Friday, April 11, 2025
Homeप्रादेशिकसुधीर मुनगंटीवार यांचा एक कॉल अन् सोनपेठ तीर्थस्थळाचा प्रश्नच सुटला !

सुधीर मुनगंटीवार यांचा एक कॉल अन् सोनपेठ तीर्थस्थळाचा प्रश्नच सुटला !

शेगाव, आळंदीप्रमाणे होणार विकास ; २७ जानेवारीला निवेदन, २९ जानेवारीला विषय मंजूर

परभणी, दि. ३१ [प्रतिनिधी] : -एखादे काम होणार असेल तर हो म्हणायचे. होणार नसेल तर स्पष्ट सांगायचे. पण काम पेंडिंग ठेवायचे नाही. त्यातही एखादे काम आवश्यक असेल तर ‘ऑन दि स्पॉट’ त्याचा निकाल लावायचा. ही गुणवैशिष्ट्ये महाराष्ट्रात बोटावर मोजण्याएवढ्या लोकांकडे आहेत. त्यात माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा आवर्जून समावेश होतो. याची प्रचिती देणारा प्रसंग अलीकडेच घडला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तीर्थक्षेत्राच्या विकासाचा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांच्या फक्त एका कॉलने सुटला.

वारकरी संप्रदायाचे संत वेदांत केसरी ब्र. भू. रंगनाथ महाराज (सोनपेठकर) यांचे सोनपेठ येथे जन्म व समाधीस्थळ आहे. सोनपेठ या तीर्थ स्थळाचा विकास शेगांव, आळंदीप्रमाणे व्हावा अशी सर्वांची इच्छा होती. त्यासाठी रंगनाथ महाराजांचे भक्तगण गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नरत होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत उंबरठे झिजवूनही हाती काहीच आले नाही. अखेर ब्र. भू. रंगनाथ महाराज जन्मभूमी विकास समितीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांना गाठले.

परभणी आणि चंद्रपूरमध्ये जवळपास पाचशे किलोमीटरचे अंतर आहे. शिवाय मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाहीत. पण आता तेच आपलं काम करू शकतात, असा दृढ विश्वास समितीला होता. मुनगंटीवार यांच्याकडे प्रस्ताव येताच त्यांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना फोन केला. सोनपेठ तीर्थक्षेत्राचा प्रश्न जिल्हा नियोजन बैठकीत घेण्यास सांगितले. ‘तुम्ही विषय मंजूर करा मी माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि संबंधित विभागाशी बोलतो’, असा विश्वास दिला.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि सोनपेठ-पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी २९ जानेवारीच्या जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या बैठकीत विषय मांडला. अनेक काही वर्षांपासून अडगळीत पडलेला सोनपेठ तीर्थ स्थळाच्या विकासाचा प्रश्न निकाली लागला. सुधीर मुनगंटीवार नावाची जादू काय असते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांना निवेदन
विशेष म्हणजे इकडे जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेत हा प्रश्न निकाली लागायचाच होता आणि मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सोपवले. ब्र. भू. रंगनाथ महाराज जन्मभूमी विकास समितीचे पदाधिकारी डॉ. बालाजी पारसेवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, बालाजी वांकर, बालाजी पदमवार, नागेश शेटे, जीवन बसेट, आनंद डाके, गजानन गुंडावार, अनिल डुब्बेवार यांनी हे निवेदन दिले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?
सोनपेठ तीर्थ स्थळाचा शासनाच्या ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळात समावेश करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यासंदर्भात निर्देश दिले. सोनपेठ तीर्थ स्थळाचा समावेश शासनाच्या पर्यटन स्थळात करणे आणि शेगांव, आळंदी तीर्थ स्थळा प्रमाणे विकास करण्याच्या विनंतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधीत विभागाला केल्या.

२५ ला निवेदन, २९ ला विषय क्लोज !
समितीने २५ जानेवारीला मुनगंटीवार यांची नागपुरात भेट घेतली. तिथे त्यांना सोनपेठच्या विकासासंदर्भात निवेदन दिले. मुनगंटीवार यांनी गांभिर्य लक्षात घेऊन पालकमंत्र्यांना फोन केला. २७ जानेवारीला मुख्यमंत्र्यांना निवेदन सोपवण्यात आले. २९ ला जिल्हा नियोजन बैठकीत विषय मंजूर झाला. अनेक वर्षे ताटकळत असलेल्या विषयाचा निकाल आ.मुनगंटीवार यांनी अवघ्या चार दिवसांत लावला.

वाघ हा वाघच असतो
रंगनाथ महाराजांच्या भक्तांना आणि सोनपेठवासीयांना सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘त्या’ एका कॉलने न्याय मिळाला. सोनपेठ तीर्थ स्थळाच्या विकासाचा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळे सोनपेठवासी आणि राज्यभरातील रंगनाथ महाराजांचे भक्त सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानत आहेत. समाज माध्यमांवर ‘वाघ हा वाघच असतो’ असे हॅशटॅग व्हायरल करत आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी