Monday, December 23, 2024
Homeशहरअश्रु पुसायला बीड मध्ये गेलात, अंतरवाली-सराटी मध्ये का आला नाहीत?

अश्रु पुसायला बीड मध्ये गेलात, अंतरवाली-सराटी मध्ये का आला नाहीत?

मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सवाल

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ [प्रतिनिधी] :- राज्याचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या हिंगोली येथील सभेनंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर “मराठ्यांना सरसगट आरक्षण मिळणार म्हणून छगन भुजबळ बावचाळले असून ते जातीय तेढ निर्माण करत आहेत. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद चिघळवत आहेत.” असे आरोप करत “त्यांना अश्रु पुसायला बीड मध्ये जाता येते तसे अंतरवाली-सराटीत का येता येत नाही?” असा सवाल उपस्थित केला आहे.

मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकार विरुद्ध आंदोलनाचे शस्त्र उपसणारे मनोज जरांगे पाटील सध्या शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर जरांगे यांच्या आंदोलनाला, सभांना, टीकांना उत्तर देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी जालन्या पाठोपाठ हिंगोली येथे दि. २६. रविवार रोजी ओबीसी मेळावा घेतला. या मेळाव्यात ओबीसी नेते तायवाडे यांनी जरांगे पाटलांबाबत वादग्रस्त विधान केले. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी ही जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली.

भुजबळ यांनी जरांगे पाटील यांची अक्कल काढत राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत स्थापन केलेली शिंदे समिती त्वरीत बरखास्त करण्याची मागणी केली. यावर बोलतांना जरांगे पाटील यांनी, “त्यांचे केसं कसे आणि का पांढरे झाले ते त्यांनाच माहीत. जर त्यांना ते मागणी करत आहेत तशा आमच्या नोंदी रद्द झाल्यातर त्यांच्या ही होतील. आमचे आरक्षण गेले, तर त्यांचे ही जाईल, हेच कळत नसेल तर काय अर्थ?” अशा शब्दांत आपले मत मांडले.

यावेळी पुढे बोलतांना जरांगे यांनी असे वक्तव्य केले की, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सामाजिक, शासकीय, कायदेशीर दृष्ट्या सिद्ध होत आहेत. या नोंदी न्यायालयात सिद्ध झाल्यास भुजबळांचा खोटारडेपणा सिद्ध होईल, भुजबळ उघडे पडतील, त्यांचे सामाजिक, राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून ते ओबीसीना मराठा समाजा विरुद्ध भडकविण्याचे उपद्रव करत आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी