Friday, April 4, 2025
Homeप्रादेशिकमुनगंटीवारांमुळे राज्यातील हजारो गरजवंतांना 'अमृत'

मुनगंटीवारांमुळे राज्यातील हजारो गरजवंतांना ‘अमृत’

मुंबई, दि. ०३ [प्रतिनिधी] :- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच ‘अमृत’ च्या व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी बेकायदेशीरपणे बंद केलेल्या गोर-गरीब गरजूंसाठीच्या ‘अमृत’च्या योजना राज्याचे माजी वने व सांस्कृतिक मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज शासनाकडून पूर्ववत सुरू करून हवालदिल झालेल्या राज्यभरातील तमाम सर्वसामान्य उद्यमी तरुण-तरुणी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.

यामुळे राज्यभरातील गोर-गरीब विद्यार्थ्यांकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आभार, अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या घटकाला शासनाच्या ईतर कोणत्याही विभाग, महामंडळ, संस्थाकडून लाभ मिळत नाही, अशा घटकाच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘अमृत’ या संस्थेची स्थापना राज्य शासनाने २०१९ मध्ये केली. त्यानुसार या संस्थेकडून आर्य वैश्य [कोमटी], राजपूत तसेच खुल्या प्रवर्गातील ईतर घटकातील उद्यमी तरुण-तरुणींना उद्योग व्यवसायासाठी कर्ज सुविधा व गोर-गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत असे.

परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खुल्या प्रवर्गातील आर्य वैश्य [कोमटी], राजपूत आणि ईतर घटकासाठी राज्य शासनाने स्वतंत्र असे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. या बाबीचा बहाणा करून ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी ज्या-ज्या समाजासाठी शासनाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली, त्या-त्या समाजाला ‘अमृत’ मधून वगळले. संबंधीत महामंडळे कार्यान्वित झाली नाही हे लक्षात न घेता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार न करता विजय जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद केल्या. परिणामी ‘अमृत’च्या शिष्यवृत्तीच्या बळावर ‘आयआयआयटी’ आणि तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. आपल्या आपत्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या चिंतेने ग्रासलेल्या पालकांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली.

त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आपली कैफियत मांडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून मुनगंटीवार यांनी इमाव बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या लक्षात हा विषय आणून दिला. संबंधीत विभागाच्या सचिवांना या विषयात उचित कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आज उप-सचिव दिनेश चव्हाण यांनी ‘अमृत’ चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना खुल्या प्रवर्गातील सर्व घटकांना ‘अमृत’ चे लाभ पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे हे घडून आले असून यामुळे राज्यातील हजारो गरजू उद्यमी बेरोजगार तरुणांना तसेच विद्यार्थ्यांना ‘अमृत’ मिळाले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील घटकाकडून मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात येत आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी