Homeशहर'पूर्णवादी' च्या ठेवीदारांचा जीव टांगणीला; आणखीन एक कोट्यावधीची हेराफेरी उघड !

‘पूर्णवादी’ च्या ठेवीदारांचा जीव टांगणीला; आणखीन एक कोट्यावधीची हेराफेरी उघड !

संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी

बीड, दि. १२ [विनोद घिगे] :- पूर्णवादी नागरिक सहकारी बँक लि. बीड मधील आणखीन एक कोट्यावधीची हेराफेरी उघड झाली असून ‘पूर्णवादी’ चे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर यांच्या अशा ‘निरंतर’ हेराफेरीने बँकेच्या ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला असल्याचे पहावयास मिळत आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूर्णवादी नागरिक सहकारी बँक लि. बीड चे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर यांचा बँकेतील भ्रष्ट हस्तक्षेप अद्याप ही पूर्ववत आहे. त्यांच्या निर्देशानुसारच बँक ठेवीदारांच्या ठेवी खिरापत म्हणून बोगस कर्जदारांना वाटण्याचा ‘निरंतर’ प्रताप आता बँकेच्या मुळावर उठला आहे. ‘पूर्णवादी’ बँक तोट्यात आली आहे. परंतु हा तोटा उघड झाला तर ठेवीदार विचलीत होतील. ठेवी काढून घेण्यासाठी ठेवीदारांची झुंबड उडेल, भारतीय रिझर्व बँकेकडून निर्बंध येतील म्हणून ‘पूर्णवादी’ संचालक मंडळाकडून तोट्याचे आकडे लपवून, स्थावर मालमत्तांच्या किंमतीचे आकडे फुगवून जवळपास १४ कोटींची हेराफेरी करत ०९ कोटीने तोट्यात असलेली बँक ०४ कोटीने नफ्यात असल्याचा बनाव करण्यात आला असल्याचे कळते.

बँकेवर आपले वर्चस्व कायम ठेवत ठेवीदारांच्या ठेवी खिरापत म्हणून वाटण्याच्या, केलेले बोगस कर्जवाटप बेकायदेशीरपणे माफ करण्याच्या त्यातून आपले उखळ पांढरे करून घेण्याच्या ‘निरंतर’ प्रयोगातून तोट्यात आलेली ‘पूर्णवादी’ बनावट पद्धतीने नफ्यात दाखविण्यात आली असल्याची ही बाब बँकेच्या लेखापरीक्षण अहवालातून उघड झाली आहे.

लेखापरीक्षण अहवालानुसार ‘पूर्णवादी’ संचालक मंडळाने पाच प्रकारे आकड्यांची हेराफेरी करून ही बँक नफ्यात दाखवून ठेवीदारांची, सहकार खात्याची, शासनाची फसवणूक केली असल्याचे कळते. राज्यभर गाजलेले जालना येथील ‘वेअर हाऊस’ कर्जवाटप प्रकरण, त्यात बँकेची झालेली ०७ कोटी २९ लाखांची फसवणूक जगजाहीर असूनही ‘पूर्णवादी’ च्या संचालक मंडळाने या विषयक तरतुदीचा खरा आकडा ही लपविण्याचे भ्रष्टकृत्य केले. ‘पूर्णवादी’ तील ‘निरंतर’ भ्रष्टाचार लपविण्यासाठी, तोट्यात असलेली बँक नफ्यात असल्याचे दाखविण्यासाठी संचालक मंडळाने ०४ कोटी ५५ लाखांची तरतूद लपविली.

भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार बुडीत कर्ज प्रकरणात बँकेने शंभर टक्के तरतूद करणे बंधनकारक आहे. त्यानुसार बँकेने जालना ‘वेअर हाऊस’ कर्ज प्रकरणी ०७ कोटी २९ लाखांची तरतूद करणे बंधनकारक होते. परंतु बँक तोट्यात नसून नफ्यात असल्याचा बनाव करण्यासाठी बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर यांच्या निर्देशानुसार विद्यमान संचालक मंडळाने या प्रकरणात केवळ ०३ कोटी ३६ लाखांची तरतूद केली. म्हणजे ०४ कोटी ५५ लाख रुपयांचा तोटा लपविला.

त्याचप्रमाणे बँकेच्या मालकीच्या असलेल्या दोन स्थावर मालमत्तांची किंमत ०८ कोटी ८४ लाखांनी अधिक दाखवून हा मूर्त नफा बँकेच्या जमा खात्यात दाखवत बँकेच्या नफ्यात बनावट वाढ करण्यात आली. याबाबत ही लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संचालक मंडळाने जालना ‘वेअर हाऊस’ बाबत लपविलेली तरतूद आणि बँकेच्या स्थावर मालमत्तांचे बनावट पुनर्मुल्यांकन या आधारे केलेली ही १३ कोटी ३९ लाखांची हेराफेरी जरी बँक नफ्यात असल्याचे दाखविण्यासाठी संचालक मंडळाला फायद्याचे ठरत असले तरी प्रत्यक्ष बँकेच्या दृष्टीने मात्र हे अत्यंत घातक ठरणारे आहे.

त्यामुळे या १३ कोटी ३९ लाखांच्या फेराफेरी प्रकरणी बँकेच्या लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणे ‘पूर्णवादी’ संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत आहे. एवढेच नव्हेतर बीड येथील सामाजिक कार्यकर्ते साहस आदोडे यांनी पोलिस अधिक्षक, बीड यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करून या प्रकरणी ‘पूर्णवादी’ संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

हेही वाचा

लक्षवेधी