छत्रपती संभाजीनगर, दि. ०७ [प्रतिनिधी] :- छत्रपती संभाजीनगर च्या मध्य विधानसभा मतदारसंघात महंत आचार्य विजय यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत असून आचार्य विजय यांच्या विजयासाठी वेरूळ, त्र्यंबकेश्वर येथील प्रमुख आखाड्यातील भक्त वर्गाचा वाढता पाठिंबा प्रस्थापितांच्या काळजाचे ठोके वाढविणारा ठरत आहे.
प्राप्त माहितीनुसार महंत आचार्य विजय हे बाबरी ढांचा जमीनदोस्त करण्यासाठी बाबरीच्या मुख्य बुरुजावर चढलेल्या त्या पहिल्या सहा कारसेवकांपैकी एक कारसेवक आहेत. त्यावेळी झालेल्या गोळीबारात त्यांच्या उजव्या पायाला गोळी लागून ते रक्तबंबाळ झाले होते. गोळी लागून बेशुद्धावस्थेत पडलेल्या महंत आचार्य विजय यांना मृत समजून ईतर मयत कार सेवकांच्या शवासह शरयू नदीत फेकून देण्यात आले होते. पण नदीपात्रात पडल्यानंतर त्यांना जाग आला. ते बेशुद्धावस्थेतून बाहेर आले. धडपडत त्यांनी काठ गाठला. त्यानंतर त्यांच्या मदतीला आलेल्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि ते बचावले.
अशा या आचार्य विजय यांनी त्यानंतर काही वर्षांनी संसारीक आयुष्य, सुख त्यागून संन्यासी मार्ग अनुकरला. हरिद्वार येथील पंच दशनामी जुना आखाडा येथे तपश्चर्या करत ते संन्यासी झाले. त्यानंतर महामंडलेश्वर श्री श्री शांतिगिरी महाराज यांच्या सेवेत शिष्य म्हणून ही त्यांनी काही काळ सेवा केल्याचे कळते. सॉफ्टवेअर क्षेत्रातील नौकरी सोडून, सर्व संसारीक सुख, मोह-माया त्यागून संन्यासी मार्गे धर्म सेवेस आयुष्य अर्पण केलेले महंत आचार्य विजय आता राजसत्तेच्या मार्गे समाजघडविण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीनगर च्या मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रणांगणात उतरले आहेत.
महंत आचार्य विजय यांच्या विजयासाठी वेरूळ घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर येथील प्रमुख आखाड्यासह विविध आखाड्यातील, आश्रमातील भक्त वर्ग दि. ११, सोमवार पासून प्रचारात उतरणार असल्याचे कळते. यानुषंगाने छत्रपती संभाजीनगर [मध्य] विधानसभा मतदारसंघात राम जन्मभूमी आंदोलन काळातील कारसेवकांनी काही बैठका घेत व्यूहरचना आखली असल्याची माहिती समोर आली. या माहितीनुसार विविध आखाडे आणि आश्रमांचा भक्तगण तसेच रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवकांची मोट बांधून महंत आचार्य विजय यांच्या विजयासाठी निर्णायक प्रयत्न होणार आहेत. आचार्य विजय यांच्या या निवडणूक प्रचार तयारीने, विजय संकल्प यात्रेने मात्र प्रस्थापित राजकारण्यांच्या झोपा उडाल्या आहेत. त्यांच्या काळजाचे ठोके चुकत आहेत.