Thursday, January 9, 2025
Homeलेखगरिबी ठरली श्राप : कौटुंबिक अत्याचाराने घेतला पीडितेचा; 'मनी अँड मसल' पावरने...

गरिबी ठरली श्राप : कौटुंबिक अत्याचाराने घेतला पीडितेचा; ‘मनी अँड मसल’ पावरने घेतला कायद्याचा जीव….!

"नमिताला न्याय देण्यासाठी, आरोपींना अद्दल घडविण्यासाठी लक्ष घाला देवेंद्रजी...."

आपण खरच एकविसाव्या शतकात आहोत का….? आपण खरच पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून उभ्या राहत असलेल्या महिला प्रगत देशात आहोत का…? असे प्रश्न उपस्थित करणारी, काळीज पिळवटून टाकणारी दु:खद घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्ञानेश्वर नगर, सुतगिरणी चौक परिसरात घडली. पतीच्या विवाह बाह्य संबंधाला, कौटुंबिक अत्याचाराला वैतागून एका पीडितेने प्राण त्यागलेली ही दुर्दैवी घटना ‘मनी अँड मसल’ पावर कायद्याचा कसा जीव घेते…याचे प्रमाण देणारी घटना ठरत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही….!

या घटनेविषयी मयत दुर्दैवी नमिता च्या वडिलांनी दिलेल्या पोलीस तक्रारीतील कथणावरून असे निदर्शनास येते की, नांदेड येथील एका गरीब कुटुंबातील नमिता गंगाधर मनाठकर ह्या मुलीचा विवाह सुखी, समृद्ध आयुष्याच्या अपेक्षेने तिच्या आई-वडिलांनी १४ जुलै २००९ साली मुखेड येथील कैलास विजय चौधरी यांच्याशी लावून दिला आणि नमिता च्या सुखी नव्हेतर जळत्या लाकडा सारख्या दु:खी आयुष्याची सुरुवात झाली.

केवळ गरीब घरची म्हणून नमिताला तिच्या पतीचा मोठा भाऊ, सासरा, सासू मानसिक त्रास देत असत आणि पती नमिताच्या ननंदांचे ऐकून तीचा शारीरिक छळ करत असे. आपल्या घरची गरीब परिस्थिती, आपल्या समाजाची मानसिकता या बाबींचा विचार करून नमिताने सासरच्या मंडळीचा हा त्रास काही वर्षे सहन केला. पण त्रास जिवावर बेतायला लागल्यानंतर नमिताने या बाबतची वाच्यता आई-वडील, बहीण-भावांकडे सुरू केली. त्यानुसार तिचे वडील त्यांच्या काही नातेवाईकांसह तिच्या मुखेड येथील घरी गेले. नमिताच्या नातेवाइकांनी केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत नमिता च्या पतीने आणि सासरच्या मंडळीने नमितास चांगल्या पद्धतीने वागविण्याचा शब्द त्यांना दिला.

दरम्यान पाच-सात वर्षांपूर्वी कैलास त्याची पत्नी नमिता सह छत्रपती संभाजीनगर येथे राहण्यास आले. कैलासचे ज्ञानेश्वर नगर भागात प्लायवूडचे दुकान आहे. तिथेच वर त्यांचे निवास. संभाजीनगर येथे राहण्यास आल्यानंतर नमिताला पती आणि तिच्या सासरच्या मंडळीकडून परत कौटुंबिक त्रास सुरू झाला. ह्या कौटुंबिक त्रासाने त्रस्त नमिताने परत तिच्या घरच्यांकडे याबात माहिती देतांना “तुम्ही जर मला येथून घेवून गेला नाहीत, तर तुम्हाला माझी डेड बॉडीच मिळेल….” अशा शब्दांत आपले दु:ख मांडल्याचे कळते. पण “लग्न म्हणजे काय भाकरी वरची भाजी नव्हे….” म्हणत, तिचीच समज काढत तिच्या माहेरच्यांनी तिला सहन करत जगण्याचा सल्ला दिला.

