Monday, December 23, 2024
Homeशहरकौण कहता है आसमान में सुराग नहीं होता....? एक पत्थर तों तबियत...

कौण कहता है आसमान में सुराग नहीं होता….? एक पत्थर तों तबियत से उच्छालों यारों….! देवानगरी येथील देशी दारूचे दुकान उघडण्यास अधिक्षकांची बंदी

देवानगरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला अनपेक्षीत यश

छत्रपती संभाजीनगर, दि. २० [प्रतिनिधी] :- शहराच्या देवानगरी भागातील रहिवाशांनी मागील चार-पाच दिवसांपासून उत्स्फूर्तपणे सुरू केलेल्या देशी दारु दुकाना विरुद्धच्या आंदोलनाला आज एक निर्णायक स्वरूप प्राप्त झाले. राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक संतोष झगडे यांनी आंदोलकांचा आक्रमक पावित्रा लक्षात घेवून सदर विवादास्पद दुकान सुनावणी होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. अधिक्षक झगडे यांच्या या अनपेक्षीत तात्काळ कारवाईने ‘कौण कहता है आसमान में सुराग नहीं होता….? एक पत्थर तों तबियत से उच्छालों यारों….!’ असा एक वाक्यप्रचार हिंदी साहित्यात आहे; याचीच प्रचिती आज देवानगरी परिसरातील आंदोलकांना आली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

शहराच्या देवानगरी भागातील रहिवाशांच्या तसेच या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने अतिशय तापदायक ठरलेल्या देशी दारूच्या दुकाना विरुद्ध मागील चार-पाच दिवसांपासून एक उत्स्फूर्त आंदोलन सुरू आहे. या परिसरातील सामान्य महिला-पुरुष अचानकपणे एकत्र आले. त्यांनी संबंधीत विवादास्पद देशी दारूच्या दुकानाविरुद्ध उठाव केला. आक्रमक पवित्रा घेत ते दुकान बंद पाडले. तेथील विकृत, विक्षीप्त, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दारुड्यांना पिटाळून लावले. परिसरातील अपार्टमेंट मध्ये बैठका घेतल्या. लोक भावना जाणून समाजसेवेचा भाग म्हणून राजकारणात सक्रिय असलेल्या माजी उप-महापौर संजय जोशी यांच्या माध्यमाने प्रशासनाकडे आपल्या व्यथा मांडल्या आणि अशक्य वाटणारे काम अवघ्या चार-पाच दिवसांत तडीला लावले.

या पुर्वीही हे देशी दारूचे दुकान, येथील गुंडांचे उपद्रव बंद करण्याचे प्रयत्न परिसरातील सजग रहिवाशी संग्राम पवार, शिवानंद वाडकर अप्पा, सारंग पवार आदींनी केले होते. पण संबंधीत देशी दारू दुकान चालकाने त्यावेळी आपल्या राजकीय संबंधांचा तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील संबंधांचा यथोचित वापर करून असे यश मिळू दिले नव्हते. तो अनुभव लक्षात घेवून आंदोलकांनी यावेळी संबंधीत देशी दारू दुकाना विरुद्धच्या आंदोलनाला योग्य दिशा आणि योग्य गती देत यशाचा हा पहिला टप्पा गाठला. यामुळे देवानगरी परिसरात आनंदाची एक वेगळीच लाट निर्माण झाली असून आता काहीही करून सदर तापदायक देशी दारूचे दुकान कायमचेच बंद पाडण्याचा दृढ संकल्प परिसरातील रहिवाशांनी केला असल्याचे कळते.

याबाबत प्रसार माध्यम प्रतिनिधींना देवानगरी संघर्ष समितीच्या वतीने माहिती देतांना संजय जोशी म्हणाले की, “देवानगरी येथील देशी दारूच्या दुकानामुळे होणारा त्रास असह्य झाल्यामुळे उद्रेक घडून आला. त्रस्त महिलांनी उठाव करत देशी दारूचे दुकान बंद पाडले. तिथे नेहमी धिंगाणा घालून सामान्यांना त्रास देणाऱ्या दारुड्यांना पिटाळून लावले. आंदोलक महिलांचा-पुरुषांचा हा उठाव कुणा विरुद्धच्या व्यक्तिगत आकसातून नसून त्यांना होत असलेल्या असह्य त्रासामुळे आहे. या बाबीची दखल संतोष झगडे, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनी घेतली असून सदर दुकान सुनावणी होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतश: आभारी आहोत.”

त्याच बरोबर या आंदोलनाला निर्णायक स्वरूप देण्यासाठी परिसरातील रहिवाशी मीनाक्षी सोनवणे, नेत्रा जोशी, विना पवार, गायकवाड ताई, रोहिणी पवार, पारखे ताई, भट ताई, संगेकर ताई, निता पांडे, शेटे ताई, खोबरे ताई, कुलकर्णी ताई, लोणीकर ताई, शिवानंद वाडकर अप्पा, संग्राम पवार, मिथुन व्यास, योगेश वाणी, सारंग पवार, ब्रह्मानंद चक्करवार, गौरव गुप्ता, स्वराज गोरडे पाटील, बबलू धर्मपुरी, मेने साहेब, मनोज पारखे, प्रशांत देशमुख, योगेश साळवे यांनी घेतलेल्या भूमिकेचे, परिश्रमाचे ही कौतुक करत या आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येकांचे आभार यावेळी संजय जोशी यांनी देवानगरी संघर्ष समितीच्या वतीने मानले.

हेही वाचा

लक्षवेधी