Monday, December 23, 2024
Homeराजकीयसत्तेपेक्षा देश मोठा : नवाब मलिकांना महायुतीत न घेण्याबाबत फडणविसांचा अजित दादांना...

सत्तेपेक्षा देश मोठा : नवाब मलिकांना महायुतीत न घेण्याबाबत फडणविसांचा अजित दादांना निर्वाणीचा सल्ला

नागपूर, दि. ०७ [प्रतिनिधी] :- माजी मंत्री नवाब मलिक यांना सत्तेत घेणार असाल तर आम्हाला तुमची साथ नको. तुमच्या साथीने राजकारण नको, सत्ता नको अशा आशयाचे एक नम्र भाषेतील पण खरमरीत पत्र आज राज्याचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिल्याने राज्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

देशद्रोहाच्या गुह्यात अटक असलेले आणि सध्या जामीनावर बाहेर आलेले नवाब मलिक आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी सभागृहात आले. यावेळी ते सत्ताधारी बाकावर बसले आणि मागील काही दिवसांत राज्यातील शिंदे सरकार मध्ये स्थिरस्थावर झाल्यासारखे वाटत असलेले अजित पवार परत एकदा विचलित वाटायला लागले. कारण नवाब मालिकांच्या सत्ताधारी बाकावर बसण्याने भाजपच्या तत्वनिष्ठ, देश हीत सर्वोतोपरी प्रतिमेला तडे गेले. मलिकांच्या सत्ताधारी बाकावरील हजेरीने ‘भाजपची सत्तेसाठी देशद्रोह्यांशी युती’ असा ‘प्रपोगंडा’ प्रसार माध्यमातून सुरू झाला. याबाबीची गंभीर दखल घेत उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना ‘सत्तेपेक्षा देश मोठा….’ अशा संदेशाचे एक नम्र भाषेतील पण खरमरीत पत्र लिहिले आणि ते सामाजिक प्रसार माध्यमातून सामाजिक ही केले. यामुळे राज्याच्या राजकारणात परत एकदा अजित पवार यांच्या शिंदे सरकारातील अस्तित्वाविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या.

अजित पवार शिंदे सरकार मध्ये सामील झाले. काही दिवसांतच नवाब मलिक जामीनावर बाहेर आले आणि सामान्य जणांकडून ‘नवाब मलिकांना देशद्रोही संबोधत त्यांच्या अटकेसाठी रान उठविणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आता नवाब मलिकांची मांडी चालेल का?” असे प्रश्न सुरू झाले. पण अजित पवारांचा पक्ष म्हणजेच खरा राष्ट्रवादी पक्ष, हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने अजित पवारांसाठी नवाब मलिकांच्या पाठिंब्याची गरज लक्षात घेवून या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस आजपर्यंत मौन बाळगून राहीले.

मात्र अजित पवारांचे राजकीय हीत लक्षात घेवून या विषयावर बाळगलेले मौन आज त्यांना तोडावेच लागले. फडणविसांनी हे मौन अजित पवारांना एक पत्र लिहून तोडले. या पत्रात त्यांनी अजित पवारांना संबोधून “सत्तेपेक्षा देश मोठा. सत्ता येते जाते, पण सत्तेसाठी देशद्रोह्यांशी संबंधांच्या आरोपाखाली अटक असलेल्या नवाब मलिकांना सोबत घेणे हे पटण्यासारखे नाही. आपल्या पक्षात आपण कुणाला घ्यावे, कुणाला नाही? हा अधिकार सर्वस्वी आपला आहे. पण महायुतीला धक्का पोहचणार नाही, याची काळजी प्रत्येक घटक पक्षाने घेणे आवश्यक आहे. नवाब मलिक यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतरही त्यांना मंत्री पदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.” असे म्हटले आहे.

फडणविसांच्या या निर्वाणीच्या संदेश पत्राने अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष हा आपलाच पक्ष असल्याचे निवडणूक आयोगा समोर आणि वेळ प्रसंगी न्यायालयात सिद्ध करण्यासाठी अजित पवारांना नवाब मलिक यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पण सत्तेतील भागीदारी टिकवून ठेवण्यासाठी मात्र नवाब मलिकांची विधिमंडळाच्या कामकाजातील उपस्थिती त्यांच्यासाठी मारक ठरत आहे. आता यावर अजित पवार काय तोडगा काढतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

लक्षवेधी