नमिताच्या आई-वडिलांच्या नम्र भूमिकेचा गैर फायदा घेत नमिताचा पती कैलास याने नमिताच्या भावाकडे पैशांची मागणी सुरू केली. आपल्या बहिणीला होत असलेला त्रास कमी व्हावा म्हणून नमिताचा भाऊ सुमित याने दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी त्याच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून कैलास चौधरीच्या बँक ऑफ इंडिया च्या खात्यात रक्कम रुपये ५ लाख पाठविले. पण तरी कैलास आणि त्याच्या घरच्याकडून नमिताला देण्यात येणारा त्रास कमी झाला नाही. आपल्या मुलीला न्याय मिळावा, गुन्हेगारांना शासन व्हावे म्हणून नमिताचे वडील गंगाधर मनाठकर यांनी केलेल्या तक्रारीत नमूद असल्याप्रमाणे तिच्या सासरच्या मंडळीकडून तिला मोलकरणी सारखी वागणूक देण्यात येत होती. वेळेवर जेवायला सुद्धा देण्यात येत नव्हते. नवरा, भासरा, सासरा, सासू, ननंदा या सगळ्यांकडून तिला देण्यात येत असलेला शारीरिक आणि मानसिक त्रास, नवऱ्याचे विवाह बाह्य संबंध या जळतापी बाबींना वैतागून नमिता नामक उच्च शीक्षीत, गोल्ड मेडलिस्ट दोन मुलांच्या या मातेने अखेर गळफास घेवून आपले जीवन संपविले….!

मृत्यूच्या अवघ्या काही वेळा पुर्वी तिच्या भ्रमणध्वनीवरुन तिच्या बहिणीच्या भ्रमणध्वनीवर आलेले आणि काही क्षणातच उडालेले संदेश….तिच्या शरीरावर आढळून आलेल्या झटापटीच्या खुना, तिच्या गळ्यावर साडीच्या फासाच्या नव्हेतर दोरीने आवळल्याच्या दिसून येणाऱ्या खुना ह्या बाबी नमिता ने आत्महत्या केली की नमिता ची हत्या झाली….? याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या बाबी ठरत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधत नमिताच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी नमिताच्या पतीसह तिच्या सासरच्या मंडळींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिसांना केली.

पण ‘मनी अँड मसल’ पावरने कायद्याचा गळा घोटला आणि नमिताच्या मृत्यू प्रकरणी कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल न होता कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच कलम ४९८ [अ] अंतर्गत छळाचा गुन्हा दाखल झाला.

धक्कादायक म्हणजे, नमिताच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आरोपी कैलास चौधरी, विलास चौधरी, विजय चौधरी, मंगल चौधरी आणि ईतर आरोपी पोलिसांच्या नजरकैदेत नमिताच्या अंत्यविधीस उपस्थित होते. नमिताच्या अंत्यविधीनंतर त्यांची रवानगी हर्सुल जेल मध्ये होणे अपेक्षीत असतांना त्यांना फरार म्हणून जामिनासाठी मोकळे रान दिल्या गेले. हा एक प्रकारे ‘मनी अँड मसल’ पावरने घेतलेला कायद्याचा बळीच होय…!

त्यामुळे आता या प्रकरणी नमिताच्या नातेवाईकांनी नमिताला न्याय मिळवून देण्यासाठी, नमिताच्या गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी एकीकडे मा. न्यायालयात धाव घेतली असून दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “नमिताला न्याय देण्यासाठी, आरोपींना अद्दल घडविण्यासाठी लक्ष घाला देवेंद्रजी….” म्हणत साकडे घातले आहे. “नमिताला न्याय देण्यासाठी, आरोपींना अद्दल घडविण्यासाठी लक्ष घाला देवेंद्रजी….” असा एक हॅशटॅग ट्रेंड ही सामाजिक प्रसार माध्यमांवर सुरू केला आहे.

ही घटना म्हणजे १९८०, १९९० च्या दशकातील हुंडा बळीच्या, कौटुंबिक छळाच्या काळ्याकुट्ट इतिहासाची भितीदायक आठवण करून देणारी घटना असून या घटनेमुळे उप-वधू मुलींच्या आई-वडिलांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. त्यामुळे नमिताच्या गुन्हेगारांना वेळीच अटक करून अद्दल घडविल्यास आणखीन एखादी ‘नमिता’ कौटुंबिक आत्याचाराची बळी ठरणार नाही….नमिताच्या मुलांप्रमाणे अन्य कोण्या ‘नमिता’ ची कोवळी मुले मायेच्या प्रेमाला मुकणार नाहीत….हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाणे आवर्जून लक्षात घेणे आवश्यक आहे…!

ब्रह्मानंद चक्करवार….🖋️

हेही वाचा

लक्षवेधी