चंद्रपूर, दि. १६ [गोविंद केशवशेट्टी] :- चंद्रपूर लोकसभा मतदार संघात जाती-पातीच्या नव्हेतर विकासाच्या राजकारणावर, निवडणूक प्रचारावर भर देत भाजप प्रणित ‘महायुती’चे उमेदवार सुधीर मूनगंटीवार यांनी मतदारांच्या मनाचा वेध घेतला असल्याने, मतदारांच्या मनावर आपल्या विकास कार्याचा, विचारांचा ठसा उमटविल्याने या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय दृष्टिक्षेपात दिसून येत आहे.
दृष्टिक्षेपात दिसत असलेला त्यांचा हा विजय मतदारांकडून पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या धर्मपत्नी सपनाताई मूनगंटीवार यांनीही या मतदारसंघातील महिला मतदारांना “आपल्या मताचे, आपल्या भूमिकेचे महत्व लक्षात घेवून मतदान करा. आपल्या समाजाचे, आपल्या राज्याचे, आपल्या देशाचे हीत लक्षात घेवून आपण मतदान केल्यास आपल्या मतदार संघासह आपल्या राज्याच्या, आपल्या देशाच्या विकासाला गती मिळेल. आपले मत हे केवळ मत नसून आपल्या देशाच्या उज्वल भविष्याचे माध्यम होय. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी असलेल्या, आपल्या मतदार संघात विकासाची कामे करणाऱ्या, गोर-गरीब, वंचितांना आपले मानणाऱ्या, त्यांच्या सुखा-दु:खात ऊभे राहणाऱ्या उमेदवारालाच आपले मत देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आदर्श भारत साकार करण्यासाठी मदत करा….” असे आवाहन विविध सभांतून करत नारिशक्ती मूनगंटीवार यांच्या पाठीशी उभी केली असल्याचे पहावयास मिळत आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह त्यांनी घेतलेल्या कॉर्नर बैठका, सभा, प्रचार फेऱ्या यातून त्या महिला मतदारांना जागृकतेने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत आहेत. आपल्या अतिशय संयमीत, समतोल भाषणातून त्या महिला मतदारांना मोदींच्या महिला विषयक योजनांची, धोरणांची माहिती देत राष्ट्राच्या विकासाचा पाया होण्याची, राष्ट्राच्या विकासाला भरारी घेता येण्यासाठी लागणारे पंख होण्याची, आपल्या कुटुंबाप्रमाणेच देशाचा आधार होण्याची साद घालत आहेत. एकीकडे कॉँग्रेस प्रणित ‘इंडिया’ आघाडीच्या महिला उमेदवार प्रतिभाताई धानोरकर जाती-पातीच्या राजकारणाचे विष पेरणारे, अपप्रचार केंद्रित भाषण करत असतांनाच सपनाताई महिला शक्तीला जागृत करणारे, विकासासाठी ऊभे राहण्याचे, देश घडविण्याचे भाषण करत असल्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सपनाताईंच्या भाषणांची, प्रचार तंत्राची चर्चा होत आहे.
“सपनाताईंचे सकारात्मक, प्रेरणादायी भाषण म्हणजे निवडणूक प्रचार नव्हेतर आयुष्याला मार्गदर्शक असे संबोधन वाटत आहे…” अशी बोलकी प्रतिक्रिया अश्विनी डोंगरे या महिला मतदाराने ‘दै. जनजागृती’कडे नोंदविली असून ‘प्रयास महिला बचत गट’ उत्स्फूर्तपणे सपनाताई यांच्या सोबत या प्रचार मोहिमेत सहभागी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रमाणेच सामाजिक कार्यकर्त्या अनघाताई चक्करवार यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकसभा मतदार संघातील शेकडो महिला बचत गट मूनगंटीवार यांच्या प्रचारासाठी संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत असल्याचे ही अश्विनी डोंगरे यांनी सांगितले.
एकूणच भाजप नेत्या चित्रा वाघ, सपनाताई मूनगंटीवार यांनी घातलेल्या सादेला चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील महिला मतदारांचा मिळता प्रतिसाद पाहता कॉँग्रेस उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांचा अपप्रचाराचा प्रयोग त्यांच्याच अंगलट येवून मतदार संघातील महिला मतदार केवळ मतदार म्हणून नव्हेतर राष्ट्राच्या विकासाचा आधार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावत सुधीर मूनगंटीवार यांच्या रूपाने विकासाचे चाक देशाच्या विकास रथाला लावणार असल्याचे स्पष्ट होत आहे.