Friday, April 11, 2025
Homeप्रादेशिकअंगावर ३२ लाखांचे कर्ज, तुकाराम महाराजांच्या वंशजाची आत्महत्या !

अंगावर ३२ लाखांचे कर्ज, तुकाराम महाराजांच्या वंशजाची आत्महत्या !

तीर्थक्षेत्र देहूसह महाराष्ट्र हादरला

देहू, दि. ०५ [प्रतिनिधी] :- काही महिन्यांपूर्वी कर्जबाजारी पणाला, कर्जवसूली करणाऱ्या गुंडांच्या जाचाला कंटाळून कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी केलेल्या आत्महत्येने हादरलेला महाराष्ट्र जगद्गुरु तुकाराम माहाराजांचे ११ वे वंशज असलेल्या कीर्तनकार शिरीष महाराजांच्या आत्महत्येने हळहळला असून खाजगी सावकारांची महाराष्ट्रात वाढती दहशत चिंतेचा विषय ठरत आहे.

कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रोज येणाऱ्या वृत्ताने डोळ्यातील आसवे आटलेल्या महाराष्ट्राचे मन शिरीष महाराजांच्या आत्महत्ये मागील कारणाने सुन्न झाले. जगाला आध्यात्माच्या मार्गाची गोडी लावून मनावर ताबा मिळवत कोणत्याही परिस्थितीत विचलीत न होता आयुष्य जगण्याचा मंत्र देणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्याच वंशजाच्या आत्महत्येच्या या घटनेने संत, महात्म्यांचा महाराष्ट्र आता गुंडांचा, लुटारूंचा महाराष्ट्र झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी शिरीष महाराजांनी आपल्या आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीच्या नावाने पत्रे लिहून ठेवली. त्या पत्रातील मजकूर प्रसार माध्यम प्रतिनिधींना वाचून दाखवितांना पोलीस अधिकाऱ्याच्या ही डोळ्यात पाणी येत होते. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिरीष महाराजांचे लग्न जुळले होते. लग्न तोंडावर असतांनाच आपण हे पाऊल उचलत असल्याबद्दल आपल्या होणाऱ्या पत्नीची माफी मागत शिरीष महाराजांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला उद्देशून लिहिलेल्या पत्रात “माझे सखे, तू कुठं थांबू नकोस….तू तुझे आयुष्य जगं…” असे लिहिले आहे.

तसेच वडिलांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात “बाबा मला माफ करा. मी हे टोकाचे पाऊल उचलून तुम्हाला या वयात संकटात टाकत आहे. माझ्यावर ३२ लाखांचे कर्ज असून कोणाचे किती पैसे माझ्या अंगावर आहे, ते मी पत्रात लिहून ठेवत आहे. माझी गाडी विकून ०७ लाखांचे कर्ज फेडा आणि जमल्यास ताईची मदत घेवून किंवा जमेल तसे २५ लाखांचे कर्ज ही फेडा.” असे लिहिले आहे. आपल्या अंगावर झालेले कर्ज आपण फेडू शकू असे आपणास वाटत नसल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नोंदुण ठेवत त्यांनी उचललेले हे टोकाचे पाऊल महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला अंतर्मुख करणारे आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आणणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारे आहे.

हेही वाचा

लक्षवेधी