Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिक....नाहीतर मते मागायला येऊ नका, मतांची अपेक्षा ठेवू नका !

….नाहीतर मते मागायला येऊ नका, मतांची अपेक्षा ठेवू नका !

ईशारा आंदोलना द्वारे आर्य वैश्य समाजाचा सत्ताधाऱ्यांना ईशारा 

मुंबई, दि. १५ [प्रतिनिधी] :- आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी आर्य वैश्य समाजाने ऐन स्वातंत्र्य दिनी आझाद मैदान, मुंबई येथे ईशारा आंदोलन केले. या ईशारा आंदोलनाद्वारे “आधी आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा. मगच मते मागायला या. नाहीतर मते मागायला येऊ नका. मतांची अपेक्षा ठेवू नका….” असा निर्वाणीचा ईशारा ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने सत्ताधाऱ्यांना देण्यात आला.

या आंदोलनाविषयी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष नंदकूमार लाभसेटवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने मागील दहा वर्षांपासून राज्य शासनाकडे ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापनेची मागणी करण्यात येत आहे. पण शासन यास प्रतिसाद देत नाही. राज्यातील आर्य वैश्य [कोमटी] समाज हा भाजपचा परंपरागत मतदार असणारा समाज म्हणून ओळखल्या जातो. २०१४ साली राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर या समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या. समाजाच्या वतीने नंदकूमार लाभसेटवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांनी ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ ची स्थापना करून शासनाकडे ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापनेची मागणी केली.

एवढेच नाहीतर या न्याय्य मागणीच्या पूर्ततेसाठी अनेकवेळा आंदोलने ही केलीत. तरी शासन न्याय देत नसल्यामुळे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी  दि. ०५ मार्च २०२४ रोजी थेट मंत्रालयासमोरच सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न ही केला. तरी भाजप प्रणित महायुती सरकार न्याय देण्यास तयार नाही. त्यामुळे आज दि. १५ ऑगस्ट २०२४, गुरुवार रोजी संघर्ष समिती च्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे ईशारा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमाने आर्य वैश्य [कोमटी] समाजाच्या वतीने सत्ताधाऱ्यांना “त्वरीत आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, मगच मतं मागायला या. नाहीतर मतांची अपेक्षा ठेवू नका….” असा ईशारा देण्यात आला असून आगामी विधानसभा निवडणुकी पुर्वी सत्ताधाऱ्यांनी ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन न केल्यास विधानसभा निवडणुकीत ‘एक ही भूल, कमल का फूल….’ चा नारा देण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा या आंदोलनाच्या माध्यमाने संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी केली.

त्यामुळे आर्य वैश्य [कोमटी] समाजाच्या या मागणीकडे आतापर्यंत गांभीर्याने लक्ष न देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी, सत्तेत असलेल्या समाजाच्या राजकीय नेत्यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण १६ विधानसभा मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने ‘आर्य वैश्य समाज मतदार जनजागृती अभियान’ राबवून ‘एक ही भूल, कमल का फूल….’ असा नारा देत भाजप ला मतदान न करण्याचे आवाहन समाजाला करण्यात येणार असल्याचे कळते. या आंदोलनात नंदकूमार लाभसेटवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, राजकुमार मुत्तेपवार, नरेश ऱ्याकावार, गोविंद केशवशेट्टी, संतोष उत्तरवार, अनिल डूब्बेवार, विनोद वट्टमवार, प्रवीण गादेवार, गजानन दमकोंडवार, राजेश कौलवार, संतोष फुटाने, दीपक भावटनकर, विनोद मद्रेवार, राजेश्वर पांपटवार, सुनील जवादवार, सीताराम देबडवार, संतोष रायेवार, गजानन गुंडावार, राघवेंद्र गट्टेवार, पंकज पोदुटवार, नागनाथ वट्टमवार, अमोल मद्रेवार, राजेश्वर पालकृतवार, किरण मूत्तेपवार आदींचा सहभाग होता.

हेही वाचा

लक्षवेधी