चंद्रपूर, दि. २३, [प्रतिनिधी] :- बल्लारपूर येथे साकारस येत असलेल्या सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या कामाची पाहणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. हे केंद्र २० मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या केंद्रात वातानुकूलित बैठक सभागृह, अत्याधुनिक वर्कशॉप, ई-लायब्ररी तसेच १०० महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण केंद्र राहणार आहे. अशा विविध सुविधांनी सज्ज असे हे कौशल्य विकास केंद्र म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणांसाठी भक्कम पाऊल ठरणार असल्याचे मूनगंटीवार यांनी सांगितले.
या केंद्राच्या कामाची पाहणी करतांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वातानुकूलित हॉलमध्ये इनबिल्ट माईक आणि पोडियम असावेत, अशा सूचना दिल्या. संपूर्ण केंद्रात सीसीटीव्ही सुरक्षा प्रणाली आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ यंत्र बसवावे. महिलांसाठी ई-लायब्ररी आणि वर्कशॉप सुविधा अधिक सक्षम करावी. अतिथी निवासाची व्यवस्था जागा उपलब्धतेनुसार करावी. केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. असे निर्देश दिले.
स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी स्व. सुषमा स्वराज यांच्या कुटुंबातील ॲड. बासुरी स्वराज यांना तसेच त्याच्या परिवारातील अन्य सदस्यांना विशेष निमंत्रण देण्याचे नियोजन करावे. बांधकामासाठी अतिरिक्त निधीची मागणी असल्यास नगर विकास विभागाकडून मागणी करण्यात येईल. हे प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा भक्कम पाया ठरेल, असा विश्वास ही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, मुकेश टांगले कार्यकारी अभियंता, भाजपाचे पदाधिकारी लखनसिंग चंदेल, , प्रज्ज्वलंत कडू, सुरज पेद्दूलवार, संजोग मेढे उपअभियंता, वैभव जोशी शाखा अभियंता, किशोर चीदरवार आदी उपस्थित होते.