चंद्रपूर, दि. ११ :- खनिज संपत्तीची देणगी लाभलेल्या, वन संपदेने नटलेल्या, वाघांच्या वास्तव्यामुळे जागतीक पातळीवर पर्यटन नगरी म्हणून ख्याती असलेल्या, थोर समाजसेवक बाबा आमटेंच्या पुण्यकर्माने पावन झालेल्या चंद्रपूर नगरीचा विकास मात्र अद्याप पावेतो हवा तसा झाला नसून या पावन नगरीचा सर्वांगीण विकास साधून कायापालट करण्याच्या दृष्टीने महायुतीचे उमेदवार सुधीर मूनगंटीवार यांनाच या लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी देणे योग्य ठरेल, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मतदार देतांना दिसून येत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात म्हणजेच दि. १९, शुक्रवार रोजी चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. त्यामुळे येथील प्रचाराच्या पाऱ्याने सध्या उच्चांकी पातळी गाठली आहे. दि. ०८, सोमवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूनगंटीवार यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेने मतदार संघातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून देशात, राज्यात, विदर्भात असलेल्या मोदी लाटेने चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ही चांगलीच उसळी घेतली आहे. “सुधीर मूनगंटीवार चंद्रपूर नगरीके भाग्यविधाते होगे….ये मोदी की गॅरंटी है…” अशा घोषणा देत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मतदारच उत्स्फूर्तपणे मूनगंटीवारांचा प्रचारक झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. यास कारणही तसेच असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या एका विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुधीर मूनगंटीवारांचे विकास कार्यच मतदारांना भुरळ घालत आहे.
विविध लोकसभा मतदार संघाच्या आढाव्याप्रमाणेच ‘दै. जनजागृती’ टीम या लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या मनाचा कानोसा घेत आहे. दि. ०८, सोमवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपासून ‘दै. जनजागृती’ टीम या लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या मूल, चिमुर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, गोंडपिंपरी आणि चंद्रपूर शहर भागातील मतदारांच्या मनाचा कानोसा घेत आहे. मतदार संघातील मतदारांच्या मनाचा अचूक कानोसा घेतायावा यासाठी ‘दै. जनजागृती’चे प्रतिनिधी दिनेश खांडेकर, बंडू पाटील, विनोद वट्टमवार, प्रफुल खोब्रागडे हे मतदारांशी एक सामान्य नागरीक म्हणून बसस्थानक, चाहा टपऱ्या, उद्याने, ईतर काही व्यापारी केंद्रांच्या ठिकाणी तसेच बस प्रवासात लोकांशी राजकीय चर्चेला सुरुवात करून लोकांच्या मनाचा कानोसा घेत आहेत.
या कानोस्यातून असे निदर्शनास येत आहे की, जागतीक स्तरावर नाव असलेल्या चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विचार करता चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा विकास हवा तसा झालेला नाही. एक जागतीक दर्जाची पर्यटन नगरी असलेल्या चंद्रपूर नगरीचा कायापालट करण्यासाठी, या मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे सुधीर मूनगंटीवार यांनाच या मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी देणे योग्य ठरेल, अशा मतास या मतदारसंघातील मतदार पोहोचले आहेत. या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने केलेल्या विकासकामांद्वारे सुधीर मूनगंटीवारांनी मतदारांच्या मनात विकासपुरुष म्हणून मिळविलेले स्थान, त्यांच्याकडे विकासाची असलेली दूरदृष्टी, जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्या कार्याला वाहून घेण्याची त्यांची प्रवृत्ती, मतदारांशी आपला माणूस म्हणून त्यांची बांधून असलेली नाळ, मतदार संघातील राजकीय आकडेवारीचे गणित लक्षात घेवून त्यांनी केलेली मोर्चेबांधणी, विरोधात फक्त अफवा तंत्राच्या बळावर आपले नसीब आजमवू पाहणारा उमेदवार आणि त्यात मोदी लाट यामुळे मतदार सुधीर मूनगंटीवार यांचा विजय निश्चित असल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतांना, जागोजागी आजच त्यांचे विजयी औक्षण करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतांना दिसून येत आहे.