Friday, April 4, 2025
Homeराजकीय'अजित दादांना पाया पडून सांगितले, तरी दादांनी नाही ऐकले'

‘अजित दादांना पाया पडून सांगितले, तरी दादांनी नाही ऐकले’

धनंजय मुंडेंचे खळबळजनक वक्तव्य

शिर्डी, दि. १९ [प्रतिनिधी] :- “भाजप सोबत जाऊ नका हे षडयंत्र आहे, असे अजित दादांना पाया पडून सांगत होतो. पण दादांनी ऐकले नाही आणि दादांचा घात झाला. सकाळच्या ‘त्या’ शपथविधी पासूनच दादा पक्षापासून दूर झाले. खरेतर दूर झाले, म्हणण्यापेक्षा दूर केल्या गेले, असे म्हणणे योग्य ठरेल. कारण दादांची पक्षाशी असलेली नाळ तोडण्यासाठीच ‘ते’ षडयंत्र रचण्यात आले होते.” असे खळबळजनक वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज केले.

येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात उपस्थितांना संबोधित करतांना त्यांनी हे खळबळजनक भाष्य केले. त्यांच्या या भाष्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ‘सकाळचा शपथविधी’ परत एकदा केंद्र स्थानी आला आहे. यावर पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, “सर्व डाव ‘त्यांनी’ रचला. कपट ‘त्यांनी’ केले आणि बळी अजित दादांचा गेला. पण राखेतून फिनिक्स उठावा तसे अजित दादा त्यातून बाहेर पडले. दादांनी झेप घेतली आणि आज आपला हा राष्ट्रवादी पक्ष शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने राज्याला विकासाकडे नेत आहे. पण काहीजणांना हे पाहवल्या जात नाही आणि ते मला नाहक टार्गेट करत माझ्या माध्यमाने आपल्या पक्षाला बदनाम करण्याचा कुप्रयास करत आहेत.”

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. पण शिबिराच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ते शिबिरात उपस्थित ही राहिले आणि त्यांनी आपल्या भाषणाने आपण कोणत्याही दबावात नसल्याचे तसेच आपल्यावर पक्षाचा कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केले. राज्यात सध्या गाजत असलेल्या संतोष देशमुख प्रकरणावर बोलतांना मुंडे यांनी, “संतोष देशमुख प्रकरण खरच गंभीर आहे. देशमुख यांची अशा क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्याला फासावरच लटकवले पाहिजे. पण या प्रकरणाचे राजकारण करून त्यात मला आणि माझ्या माध्यमाने दादांना, पक्षाला अडचणीत आणण्याचा कुप्रयास करणे ‘त्यांना’ शोभत नाही. असे घाणेरडे राजकारण योग्य नाही.” असे भाष्य केले.

आपल्याला ठरवून टार्गेट केले जात असल्याचे सांगत त्यांनी “मी अभिमन्यु नाही, अर्जुन आहे….” अशा शब्दांत विरोधकांना ईशारा दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाणे सुरू असलेल्या राजकारणावर पुढे बोलतांना मुंडे यांनी, “मी सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याने आणि दादांचा खंदा समर्थक, शिल्लेदार असल्याने अनेकांच्या पोटात दुखते. त्यामुळेच हे कटकारस्थान रचल्याजात आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की, माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे लोकं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथला, बीडला बदनाम करत आहेत.” असे भाष्य केले. शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरातून त्यांनी केलेले हे भाषण म्हणजे, विरोधकांना दिलेले उत्तर होय. विरोधकांना दिलेला ईशारा होय, अशी जोरदार चर्चा त्यांच्या या भाषणाबाबत सुरू आहे.

हेही वाचा

लक्षवेधी