चंद्रपूर, दि. १३ [दिनेश खांडेकर] :- “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्मिलेल्या नवीन संसद भवनाला आपल्या चंद्रपूरच्याच उच्च प्रतीच्या लाकडाचे दरवाजे आहेत. त्यामुळे ‘खुल जा सिमसिम….’ म्हणताच ते दरवाजे अर्ध्या रात्रीही उघडतील आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला हवे ते देतील…” अशा शब्दांत मतदारांना आश्वस्त करत भाजप प्रणित महायुतीचे उमेदवार सुधीर मूनगंटीवार यांनी मतदारांच्या मनावर आपली छाप सोडल्याचे पहावयास मिळाले.
प्रचाराचा भाग म्हणून ते चंद्रपूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या गोंडपिंपरी येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी, “गोंडपिपरीच्या विकासासाठी आवश्यक तो विकासनिधी आणण्याचा शब्द मी दिला होता. त्या शब्दाला जागत २३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी आणून मी माझे कर्तव्य पूर्ण केले. पण काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीने काय केले?” असा सवाल उपस्थित करत मतदारांना अंतर्मुख केले. “मला लोकसभेत निवडून दिले तर गोंडपिपरीचा कायापालट होईल….” असा विश्वास देत “आपल्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी दि. १९ एप्रिलला कमळाचं बटण दाबा आणि पुन्हा एकदा मोदी सरकार आणा…” असे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.
गोंडपिपरी येथे आयोजित सभेला मुनगंटीवार संबोधित करत होते. यावेळी माजी आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, बबन निकोडे, अमर बोडलावार, चेतनसिंग गौर, मनिषा मडावी, मनिषा दुर्योधन, शारदा गरपल्लीवार, अश्विनी तोडासे, कोमल फरकाडे, सुरेखा श्रीकोंडावार व अॅड. अरुणा जांभुळकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी भाजपाचे युवा कार्यकर्ते प्रशांत येल्लेवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
गोंडपिपरी परिसराचा विकास करण्याची माझी तीव्र इच्छा असून हे कार्य तुमच्या आशीर्वादाशिवाय अशक्य आहे. त्यामुळे दि. १९ एप्रिलला मतदानाच्या दिवशी कमळ चिन्हाचे बटन दाबून जर तुम्ही मला निवडून दिले तर गोंडपिपरीतील अपूर्ण कामे पूर्ण करेन. तुम्ही मला जेवढे मतदान कराल त्याच्या कित्येक पट भरभरून विकास आपल्या वाट्याला येईल. जो देशाच्या बाजूने उभा राहिला त्याच्या बाजूने हा देश उभा राहीत आला आहे, याचा विचार करून राष्ट्रहिताच्या बाजूने ऊभे राहा, राष्ट्रहितासाठी मतदान करा अशी सादही मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून घातली.
एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र, सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, स्टेडियम, सामाजिक सभागृह, नाट्यगृह, चिचडोह प्रकल्प अशा अनेक विकास कामांचा उल्लेख करताना ना. मुनगंटीवार म्हणाले, “विश्वगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी सरकार येणे निश्चित असून मोदीजींचा विकासरथ गोंडपिपरीपर्यंत आणण्याचे मी वचन देतो. मोदीजींना साजेसा खासदार तुम्ही निवडून दिला तर महिला, बेरोजगार, बचत गटांचा लोकसभेत आवाज बुलंद करेन. संसदेला चंद्रपूरचे दरवाजे लावलेले असल्यामुळे ‘खुल जा सिमसिम’ असे म्हणताच आपल्यासाठी अर्ध्या रात्रीही ते दरवाजे खुले होतील तसेच राज्य आणि केंद्राच्या तिजोरीतील निधी देखील गोंडपिपरीच्या विकासासाठी आणता येईल.”अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.