Homeशहरठाकरे बंधू टक्केवारीसाठी एकत्र, उद्धव ठाकरेंवर गल्लीत सभा घेण्याची वेळ - संजय...

ठाकरे बंधू टक्केवारीसाठी एकत्र, उद्धव ठाकरेंवर गल्लीत सभा घेण्याची वेळ – संजय शिरसाट

संभाजीनगरात महायुतीचा पेच कायम 

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ [प्रतिनिधी] :- “केवळ आणि केवळ टक्केवारीसाठीच ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांच्या टक्केवारीच्या राजकारणाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युती विषयी आम्ही फार काही विचार करत नाही.” अशा रोखठोक शब्दांत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंच्या युतीने महायुतीला काहीही धोका नसल्याचे स्पष्ट केले.

त्यांनी आज महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाणे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, “ज्या नेत्यांना नगरपरिषद निवडणुकी मध्ये लोकांपर्यंत पोहचायला वेळ नव्हता. ज्यांनी जबाबदार विरोधी पक्षाचे नेते म्हणून मतदारांपर्यंत पोहचून मतदारांच्या भावना जाणून घेण्याचे कर्तव्य सुद्धा पार पाडले नाही, तेच ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी मात्र एकत्र येऊन वळवळत आहेत. त्यांच्या या कृतीने महाराष्ट्रासह मुंबईतील मतदारांना ही हे कळून चुकले आहे की, केवळ आणि केवळ टक्केवारीसाठीच ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूच्या युतीचा काहीही परिणाम पडणार नाही.”

नगरपरिषद निवडणुकांचे जसे निकाल आले, तसेच निवडणूक निकाल महानगरपालिका निवडणुकांचे येतील. नगरपरिषदांप्रमाणेच महानगपालिकांमध्ये ही ठाकरे बंधूंचे नामोहरण होईल, असा विश्वास व्यक्त करत शिरसाट यांनी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर गल्लीत सभा घेण्याची वेळ आली आहे, असा खोचक टोला ही यावेळी लगावला.

संभाजीनगरात महायुतीचा पेच कायम 

संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत युती कायम ठेवून निवडणूक लढण्याचे आदेश पक्ष प्रमुख तथा उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आम्हीही युतीसाठी आग्रही आहोत. तसे प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. परंतु भाजपच्या काही स्थानिक नेत्यांना युती होऊ द्यायची नाही, असे दिसत आहे. युती व्हावी म्हणून आम्ही आतापर्यंत चार-पाच बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा करण्या ऐवजी जुनी भांडणे उकरून काढण्यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अधिक भर दिला. त्यामुळे या विषयात आज किंवा उद्या मंत्री अतुल सावे यांच्या सोबत अंतिम बैठक घेवून युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर सोडणार आहोत, असे शिरसाट यांनी सांगितले.

हेही वाचा

लक्षवेधी