Sunday, December 22, 2024
Homeअर्थमोदी मॅजिक : भारतीय शेअर बाजाराची उच्चांकाची हॅट्रीक

मोदी मॅजिक : भारतीय शेअर बाजाराची उच्चांकाची हॅट्रीक

मुंबई, दि. ०६ [प्रतिनिधी] :- भारतीय शेअर बाजाराने आज सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांक गाठून पाच राज्यातील विधानसभा निवडणुक निकालातून दिसून आलेल्या ‘मोदी मॅजिक’ला उच्चांकाच्या हॅट्रीकने सलामी दिली.

शेअर बाजारातील सेन्सेक्स निर्देशांकाने आज ३२५ अंकांची उसळी घेत ६९,६२५ च्या विक्रमी अंकाचा टप्पा गाठला आहे. तर निफ्टी निर्देशांकाने दि. ०५, मंगळवार रोजीचा विक्रमी उच्चांक तोडत ९५ अंकांची उसळी घेवून २०,९५५ अंकांचा नवीन उच्चांक स्थापन केला. जवळपास सर्वच क्षेत्रातील भागभांडवलाच्या खरेदी-विक्रीत तेजी पहायला मिळत असून काही महिन्यांपूर्वी गुंतवणूकदारांच्या प्रचंड नुकसानास कारणीभूत ठरलेल्या अदानी ग्रुपच्या भागभांडवलातील गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. मागील दोन सत्रापासून अदानी ग्रुपच्या शेअर्स मध्ये प्रचंड तेजी आली आहे. ज्यामुळे भारतीय शेअर बाजाराची तेजी टिकून राहिली आणि गुंतवणूकदारांना चांगलाच नफा कमावता आला.

शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकांची घौडदौड सध्याही सुरू असून निफ्टी निर्देशांक लवकरच २१००० चा उल्लेखनीय विक्रमी उच्चांकी टप्पा गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ‘मीनी लोकसभा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पाच राज्याच्या निवडणूक निकालाने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार २०२४-२९ या काळातही सत्तेत कायम राहणार असल्याचा विश्वास उद्योग जगतात, गुंतवणूकदारात बळावल्याने भारतीय शेअर बाजारात ही तेजी आली असल्याचे बोलल्या जात आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप प्रणित ‘एनडीए’ सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती, जगभरातील देशाच्या अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाने मंदावत असतांना भारतीय अर्थव्यवस्थेने गाठलेला ०४ ट्रीलिनीयन डॉलरचा टप्पा, देशाचा वधारलेला ‘जिडीपी’, मंदीच्या सावटाने अनेक देशाच्या औद्योगिक क्षेत्राची चाके मंदावत असतांना भारतीय औद्योगिक क्षेत्राला ‘मेक ईन इंडिया’ सारख्या दुरदृष्टीच्या योजनांनी दिलेली उभारी आणि त्या जोडीला देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परत एकदा दर्शविलेला विश्वास यामुळे भारतीय शेअर बाजारावरील देशातील गुंतवणूकदारांसह विदेशी गुंतवणूकदारांच्या विश्वासात वाढ झाली. त्यातूनच भारतीय शेअर बाजारात ही चमत्कारीक तेजी आली असल्याचे म्हटल्या जात आहे.

 

हेही वाचा

लक्षवेधी