छत्रपती संभाजीनगर, दि. ०१ [प्रतिनिधी] :- शहरातील सिडको उड्डाण पुलाच्या कठड्याला गॅस टँकरची धडक लागून आज सकाळी ०८.०० वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाल्याची धोकादायक घटना सिडको परिसरात घडली. या अपघाताने प्रचंड धोकादायक अशी सुरू झालेली गॅस गळती पाहून परिसरातील रहिवाशांमध्ये, व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. आजूबाजूच्या चाहा टपरी, हॉटेल चालकांनी आपली दुकाने, हॉटेल सोडून परिसरातून पळ काढला. प्रशासनाची तारांबळ उडाली.
या खळबळजनक घटनेने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून सुरू असलेल्या गॅस गळतीने काही अनुचित घटना घडूनये म्हणून प्रशासनाच्या वतीने परिसरातील रहिवाशांना, व्यावसायिकांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा, ज्वलंशील वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारी म्हणून या संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या सिडको पोलिसांनी घटनेची माहिती अग्निशमन विभाग, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देवून संपूर्ण परिसरातील रहिवाशांच्या जीविताची खबरदारी म्हणून महावितरण अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देत परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला असल्याचे कळते.
त्याचप्रमाणे संपूर्ण सिडको परिसरात पोलीस व्हॅन फिरवत रहिवाशांना घरातील गॅस किंवा अन्य कोणत्याही ज्वलंशील वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या. या भयानक अपघाताचे गांभीर्य लक्षात घेवून छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस प्रशासनाने, अग्निशमन विभागाने, जिल्हा प्रशासनाने, महावितरण प्रशासनाने पार पाडलेल्या कर्तव्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पण खबरदारी म्हणून अद्याप ही सिडको परिसरातील विद्युत पुरवठा बंद असून अग्निशमन विभागाकडून बचावात्मक कार्य सुरू आहे.
या भयंकर अपघाताबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरातील सिडको उड्डाण पूलांवरून आज सकाळी ०८.०० वाजेच्या सुमारास गतीने मार्गस्थ होत असलेल्या ज्वलंशील गॅस वाहतूक करणाऱ्या गॅस टँकरचा वाल उड्डाण पुलाच्या कठड्याला लागल्याने टँकर उलटला आणि मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली.