रत्नागिरी, दि. ३० [प्रतिनिधी] :- जर लोकहितासाठी स्वत: मुख्यमंत्री बिना अपॉइंटमेंट चे भेटू शकतात तर जिल्हाधिकारी का नाही? याचा विचार करून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांना भेटावे, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांची कामे तत्परतेने कसे होतील याकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सल्ला दिला.
खाद्य पदार्थ उत्पादक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्थान कोकाकोला कंपनीने रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी शिंदे यांनी काही विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६० कोटी दिले आहेत. मुख्यमंत्री सामान्यांतून असला तरच सामान्य माणसांसाठी अशी कामे होतात. सामान्य माणसांचा असा विचार होतो. माझ्या काम करण्याच्या पद्धतीने आणि विकास कामांनी काही जणांचे पट्टे निघाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशाची लाट उसळली. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह ईतर मान्यवरांची उपस्थिती होती.
कोकणात कोकाकोलाची १३८७ कोटी रुपयांची गुंतवणूक
रत्नागिरीतील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील ८८ एक्करात कोकाकोलाच्या वतीने एक प्लांट उभारण्यात येत आहे. यासाठी १३८७ कोटी रुपयांची गुंतवणुक करण्यात येत असून यामुळे कोकणातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या प्लांटचे भूमिपूजन आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.