्या पलीकडे, क्रिकेटचे मैदान असलेल्या जिल्हा परिषद मैदानाच्या पलिकडे विचार करू शकलो नाही, त्या किशोर वयात नितीनने देशात धर्माची राजकारणाशी जोड घालून संपूर्ण देशात राजकीय-सामाजिक-धार्मिक मंथन घडवून आणणाऱ्या भारतीय जनता पार्टी [भाजप] च्या माध्यमाने राजकारणात प्रवेश केला होता. जोडीला सामाजिक पत्रकारिता ही केली. सा. ताजाकलम च्या माध्यमाने अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. उमरखेडच्या राजकारणात त्यावेळी बबरशेर असणाऱ्यांना स्वप्नात ही वाटले नसेल एवढ्या गतीने नितीनने उमरखेडच्या धार्मिक, सामाजिक जडणघडणीतून राजकीय सिंहझेप घेतली आणि त्यावेळचे उमरखेडच्या राजकारणातले बबरशेर आज नितीनजींच्या मेहरनजरेने राजकारणात जीवंत आहेत….!
पाहता-पाहता नित्याचा नितीनजी झालेल्या नितीन भुतडा यांचा आज वाढदिवस….आमचे कॉमन मित्र, आमच्या दोघांचे ही पत्रकारितेतील ‘त्या’ काळातील मार्गदर्शक प्रशांत भागवत यांची पोस्ट वाचली…बालपणातल्या, किशोर अवस्थेतल्या सगळ्या आठवणी घरघर डोळ्या समोर तरळल्या आणि तोंडातून उत्स्फूर्तपणे “खरंच नितीनच्या बुद्धिमत्तेला चॅलेंज नव्हते…आज ही नाही….!” असे शब्द निघाले…
कुठलाही राजकीय वारसा नाही, राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नाही….उलट मनात आलेल्या विचारांचे अनुकरण करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेल्या पोटे सर, गांधे सर, कोल्हे सर यांच्या सोबत कोणत्या कार्यात सहभागी झाले तर पाठीत वडिलांचा धप्पू बसायचा….मोठ्या भावाच्या रागाला सामोरे जावे लागायचे…मोठी ताई तेवढी पाठराखण करायची….एकूणच राजकीय गंध नसलेल्या सर्व सामान्य कुटुंबातून त्यातही व्यापारी पिंड असलेल्या मारवाडी कुटुंबातून आलेल्या नितीनजींच्या मनात हे राजकीय-सामाजिक आयुष्याचे बीज अंकुरलेच कसे….? हा आम्हाला ही न उलगडलेला प्रश्न आणि नितीनजींननी ही सिंहझेप घेतली कशी…? हे आम्हाला ही न सोडवता येणारे कोडे….!
याचे उत्तर एकच असू शकते, जसे क्रांतिकारकांच्या मनात घरादारा पेक्षा देशसेवेचे विचार आले आणि ते हसत-हसत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले, स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात त्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली….तसेच काहीसे मंथन नितीनजींच्या मनात घडून आले असेल आणि त्यांनी ज्या युगात राजकारणाला धर्माच्या संरक्षणाचे सशक्त माध्यम म्हणून मानल्या जायचे त्या युगात राजकारणात समाजसेवा म्हणून, धर्म रक्षणार्थाय म्हणून प्रवेश केला असावा….नुसता प्रवेशच नाहीतर त्यांनी संघ कार्याला, पक्ष कार्याला स्वत:ला वाहून घेतले…”उतू नये, माजू नये, घेतला वसा टाकू नये….” म्हणत त्यांनी संघ प्रेम, पक्ष निष्ठा तसू भरही कमी होऊ दिली नाही…
त्यांचा गल्ली क्रिकेटर ते पत्रकार, पत्रकार ते स्वयंसेवक, स्वयंसेवक ते पक्ष कार्यकर्ता, पक्ष कार्यकर्ता ते पक्ष पदाधिकारी, पक्ष पदाधिकारी ते उमरखेड-महागाव विधानसभा मतदार संघातील हुकमी एक्का, विधानसभा मतदार संघातील हुकमी एक्का ते मतदारसंघाचे भाग्य बदलणारा भगीरथ, मतदार संघाचे भाग्य बदलणारा भगीरथ ते विरोधकांना त्यांच्याच चक्रव्यूहात गुरफटून गारद करणारा आधुनिक अभिमन्यु, आधुनिक अभिमन्यु ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादूची कांडी असा प्रवास पाहिलेले राजकीय विश्लेषक, आभ्यासक ही नितीनजींच्या या चमत्कारीक सिंहझेपेचे रहस्य उलगडू शकणार नाहीत, अशी सिंहझेप या सिंहाने पश्चिम विदर्भाच्या राजकारणात घेतली आहे…!
