छत्रपती संभाजीनगर, दि. ०९ [पंकज किर्तीकर] :- शहरात वाढलेली बेशिस्त वाहतूक, सुसाट अॅपेचालक त्यात महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी बसच्या ‘ओव्हरस्मार्ट’ चालकांची पडलेली भर, यामुळे शिस्तीत वाहन चालविणाऱ्या दुचाकी वाहनचालकांच्या मनात अपघाती मृत्यूची भिती घर करीत आहे. अशा अपघाती मृत्यूच्या भितीने भयभीत शिस्तप्रिय वाहन चालकांकडून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना एक पत्र देण्यात आले असून या पत्राद्वारे त्यांनी आयुक्तांना बेशिस्त शहर बस चालकांना आवर घालण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शहर बसच्या काही बेशिस्त वाहनचालकांमुळे दुचाकी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे उदाहरणे मागील काही दिवसांत समोर आले आहेत. अगदी वर्दळीच्या रस्त्यांवरही स्मार्ट सिटी बसचे ‘ओव्हरस्मार्ट’ चालक सुसाट आणि धोकादायकपणे बस चालवितांना आढळून येतात. अशा ‘ओव्हरस्मार्ट’ शहर बस चालकांबाबत आयुक्तांना लिहिलेल्या या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, दुचाकी वाहनचालक महिला, वयस्कर पुरुष मंडळी सुसाट अॅपेचालकांना जेवढे घाबरत नाहीत, तेवढे या ‘ओव्हरस्मार्ट’ शहर बस चालकांना घाबरतात. याबाबीचे एक उदाहरण ही सदर पत्रात देण्यात आले आहे.
त्यानुसार अशोक जाधव नामक एक ४७ वर्षीय व्यक्ती त्यांच्या पत्नीसह सेव्हनहील उड्डाणपूलाकडून क्रांती चौकाकडे जात असतांना सेव्हनहील उड्डाणपूलाखालील बस थांब्याजवळ अतिशय जीवघेणा अनुभव अशोक जाधव यांना आला. दि. ०७, गुरुवार रोजी दुपारी ०१.३० च्या दरम्यान अशोक जाधव आपल्या मोपेड दुचाकी वाहनावरून सेव्हनहील उड्डाणपूलाखालून जात असतांना अतिशय सुसाटगतीने एक शहर बस त्यांच्या पाठीमागून आली. त्यामुळे क्रांती चौकाकडे जात असलेल्या जाधव यांना आपले वाहन धोकादायक पद्धतीने आपल्या डाव्या बाजूला थांबवावे लागले. तिथे आधीच एका मागोमाग एक असे चार-पाच अॅपेरिक्षा थांबलेले होते. त्यावर त्यांची दुचाकी आदळून अपघात होण्याचा धोका पत्करत त्यांनी आपली दुचाकी त्या दिशेने घेत दुचाकीचे ब्रेक आवळले. यावेळी त्यांचा तोल जावून त्यांच्यासह त्यांच्या पत्नीही दुचाकीवरुन पडल्या. त्यांच्यासाठी हा प्रसंग म्हणजे मृत्यूची अनुभूतीच होती.
दुख:द म्हणजे, या विषयी चीड आल्यामुळे या बाबीची तक्रार करण्यासाठी जाधव यांनी त्या शहर बसच्या मागच्या बाजूला देण्यात आलेल्या ७५०७९५३८२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सदर क्रमांक बंद येत होता. ‘जर शहर बस चालक धोकादायकपणे वाहन चालवत असेल तर या-या क्रमांकावर संपर्क साधा’ अशा स्वरूपाचा संदेश प्रत्येक शहर बसच्या मागील बाजूस लिहिलेला असतो. त्यानुसार संबंधीत शहर बसवर ७५०७९५३८२८ हा संपर्क क्रमांक दिलेला होता. त्यावर जाधव यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण सदर क्रमांकावर संपर्कच होऊ शकत नव्हता.
अशोक जाधव यांनी सदर पत्रात सांगितलेली मृत्यूची अनुभूती शहरातील प्रत्येक दुसऱ्या शिस्तप्रिय दुचाकी वाहनचालकांना दोन-चार दिवसातून एकदा तरी येतेच. त्यामुळे अशा ‘ओव्हरस्मार्ट’ शहर बस चालकांना आवरून शहरवासीयांवर उपकार करावेत, असे आवाहन या पत्राद्वारे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना करण्यात आले आहे.