चंद्रपूर, दि. १२ [दिनेश खांडेकर] :- “धृतराष्ट सुद्धा सांगू शकतील एवढी विकासकामे, मी चंद्रपूर जिल्ह्यात माझ्या मतदार संघात केली आहेत. मी फक्त विकासाचं राजकारण करतो, जातीपातीच घाणेरडे राजकारण उभ्या आयुष्यात केले नाही. मी तीनशेच्या वर विकासकामे केली आहेत, त्याची यादी तुमच्यासमोर वाचून दाखवितो. पण विरोधकांनी त्यांच्या काळात २१ तरी विकास कामे केली आहेत का? हे जनतेला त्यांनी सांगावं….” असे जाहीर आव्हान आज चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाई (आठवले गट) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना केले.
राजुरा विधानसभा मतदार संघात त्यांनी झंझावाती प्रचारदौरा केला. यावेळी त्यांनी अनेक गावांमध्ये जाहीर सभा, प्रचार यात्रा घेऊन खेड्यापाड्यातील गावांना भेटी दिल्या. यादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “जनतेसमोर मी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर करीत आहो. पण माझे प्रतिस्पर्धी विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. मागील पाच वर्षात राजुरा विधानसभा मतदार संघाचा विकास रखडला आहे. नागरिकांना जाण्या-येण्यासाठी साधे रस्ते ही त्यांना करता आले नाहीत. त्यांच्याकडे विकासाच्या राजकारणावर बोलण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे ते जातीपातीचे आणि अपप्रचाराचे राजकारण करत आहेत.”
या भागात पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल मी लोकसभेत निवडून आल्यानंतर तातडीने मार्गी लावणार पण त्यासाठी आपण मला आशीर्वाद रूपी मत दिले पाहिजे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी यावेळी केले. मूनगंटीवारांच्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावातील ग्रामस्थ हात वर करून आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे सांगत जोरदार घोषणांच्या जय घोषात त्यांना आपला पाठिंबा दर्शवत असल्याचे पहावयास मिळत आहे. मुनगंटीवार यांनी सास्ती, तोहगाव, लाठी, धाबा आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. तर गोवरी, चुनाळा, विरूर, चकदरूर, भंगाराम तळोधी, विठ्ठलवाडा, वढोली, खरारपेठ आदी ठिकाणी प्रचार यात्रा घेतल्या. तसेच गोवरी, माथरा, रामपूर, विहीरगाव, मूर्ती, नलफ़डी, सिंधी, धानोरा, धानापूर, करंजी, आक्सापुर, सरांडी, सोनापूर देशपांडे, सकमुर, दरुर, चकपारगाव, खराळपेठ आदी गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि प्रश्न जाणून घेत सुरू केलेला प्रचार मतदारांच्या पसंतीस उतरतांना दिसून येत आहे.
या प्रचार मोहिमेत भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बंडू हजारे,सुरेश धोटे, सुरेश रागीट,मधुकर नरड, सुनील उरकुडे, सुभाष बोनगिरवार, सचिन शेंडे,अरुण लोखंडे, सरपंच सुचिता मावलीकर, प्रतीक चन्ने, जिल्हा परिषद सदस्य स्वाती वडपल्लीवार, गणेश पिसे, महेंद्र बोबडे, प्रवीण मुनगंटीवार, विपुल भडी, गजानन झाडे, भारत कुळसंगे, बंडू धोटे, सुरेश वांढरे, सुनीता उरकुडे, प्रकाश फुटाणे, स्नेहा दरेकर, मीरा वांढरे, सरपंच बाळू वडस्कर, सिद्धार्थ पथोडे, अरुण मस्की, विलास बोनगीरवार, संजय पावडे, प्रशांत घरोटे, विनायक देशमुख, बबन निकोडे,अमर बोडलावार, दीपक सातपुते, निलेश पुलगमकार, स्वप्नील अनमुलवार, राजेंद्र गोहणे, हिरा कंदिगुरवार,निळकंठ लखमापुरे, रुपेश लिंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याचे पहावयास मिळत आहे.
सुधीर भाऊ राजुरा मतदार संघातील प्रश्न सोडवतील-माजी आ. संजय धोटे
“राजुरा विधानसभा मतदार संघ विकासापासून कोसो दूर आहे. या मतदार संघात विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची ताकद असेल तर ती फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यातच आहे. आपण सर्वांनी झोकून देऊन सुधीरभाऊंना लोकसभा निवडणुकीत लाखो मतांनी विजयी करून त्यांना संसदेत पाठविले तरच केंद्रातील निधी आपल्या जिल्ह्याला आणि विधानसभा मतदार संघाला मिळेल आणि आपल्या क्षेत्राचा विकास होईल.” अशा शब्दांत माजी आमदार संजय धोटे यांनी जनतेला आवाहन केले आहे.