सध्या भाजपच्या यवतमाळ जिल्हा समन्वयक आणि यवतमाळ, वाशिम लोकसभा प्रमुख पदी असलेल्या नितीनजींच्या या चमत्कारीक राजकीय प्रवासाला कोणत्याही संबोधनात, कोणत्याही उपमात बांधता येणार नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती, चाणाक्ष बुद्धी, मऊ मेणाहूणी परी कठीण वज्रास भेदणारे मन आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अतिशय शुद्ध अंत:करण याबळावरच हे साध्य झाले असणार….कोणत्या तरी पुण्यातम्याचा वास असल्याशिवाय कोणत्याही देहाला हे साध्य करता येणे शक्यच नाही, म्हणतात तसेच काहीतरी असावे…म्हणूनच फक्त निवडणुकी पुरता राजकीय राहणारा हा माणूस यरवी आपल्याला सामाजिक-धार्मिक कार्यकर्ता म्हणूनच वावरतांना, सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जातांना दिसतो….
कुण्या गरीबाच्या मुलीच्या विवाहाचा विषय असो अथवा कुण्या गरीबाच्या मुलाच्या शिक्षणाचा विषय असो अथवा रुग्णालयीन मदतीचा विषय असो नितीनजी हे मदतीचे दार, हक्काचे घर….!
उमरखेड-महागाव विधानसभा मतदार संघात घडणाऱ्या सामाजिक-धार्मिक घटनांना न्यायिक दृष्टिकोनातून पाहत, हाताळत त्यांनी कॉँग्रेसचा गड असलेल्या या विधानसभा मतदारसंघाला आता भाजपचा मजबूत गड करून टाकले आहे. ‘मतांचे धर्मतांडव’ हा निवडणूक पॅटर्न उत्तर प्रदेश मार्गे राज्यात २०२४ ला आला. पण उमरखेड-महागाव विधानसभा मतदार संघात तो २०१४ सालीच त्यांनी आणला. अगदी नैसर्गिक पद्धतीने त्यांनी तो राबविला आणि कॉँग्रेसचे हे संस्थान खालसा केले…! त्यानंतर त्यांनी या विधानसभा मतदार संघाची, या विधानसभा मतदार संघातील मतदारांची नाळ ओळखत आपले बौद्धिक चातुर्य दाखवत, पक्ष हिताला प्राधान्य देत आमदारकीच्या उमेदवाराचा चेहरा बदलला आणि २०१९ ला पक्षाला परत विजय संपादन करून दिला. दुसऱ्या टर्म मध्ये त्यांनी सामाजिक-धार्मिक मुद्यांवर जेवढे लक्ष केंद्रित केले, तेवढेच या विधानसभा मतदार संघाच्या विकासावर ही…या विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचा उल्लेख मतदारसंघाचे भाग्य बदलणारा भगीरथ….असाच करावा लागेल…
तुलना करण्याचा हेतु नाही, पण आपसूक तुलना होतेच….एका सच्चा स्वयंसेवकाच्या हाती जेंव्हा सत्तेच्या चाव्या येतात तेंव्हा तो सामाजिक-राजकीय-धार्मिक वातावरण ढवळून टाकत विकासावर भर देत नरेंद्र मोदी होतो, देवेंद्र फडणवीस होतो, नितीन भुतडा होतो…!
म्हणूनच २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत अवघड असलेली २०२४ ची लढाई ही केंद्रात मोदीजींनी, राज्यात देवेंद्रजींनी आणि उमरखेडात भुतडाजींनी लीलया जिंकली….! या तिन्ही नेत्यांनी ही लढाई भावनिक कार्डा सोबतच चाणक्य चाली चालून जिंकल्या…आणि देशात, राज्यात, उमरखेडात एक राजकीय इतिहास प्रस्थापित झाला…!!
पक्षाला असा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी विरोधकांना क्षमविण्या सोबतच पक्षांतर्गत कोल्हेकुई टिपत आपल्या विरुद्ध षडयंत्र रचणाऱ्यांना, चक्रव्यूह रचणाऱ्यांना त्यांच्याच चक्रव्यूहात गुरफटून ठेवत गारद करायचे कौशल्य भारतीय राजकीय इतिहासात देश पातळीवर नरेंद्र मोदी यांच्यात राज्य पातळीवर देवेंद्रजी यांच्यात आणि विदर्भ पातळीवर नितीनजी यांच्यातच दिसून येते.
त्यामुळेच पश्चिम विदर्भाच्या राजकारणात आधुनिक अभिमन्यु अशी ओळख असलेला हा उमदा नेता आता फडणवीसांची जादूची कांडी म्हणून ओळखल्या जात आहे…!
ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार….🖋️