मुबई, दि. ०४ [प्रतिनिधी] :- राज्य भरात गाजलेल्या बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अप्रत्यक्षरीत्या नाव गोवल्या गेल्यामुळे विरोधकांसह सत्ता पक्षातील आमदारांच्या ही टीकेचे लक्ष्य ठरलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर मंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागला. काल पर्यंत मुंडे यांच्या बचावासाठी ढाल होऊन ऊभे असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्यामुळे मुंडे यांनी आज सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्यांच्या ‘ओएसडी’ मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविला.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सभागृह डोक्यावर घेतले होते. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मुंडे यांच्या बचावासाठी केलेले प्रयत्न त्यांच्याच ‘मि. क्लीन’ भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करायला लागले. त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सकारात्मक केले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना यासाठी तयार करण्यात आल्याचे कळते.
दरम्यान मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करूना मुंडे यांनी आधीच मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला असून दि. ०४ रोजी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल, असे प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले होते. त्यानुसारच हा घटनाक्रम घडत गेला आणि मुंडे यांच्या राजीनाम्याचे वृत्त आले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. काल पासून सुरू झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन शांततेत पार पडावे यादृष्टीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
करूना मुंडे प्रकरणापासूनच मुंडे यांच्या राजकीय भवितव्याला ग्रहण लागले होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनी नेहमी प्रकाश झोतात राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमाने करूना मुंडे प्रकरण ‘हँडल’ करून मुंडे यांचा बचाव केला होता. पण आता फडणवीस सरकारच्या काळात त्याच धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणात गोवत शरद पवार आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेत मुंडे यांचा राजीनामा घेतलाच !