छत्रपती संभाजीनगर, दि. २८ [प्रतिनिधी] :- “उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास विधानसभा लढवून गद्दारांना धडा शिकवू….” असे विधान करून पक्षाबाहेरील आणि पक्षांतर्गत विरोधकांत खळबळ उडवून देणाऱ्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना शिवसेना आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी “आधी उमेदवारी मिळते का ते बघा. उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षांतर्गत विरोध क्षमवून लढता येते का ते बघा आणि नंतर पाडण्याची, गाडण्याची भाषा वापरा….” अशा शब्दांत प्रतिआव्हान दिले.
संजय शिरसाट यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या छत्रपती संभाजीनगर [प] विधानसभा मतदार संघात आज नवनिर्वाचित खासदार संदीपान भूमरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना खासदार संदीपान भूमरे आणि आमदार संजय शिरसाट यांनी “आधी उमेदवारी तर मिळवा. उमेदवारीच भेटते की नाही, तेच माहीत नाही आणि चालले पाडून टाकू, गाडून टाकू म्हणायला. उमेदवारी घेवून या मग बघा कोण कोणाला पाडतो, कोण कोणाला गाडतो….” या शब्दांत खैरेंवर शरसंधान साधले.
काही दिवसांपूर्वीच भाजपचे पदाधिकारी राजु शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर पक्षात आपले महत्व वाढविण्याच्या, टिकविण्याच्या दृष्टीने चंद्रकांत खैरे विधानसभा लढविण्याची भाषा करत असल्याच्या चर्चा आहेत. “मी गद्दारांना धडा शिकविण्याची पूर्ण तयारी केली आहे. फक्त पक्ष नेतृत्वाने संधी द्यावी….” असे म्हणत खैरे यांनी स्वत: या चर्चाना खतपाणी घातले. यावरूनच पत्रकारांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शिंदे गटाचे खासदार संदीपान भूमरे आणि आमदार संजय शिरसाट यांनी खैरेंना हे प्रतिआव्हान दिले आहे.
यावेळी बोलतांना खासदार भूमरे यांनी, “खैरेंनी उमेदवारी आणावीच आम्ही, जनता त्यांचे डिपॉजिट जप्त करेल…” असे ही भाष्य करत खैरेंना प्रतिआव्हान दिले.