बल्लारपूर, दि. १७ [प्रतिनिधी] : – ज्या बल्लारपूरच्या सागवानाने अयोध्येतील राम मंदिराचा कोपरा न् कोपरा सुगंधीत झाला, त्या बल्लारपूरचा विकास बघून मी थक्क झालो. त्यामुळे ‘बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे बाहुबलीने राजमाता शिवगामीची पावले थांबू दिली नाहीत, त्याचप्रमाणे तुम्ही देखील सुधीरभाऊंच्या नेतृत्वात विकासाचे पाऊल थांबू देऊ नका. बल्लारपूरच्या ‘पॉवरफुल्ल’ विकासासाठी, अधिक उज्वल भवितव्यासाठी सुधीरभाऊंना अभूतपूर्व मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा दक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांनी केले.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ डब्ल्यूसीएल कॉलनी मैदानावर पवन कल्याण यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. हजारों मतदारांच्या उपस्थितीने या सभेला विराट सभेचे रूप आले. पवन कल्याण यांचे भाषण सुरू असताना प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांच्या विजयावर शिक्का मोर्तब करणारी ही सभा ठरली, अशी चर्चा केवळ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातच नव्हेतर संपूर्ण विदर्भात सुरू आहे.
पवन कल्याण म्हणाले, “सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या दृष्टीने बल्लारपूरचा प्रवास सर्वांगीण विकासाच्या दिशेने सुरू आहे. एसडीओ किंवा तहसील कार्यालय असो वा विमानतळासारखे बसस्थानकाचा निर्माण असो. येथील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे असो किंवा जातीपाती भेद न करता समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करणे असो. सुधीरभाऊंनी प्रत्येक क्षेत्रात काम केले. त्यामुळे त्यांनी केलेली कामे लक्षात ठेवा आणि येत्या २० नोव्हेंबरला कमळ चिन्हाची बटण दाबून प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा.”
सुधीरभाऊंनी चंद्रपूरला एसएनडीटी, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र मतदारसंघात आणून मोठे काम केले आहे. भारताला आर्थिक महासत्ता होण्यासाठी आणि महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी अश्याप्रकारच्या केंद्रांचे मोठे योगदान राहणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुधीरभाऊंनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, या शब्दांत पवन कल्याण यांनी मुनगंटीवार यांच्या योगदानाचे कौतुक केले.
तेलगूसह मराठीतही भाषण
पवन कल्याण यांनी तेलगूसह मराठीतही भाषण केले. सुरुवातीला त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र’ असा जयघोष केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींनाही त्यांनी मराठीतच अभिवादन केले. “माझे मराठी शिकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी मराठी बोलताना चुकलो तर मला क्षमा करा. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचारवारीसाठी येता आले, याचा आनंद आहे.” अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
पवन कल्याण यांच्या नावाने ‘कल्याण मंडपम्’ उभारणार -मुनगंटीवार
बल्लारपुरातील तेलगू बांधवांनी देशाची सेवा केली. तेलगू बांधवांच्या कल्याणासाठी मलाही तेलगू साहित्य अकादमीची स्थापना करता आले. मंदिर निर्माण करता आले. सामाजिक सभागृह उभारता आले. तेलगू बांधवांच्या संघटनेसाठी खूप काम केले आणि पुढेही करणार आहे. आता पवन कल्याण यांच्या नावाने बल्लारपुरात ‘कल्याण मंडपम्’ उभारणार आहे, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली. त्याचवेळी पवन कल्याण यांच्या आगमनाने व सभेत हजारों संख्येने उपस्थित तेलगू समाजाच्या आशीर्वादाने माझा विजय सुनिश्चित झाल्याची भावनाही मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
बल्लारपूर विधानसभेच्या विकासासाठी कटिबद्ध-मुनगंटीवार
बल्लारपूरसाठी तहसील कार्यालय, एसडीओ, ग्रामीण रुग्णालय उभारले. नगर परिषदेची इमारत बनवत आहे. बसस्टॅण्ड, सैनिक स्कुल, स्टेडियम, जलतरण केंद्र, नाट्य गृह,डिजीटल स्कुल बांधले. स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरची निर्मिती केली. यापुढेही बल्लारपूर मतदारसंघाच्या अभूतपूर्व विकासासाठी मी कटिबद्ध होतो, कटिबद्ध राहील, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.