Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकआर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळासाठी ईशारा आंदोलन

आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळासाठी ईशारा आंदोलन

आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, मगच मते मागायला या

मुंबई, दि. ०७ [प्रतिनिधी] :- सत्ताधाऱ्यांना “आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी त्वरीत ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करा, नाहीतर परंपरागत मतदानाला मुकाल….” असा निर्वाणीचा ईशारा देणारे एक दिवसीय धरणे आंदोलन, ईशारा आंदोलन ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने ऐन स्वातंत्र्य दिनी दि. १५ ऑगस्ट, गुरुवार रोजी आझाद मैदान, मुंबई येथे ठेवण्यात आले आहे.

या आंदोलनाविषयी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने मागील दहा वर्षांपासून राज्य शासनाकडे ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापनेची मागणी करण्यात येत आहे. पण शासन यास प्रतिसाद देत नाही. राज्यातील आर्य वैश्य [कोमटी] समाज हा भाजपचा परंपरागत मतदार असणारा समाज म्हणून ओळखल्या जातो. २०१४ साली राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर या समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या. समाजाच्या वतीने नंदकूमार लाभसेटवार आणि ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांनी शासनाकडे ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापनेची मागणी केली.

एवढेच नाहीतर या न्याय्य मागणीच्या पूर्ततेसाठी अनेकवेळा आंदोलने ही केलीत. तरी शासन न्याय देत नसल्यामुळे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी  दि. ०५ मार्च २०२४ रोजी थेट मंत्रालयासमोरच सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न ही केला. तरी भाजप प्रणित महायुती सरकार न्याय देण्यास तयार नाही. त्यामुळे आता दि. १५ ऑगस्ट २०२४, गुरुवार रोजी संघर्ष समिती च्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे ईशारा आंदोलन ठेवण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमाने आर्य वैश्य [कोमटी] समाजाच्या वतीने सत्ताधाऱ्यांना “त्वरीत आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, मगच मतं मागायला या. नाहीतर मतांची अपेक्षा ठेवू नका….” असा ईशारा देण्यात येणार असून आगामी विधानसभा निवडणुकी पुर्वी सत्ताधाऱ्यांनी ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन न केल्यास विधानसभा निवडणुकीत ‘एक ही भूल, कमल का फूल….’ चा नारा देण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा या आंदोलनाच्या माध्यमाने करण्यात येणार असल्याचे कळते.

त्यामुळे आर्य वैश्य [कोमटी] समाजाच्या या मागणीकडे आतापर्यंत गांभीर्याने लक्ष न देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी, सत्तेत असलेल्या समाजाच्या राजकीय नेत्यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण १६ विधानसभा मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने ‘आर्य वैश्य समाज मतदार जनजागृती अभियान’ राबवून ‘एक ही भूल, कमल का फूल….’ असा नारा देत भाजप ला मतदान न करण्याचे आवाहन समाजाला करण्यात येणार असल्याचे कळते. समाजातील गोर-गरीब बांधवांच्या कल्याणासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक समाजबांधवांनी या आंदोलनात समाविष्ट व्हावे, असे आवाहन नंदकूमार लाभसेटवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, राजकुमार मुत्तेपवार, नरेश ऱ्याकावार, बालाजी पांपटवार, गोविंद केशवशेट्टी, संतोष उत्तरवार, अनिल डूब्बेवार, विनोद वट्टमवार, प्रवीण गादेवार, गजानन दमकोंडवार, राजेश कौलवार, पवन मधमशेट्टीवार, संतोष कोटगिरे, संतोष फुटाने, दीपक भावटनकर, विनोद मद्रेवार, राजेश्वर पांपटवार, सुनील जवादवार, सीताराम देबडवार, संतोष रायेवार, गजानन गुंडावार आदींनी केले आहे.

हेही वाचा

लक्षवेधी