चुकीच्या घटनांबाबत, वाईट घटनांबाबत, बाबींबाबत होणाऱ्या छोट्या-मोठ्या आंदोलनांनी, उठावांनीच सामाजिक सुरक्षीतता जोपासली जाते, लोकशाही बळकट होते…याचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच छत्रपती संभाजीनगर शहरातील देवानगरी भागात घडली….
घटना तशी खूप छोटी…पण सामाजिक दृष्ट्या खूप परिणामकारक….सामाजिक आरोग्य, सामाजिक सुरक्षीततेत वाढ करणारी, लोकशाही बळकट करणारी….! आपल्या धण्याला, लेकरा-बाळांना व्यसनाच्या आहारी जातांना पाहून आपल्या घराला, संसाराला सावरण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी व्यसनमुक्तीसाठी केलेले असे आंदोलन, उठाव आपण अधून-मधून पाहत आलो आहोत, बातम्यातून वाचत आलो आहोत. पण ‘आपल्याला काय करायचं….’ या शहरी मानसिकतेत जगणाऱ्या, पुढारलेल्या शहरी महिलांकडून असे आंदोलन, असा उठाव होणे हे उल्लेखनीय…!
झाले असे की, शहरातील देवानगरी परिसरात संग्रामनगर उड्डाणपूला खाली असलेल्या देशी दारूच्या दुकाना विरुद्ध परिसरातील महिलांनी दि. १५, शुक्रवार रोजी दुपारी अचानकपणे आक्रमक आणि निर्णायक आंदोलन केले. खरेतर हे आंदोलन नव्हतेच….हा होता दारुड्यांच्या रोजच्या अश्लील हातवाऱ्यांनी, कृत्यांनी त्रस्त झालेल्या या परिसरातील महिलांचा अत्याचारा विरुद्धचा उठाव, महिलांना राजरोसपणे छेडणाऱ्या गुंडांना उदंड करणाऱ्या षंढ समाजाविरुद्धचा उठाव, हा होता या परिसरातून महिलांचे जाणे-येणे अवघड करून ठेवणाऱ्या दारुड्यांच्या तक्रारी नंतर ही दारुड्यांविरुद्ध, गुंडांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई न करणाऱ्या पोलीस प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा उठाव, हा होता समाजात असुरक्षीत वातावरण निर्माण करणाऱ्या कुप्रवृत्तीना जन्मास घालणाऱ्या अड्यावरील हल्ला….!
या हल्यात परिसरातील महिलांनी सदर देशी दारूच्या दुकानाची सुरू केलेली तोडफोड पाहून परिसरातील सजग नागरिकही सरसावले….दारुड्यांचे हातवारे, अश्लील चाळे दुर्लक्षीत करत आपला जीव मुठीत घेवून या रस्त्याने रोज मान खाली घालून ये-जा करणाऱ्या महिला अशा अचानक दुर्गावतारात आल्याने या ठिकाणी रोज राक्षसी प्रवृत्तीने वावरणारे दारुडे असे पसार झाले की, मागील दोन दिवसांपासून ते शोधून ही सापडेनासे झाले….!! एरवी पहाटे ०९-१० वाजेपासून ते रात्री १०-११ वाजेपर्यंत संग्रामनगर उड्डाणपुलाखालील सदर ठिकाणी दारुड्यांचा नंगा नाच चालायचा. रस्त्याने ये जा करणाऱ्या महिलांची छेड काढणे, वाटसरूंना लुटणे, परिसरातील दुकानात घुसखोरी करून काही खाद्य पदार्थांचे पाकीट, कोल्डड्रींक, पाण्याच्या बाटल्या पैसे न देता घेणे असे प्रकार या देशी दारूच्या दुकानावर जमणारे दारुडे करत. पण दोन दिवसांपूर्वी परिसरातील महिलांनी दुर्गावतार धारण केल्यापासून ना ते देशी दारूचे दुकान उघडले…ना ते गुंड, दारुडे दिसले….
संग्रामनगर उड्डाणपूलाखालील दारुड्यांच्या या दहशतीबाबत परिसरातील व्यापाऱ्यांनी, महिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या संदर्भात वारंवार पोलीस तक्रारी केल्या होत्या. पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता…उलट तक्रारी करणाऱ्यांनाच त्रास होत होता…या बाबीला कंटाळून परिसरातील महिलांनी दोन दिवसांपूर्वी संबंधीत देशी दारूच्या दुकानाविरुद्ध हा उठाव केला. परिसरातील कुप्रवृत्तींना पिटाळून लावले. परिसर सुरक्षीत केला. भयमुक्त केला. समाजाला भयमुक्त जीवन जगता यावे म्हणून कायद्याची अमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असते ती व्यवस्था राजकीय व्यक्तींच्या हातचे बाहुले झाल्यामुळे, भ्रष्ट झाल्यामुळे समाजाला सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी आता समाजावरच येवून पडली असून समाजातील वाईट बाबींविरुद्ध असे छोटे-मोठे आंदोलने, उठाव होत राहिले तरच समाज सुरक्षीत राहू शकतो आणि तरच ही लोकशाही बळकट होऊ शकते, याचेच हे प्रमाण….!