Friday, April 4, 2025
Homeकरमणूकसैफ अली खानवर प्राणघातक हल्ला, लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया

सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला, लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया

मुंबई, दि. १६ [प्रतिनिधी] :- अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरातच प्राणघातक हल्ला झाला असून यात गंभीर जखमी सैफ अलीवर येथील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. हल्लेखोराने सैफच्या पाठीवर आणि मानेवर चाकूने वार केल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

या धक्कादायक घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफच्या बांद्रा येथील निवासस्थानी मध्यरात्री २.३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत सैफच्या जवळीकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दि. १५, बुधवार रोजीच्या मध्यरात्री त्याच्या बांद्रा [प] येथील निवासस्थानात शिरकाव केला. अज्ञात व्यक्तीला घरात पाहून सैफच्या घरातील कर्मचारी महिलेने जोरात आरडा-ओरड केली. जोराच्या आवाजाने झोपेतून उठलेला सैफ आवाजाच्या दिशेने गेला असता त्याच्यावर घुसखोर व्यक्तीने धारधार चाकूने वार केले. सैफच्या हातावर, मानेवर चाकूने वार करून घुसखोराने सैफच्या पाठीत चाकू खुपसला. त्यामुळे सैफ जागीच कोसळून पडला. दरम्यान घरातील ईतर मंडळी जागी होऊन त्याच्या मदतीला धावली. त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्वरीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करून सुरू असलेला रक्तस्त्राव थांबवत त्याचे प्राण वाचविले.

पण अद्ययावत सुरक्षा व्यवस्था असलेल्या सैफच्या घरात चोराने शिरकाव केलाच कसा? हा प्रश्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पडला असून त्या दिशेनेच बांद्रा तसेच मुंबई गुन्हे विभागाचे पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचे कळते. दरम्यान या घटनेप्रकरणी त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूरने दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात गुन्हेगारा विरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैफवर धारधार चाकूने प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या अज्ञाताची शोध मोहीम तीन पोलीस पथकाकडून सुरू आहे. सैफवर हल्ला करून पसार झालेल्या अज्ञात गुन्हेगाराचा हेतु चोरीचा होता की सैफच्या हत्येचा? याचा ही तपास पोलीस करत आहेत.

तपासाचा भाग म्हणून घरातील प्रत्येक सुरक्षा रक्षकाचे, कर्मचाऱ्यांचे जबाब पोलीस नोंदवत आहेत. तसेच त्यांचे भ्रमणध्वनी ही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. त्याचप्रमाणे परिसरातील सर्व सीसीटीव्ही पुटेज ही पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहेत. बांद्रा पोलीस, गुन्हे शाखा, मुंबई आणि फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी पोहचून या घटनेचा सर्व बाजूने तपास करत आहे.

बाबा सीद्दीकी हत्या प्रकरण, सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबाळ, त्याच्या हत्येची धमकी या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने संपूर्ण बॉलीवूडवर दहशतीचे सावट पसरले आहे.

 

हेही वाचा

लक्षवेधी