आपले गांव असो अथवा राज्य असो, अथवा असो देश….सर्वत्र विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास आणि आपली कोठारे पैशा आदल्याने भरून घेणाऱ्या राजकारण्यांचा ऊतमात दिसून येतो…! भौतिक सुखाच्या आहारी गेलेल्या या भस्मासूरी राजकारण्यांनी पर्यावरणाचा तर पर्यावरणाचा, माणुसकीचा ही ऱ्हास केला आहे. याचे जीवंत उदाहरण म्हणजे, संतोष देशमुख हत्या प्रकरण…!!
राज्यकर्ता हा संवेदनशील असायला हवा, माणुसकीची जान असणारा असायला हवा, चराचरात भगवंताचे रूप मानणारा असायला हवा, सामान्यांतल्या सामान्य माणसात महान पुण्यातम्याचा वास आहे हे मानून त्याच्या कार्याचे, सेवेचे कौतुक जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ मेळाव्यात कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पंतप्रधान निवासस्थानी आमंत्रीत करून त्यांचे पाय धुवून, त्यांचा मानसन्मान करत त्यांच्या कार्याचे महत्व जाणले, देशाला त्यांच्या कार्याची जाणीव ठेवण्याचा संदेश कृतीतून दिला तसे करत आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत, याचे भान ठेवणारा असायला हवा. पण दुर्दैवाने परिस्थिती या विपरीत आहे.
सत्ताधारी असोत अथवा विरोधक दोन्ही पक्षात आज सर्वसामान्यांचे जगणे अवघड करून टाकणाऱ्यांची वानवा नाही….वानवा आहे ती माणसाला माणूस मानून समाजसेवेचा भाग म्हणून राजकारण करणाऱ्यांची, आपण समाजाचे, पर्यावरणाचे, या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो या शुद्ध हेतूने राजकारण करणाऱ्या राजकारण्यांची…माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या विकासा सोबतच पर्यावरण रक्षणाची जान असणाऱ्या, आपल्या समृद्ध इतिहासाचा वारसा जपत समाजाला सात्विक, आध्यात्मिक मार्गाने आयुष्य जगण्याचा सल्ला आपल्या कार्यातून, कृतीतून देणाऱ्या, माणसांचा तर माणसांचा झाडांचा ही आधारवड असणाऱ्या सेवाव्रती राजकारण्यांची….!
बल्लारपूर सारख्या मागास विधानसभा मतदार संघातून सतत सातवेळा निवडून येत ते राज्याच्या, देशाच्या राजकारणात सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून सुपरिचित आहेत. समाजसेवेचा भाग म्हणून राजकारण करणाऱ्या मुनगंटीवार यांनी आपल्या अकल्पनिय कल्पकतेने नेहमीच जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ही मन जिंकल्याचे आपण पाहत आलो आहोत. अर्थ मंत्री असतांना त्यांनी वेगळ्या धाटणीचा, सर्वसामान्यांना दिलासा देणारा आणि त्याच बरोबर राज्याची तिजोरी भरणारा मांडलेला अर्थसंकल्प असो, वन मंत्री असतांना राज्याच्या वन आच्छादीत क्षेत्रात केलेली वाढ असो, सांस्कृतिक कार्य विभागाचा कारभार सांभाळतांना आपल्या ऐतिहासिक वारस्याचे अभिन्न अंग असलेल्या छत्रपती शिवरायांच्या वाघ नखांचा विषय असो, छोट्या-छोट्या बाबीतून राष्ट्राभिमान कसा जोपासल्या जातो याचे प्रमाण देणारा त्यांचा ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याचा निर्णय असो यातून समाजाला एक आदर्श दिशा देण्याची, विकासा सोबतच पर्यावरण रक्षणाचे कार्य करण्याची त्यांची तळमळ, त्यांची जिद्द दिसून येते.
याचाच पुढचा महत्वाचा, अतिमहत्वाचा टप्पा म्हणजे मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर येथे होणार असलेली ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’ ही परिषद. या परिषदेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या परिषदेच्या माध्यमाने केवळ चंद्रपूर किंवा राज्यातील वातावरण बदलाचा अभ्यास, चिंतन आणि उपायांवर या परिषदेत विचार, चर्चा, संवाद साधण्यात येणार नसून संपूर्ण देश भरातील वातावरण बदलावर या परिषदेत मंथन होणार आहे. हे मंथन होतांना या मागच्या कारणमिमांसेवर चर्चा घडवून जागतीक पातळीवर उद्भवलेल्या ग्लोबल वॉर्मिंग च्या संकटाचा आढावा या बैठकीत घेतल्या जाणार आहे. या विश्व संकटाचा आढावा घेवून त्यावरील उपाय योजनांबाबत या परिषदेत काही ठोस निर्णय ही घेतले जाणार असल्याचे कळते. पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात तात्कालिक नव्हे तर स्थायी स्वरुपाचे कार्य आवश्यक असल्याचे लक्षात घेवून या आंतरराष्ट्रीय परिषदेत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी पर्यावरण तज्ज्ञांच्या, पर्यावरण प्रेमींच्या मतांप्रमाणे प्रभावीपणे व्हावी यासाठी राज्यात स्थायी समिती स्थापन करण्याचा निर्णय ही घेण्यात आला असल्याचे कळते.
या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेतून ग्लोबल वॉर्मिंग विरुद्ध शंखनाद करण्यासाठी जवळपास १७० पर्यावरण संशोधन अहवालांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्या अहवालांचा अभ्यास करून, त्यावर हवामान तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून उपायात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. असे झाल्यास ही परिषद केवळ आपल्या राज्यासाठी, देशासाठी, जगासाठी नव्हेतर संपूर्ण सृष्टीसाठी वरदान ठरणारी परिषद ठरेल, यात शंका नाही आणि अशाच विचाराने कार्य करणाऱ्या राजकारण्यांना सत्तेत स्थान मिळाल्यास पर्यावरणाचा आणि माणुसकीचा ही ऱ्हास थांबेल यात ही तीळमात्र शंका नाही….!
ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार….🖋️